Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

दाजीपूर भागात मधमाशापालन उद्योगावर रोगाची संक्रांत
राधानगरी, १४ जून / वार्ताहर

दाजीपूर वन्यजीव अभयारण्यासह राधानगरी व भुदरगडच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या हजारो भूमिपुत्रांच्या चरितार्थाचे साधन असलेल्या मधमाशीपालन उद्योगावर ‘थायी सॅक ब्रुड’ रोगाची संक्रात आली आहे. सलग चार वर्षे या रोगाचा प्रश्नदुर्भाव होत असल्यामुळे हजारो रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

‘मास्तर एके मास्तर’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
शिक्षकवर्गाच्या मागणीबाबत अखेर तडजोड

कोल्हापूर, १४ जून / विशेष प्रतिनिधी

चित्रपटात कथानकाद्वारे शिक्षकवर्गाच्या केलेल्या बदनामीबद्दल जाहीर माफी मागावी आणि चित्रपटाच्या प्रश्नरंभी दिलगिरी व्यक्त करणारा मजकूर प्रदर्शित करावा या मुद्दय़ावर तडजोड झाल्यामुळे ‘मास्तर एके मास्तर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती चित्रपटनिर्माते मेघनाथ राजेभोसले यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षकवर्गाची अक्षम्य बदनामी केल्याचा ठपका ठेवून गेले दोन दिवस कोल्हापुरात पद्मा चित्रपटगृहामध्ये शिक्षकांनी ‘मास्तर एके मास्तर’ या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले होते.

खासदार निधीबद्दल ‘कॅग’चा आक्षेप सुशीलकुमारांनी फेटाळला
सोलापूर, १४ जून/प्रतिनिधी

आपल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीचा वापर न होता तो परत गेल्याचा ‘कॅग’ने ठेवलेला ठपका चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे बोलताना केले. याबाबत आपण ‘कॅग’ला पत्र लिहून जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन पुन्हा केंद्रीय ऊर्जामंत्री झाल्याबद्दल रविवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

जरंडेश्वर कारखाना चालविण्यासाठी स्नेहा शुगर्सकडे
इस्लामपूर, १४ जून / वार्ताहर

आर्थिक अडचणीत सापडलेला सातारा जिल्हय़ातील कोरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आगामी गळीत हंगामात सुरू करण्यासाठी इचलकरंजी येथील सिद्धार्थ उद्योगसमूह सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात हा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालेल, अशी ग्वाही सिद्धार्थ उद्योग समूहाच्या स्नेहा शुगर्सचे अध्यक्ष ज्ञानदेव साळुंखे यांनी दिली.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन व स्नेहा शुगर्स यांच्यात तशा आशयाचा पाच वर्षाचा लेखी करार झाल्याचेही साळुंखे म्हणाले.

ेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर अखेर कारवाई
माळशिरस, १४ जून/वार्ताहर

अखेर जनहित याचिकेच्या रेटय़ामुळे पोलिसांसह महसूल खात्याने बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करणारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून, विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या १२० मालमोटारी ताब्यात घेतल्या आहेत. मात्र कारवाईचे वृत्त समजल्याने सुमारे ५०० मालमोटारी लंपास करण्यात या ठेकेदारांना यश आले आहे. माळशिरस तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा व भीमा नद्यांच्या पात्रातून प्रचंड बेकायदा वाळू उपसा व चोरटी वाहतूक गेले अनेक दिवस सुरू आहे.

वसंतदादा बँकेविरुद्ध जाणार शिक्षक समिती कोर्टात
सांगली, १४ जून / प्रतिनिधी

सांगली महापालिका शिक्षण मंडळाकडील शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधीची साडेसहा कोटी रुपयांची रक्कम परत मिळविण्यासाठी वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय पुरोगामी प्रश्नथमिक शिक्षक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुरोगामी प्रश्नथमिक शिक्षक समितीची बैठक येथील शाळा क्रमांक चार येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्य सल्लागार वि. स. घटे (रत्नागिरी) होते. या बैठकीस सर्जेराव जगताप, जिल्हा सरचिटणीस मारुती शिरतोडे, महापालिका क्षेत्र अध्यक्ष बाहुबली मोगलाडे, सदाशिव वाले व रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

वाईमध्ये डेंग्यूचे बारा संशयित रुग्ण
वाई, १४ जून/वार्ताहर

शहरात डेंग्यूसदृश आजाराचे बारा रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भागाला आज ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य पथकाने भेट दिली. आरोग्य विभाग व नगरपालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शहरातील माऊलीनगर रविवार पेठ परिसरातील काही लोकांना ताप, थंडी, अशक्तपणा येत असल्याचे आढळून आले. त्यापैकी काल पाचजण डेंग्यूचे संशयित रुग्ण असल्याचे आढळले आहेत. त्यांना तातडीने पुण्याला हलविण्यात आले आहे. यापूर्वी मधली आळीतही दोन संशयित रुग्ण आढळून आले असून त्यात पालिकेच्या उपाध्यक्षांच्या मुलांचाही समावेश आहे. त्यांनाही पुण्याला हलविण्यात आले आहे. वाई ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अश्विनी कुमार करंजे, डॉ. एन. एच. सणस, विनोद राठोड, अशोक निकम, संदेश चव्हाण आदींनी घराघरात जाऊन माहिती घेतली व रुग्ण तपासले. जिल्हा हिवताप अधिकारी कुलकर्णी यांनी शहरातील डेंगीसदृश परिसराला भेट दिली. नागरिकांना सूचना दिल्या. नगरपालिकेने कीटकनाशके व धुराची फवारणी केली.

शिंदे यांच्याकडे अडचणी मांडण्यासाठी काँग्रेस भवनात नागरिकांची झुंबड
सोलापूर, १४ जून/प्रतिनिधी

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी सुमारे एक हजार नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्याशी सुसंवाद साधला, तर अनेक शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. त्या दूर करण्याचे अभिवचन श्री. शिंदे यांनी दिले. श्री. शिंदे यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस भवनला भेट दिली. शहर काँग्रेसचे अध्यक्ष धर्मा भोसले आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, तसेच प्रकाश यलगुलवार, निर्मला ठोकळ, विश्वनाथ चाकोते हे माजी आमदार, माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया, नलिनी चंदेले, सुधीर खरटमल आदी उपस्थित होते. श्री. शिंदे यांना काँग्रेस भवन येथे भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने तेथील यंत्रणा अक्षरश: कोलमडून पडली. मात्र श्री. शिंदे यांनी शेवटपर्यंत नागरिकांचे गाऱ्हाणे व अडचणी ऐकून घेतल्या. श्री. शिंदे यांना पक्षातील शहर आणि जिल्ह्य़ातील असंख्य कार्यकर्त्यांनी भेटून निवेदने दिली. त्यांच्याही समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बजाज अलियान्सची आजपासून ‘इन्व्हेस्ट प्लस’ योजना बाजारात
सोलापूर, १४ जून/प्रतिनिधी

बजाज अलियान्स लाईफ इन्शुरन्स कंपनीने ‘इन्व्हेस्ट प्लस’ ही अनोखी योजना अंमलात आणली आहे. या योजनेत लवचिकता असून प्रीमियमवर दरसाल ७ टक्के परतावा, अतिरिक्त प्रीमियम गुंतवणुकीवर १२१ टक्के परतावा, याशिवाय १० वर्षे नियमित हप्ते भरल्यास ११ व्या वर्षापासून प्रीमियमवर १० टक्के हमीपात्र लॉयल्टी बोनस ही या योजनेची वैशिष्टय़े आहेत. यासंदर्भात बजाज अलियान्स लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कामेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळातही ‘इन्व्हेस्ट प्लस’ ही योजना हमखास परतावा देणारी आहे. दरवर्षी किमान हमीपात्र परतावा कंपनी जाहीर करणार असल्याने ग्राहकांना त्याचा निश्चित लाभ होईल. ही योजना बाजारात उद्या सोमवारपासून येणार असल्याचे कंपनीचे सोलापूर विभागीय व्यवस्थापक सुनील मुडफणे यांनी सांगितले.

मिरजेत विधानसभेसाठी लढणार - नितीन काळे
सांगली, १४ जून / प्रतिनिधी

गेली २५ वर्षे काँग्रेसवाढीसाठी एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून केलेले अथक प्रयत्न, तसेच कार्यकर्त्यांची संघटनात्मक व भक्कम बांधणी या ताकदीच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे माजी सरचिटणीस नितीन काळे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली. केवळ मिरज विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच सूत्र घेऊन आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करून नितीन काळे म्हणाले, की गेली २५ वर्षे आपण एनएसयूआय व काँग्रेसच्या माध्यमातून समाजकार्य केले आहे. १९८७-८८ ला शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कौन्सिल, सिनेट व मराठी आर्ट फॅकल्टीवर काम केले आहे. एनएसयूआयच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन प्रदेश समितीने त्यांना सांगली शहर अध्यक्षपदाची संधी दिली होती. या कालावधीत सर्वसामान्य व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उपोषण, मोर्चे व प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने उभारली आहेत.

सेवा न सुधारल्यास टाळे ठोकण्याचा इशारा
आटपाडी, १४ जून / वार्ताहर

तालुक्यातील बी. एस. एन. एल.ची दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली असून, ग्राहकांच्या समस्या सोडवाव्यात, बंद दूरध्वनी ताबडतोब सुरू करावेत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.१५) कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आनंदराव पाटील यांनी दिला आहे. तालुक्यातील बी. एस. एन. एल.च्या सेवेची दुरावस्था झालेली आहे. अनेक गावातील दूरध्वनी बंद आहेत. तक्रारीनंतरही बंद दूरध्वनी सुरू केले जात नाहीत. दूरध्वनी सुरू असताना बोलणे अस्पष्ट ऐकू येते. खरखर येते. भ्रमणध्वनी सेवा मध्येच खंडित होते किंवा संपर्कच होत नाही. त्यामुळे ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तक्रारींबाबत कार्यालयात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तालुका कार्यालयात सक्षम अधिकारी नाही. त्यामुळे अनेक तक्रारींचे निवारण होत नाही. दूरध्वनी बंद असलेल्या कालावधीत बील मात्र आकारले जाते, सदरची बिले रद्द करावीत. बंद दूरध्वनी तातडीने सुरू करावेत, सुरळीत सेवा द्यावी. अन्यथा सोमवार दि. १५ जून रोजी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आनंदराव पाटील यांनी दिला आहे.

‘ग्रंथालयाकडे आजच्या तरुणांचे दुर्लक्ष’
माळशिरस, १४ जून/वार्ताहर

जुने ग्रंथ, पुस्तके तरुण पिढीसाठी आदर्श असतानाही ही पिढी दूरचित्रवाणी अथवा अन्य मार्गाकडे वळत असल्याने ग्रंथालयाची चळवळ वाढणे गरजेचे असल्याचे मत अकलूजच्या सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. दसूर (ता. माळशिरस) येथील स.म. शंकरराव मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रश्नरंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर वाचनालयाचे सचिव अ‍ॅड. कालिदास सावंत पाटील यांनी प्रश्नस्ताविकात खेडय़ात ग्रंथालय चालविणे सध्याच्या काळात अवघड झाले असल्याचे सांगितले. मोहिते पाटील म्हणाले, की अलीकडे दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांच्या माध्यमातून दाखवल्या जात असलेल्या कार्यक्रमांकडे लोक विशेषत: तरुण वर्ग आकर्षित होताना दिसत आहे. मात्र त्यामुळे ग्रंथालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. परिणामी आपल्या प्रश्नचीन संस्कृतीचा होत चाललेला ऱ्हास आपणास उघडय़ा डोळ्यांनी पाहावा लागत आहे. हे थांबविण्यासाठी ग्रंथालयाची चळवळ व तरुणाईतील वाचनाची आवड वाढवली पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. दत्तात्रय आडत यांनी केले तर आभार पांडुरंग चोपडे गुरुजींनी मानले.