Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दाजीपूर भागात मधमाशापालन उद्योगावर रोगाची संक्रांत
राधानगरी, १४ जून / वार्ताहर

दाजीपूर वन्यजीव अभयारण्यासह राधानगरी व भुदरगडच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या हजारो भूमिपुत्रांच्या चरितार्थाचे साधन असलेल्या मधमाशीपालन उद्योगावर ‘थायी सॅक ब्रुड’ रोगाची संक्रात आली आहे. सलग चार वर्षे या रोगाचा प्रश्नदुर्भाव होत असल्यामुळे हजारो रूपयांची

 

उलाढाल ठप्प झाली आहे.
राधानगरी अभयारण्यातील सतीचा माळ, भटवाडी, बांबर मांढरेवाडी, हसणे, माळेवाडी, न्यू करंजे, रामनवाडी, ओलवन, दाजीपूरसह अन्य वीसहून अधिक वाडय़ा-वस्त्यांवर तसेच भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण परिसरातील वाडय़ा-वस्त्यांवर मधमाशी पालनाचा उद्योग मोठय़ा प्रमाणावर चालतो. जंगलातील बहुतांशी कुटुंबांचा हा मुख्य व्यवसाय आहे. जानेवारी ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत मध मोठय़ा प्रमाणात गोळा केला जातो. या काळात निसर्गात पानाफुलांना नवा बहर येतो. नानाजातीची फुले फुललेली असतात.
त्यातील परागकण मधमाशा टिपतात व मधपेटीत आणून सोडतात. दोन्ही तालुक्यात मिळून सुमारे पाच हजार मधपेटय़ा आहेत. एका पेटीतून एका हंगामात तीस ते चाळीस किलो मध मिळतो. उत्पादित झालेला मध खरेदी करण्याची हमी महाबळेश्वर येथील मध केंद्रामार्फत घेतली जाते. खादी ग्रामोद्योग व बँक ऑफ इंडियाकडून मधपालनासाठी अर्थसाहाय्यही उपलब्ध करून दिले जाते. कर्ज उपलब्धता आणि मध खरेदीची हमी यामुळे या विभागात हा उद्योग चांगलाच बहरला आहे. हा मध निर्भेळ असून औषधीही आहे. त्यामुळे याला चांगली मागणी असून त्याचा प्रतिकिलोचा दर साधारणत सव्वाशे रूपयांदरम्यान आहे. मधाला चांगला दरही मिळत असल्याने येथील भूमिपुत्रांना रोजीरोटी मिळत होती.
मात्र, गेल्या आठ-दहा वर्षात या उद्योगाला अज्ञात रोगाने ग्रासले आहे. यावर्षी या रोगाची तीव्रता वाढल्याने मधमाशा मरण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर संशोधन केल्यानंतर या रोगाचा प्रसार थायलंडमधून झाला असून ‘थायी सॅक ब्रुड’ नावाचा हा रोग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर अद्यापही औषधोपचाराची सोय झालेली नाही. हा रोग राज्याच्या विविध भागांतही दिसून येतो. मधमाशा या रोगाच्या प्रश्नदुर्भावाला बळी पड असल्यामुळे येथील भूमिपुत्रांच्या चरितार्थाच्या साधनावरच कुऱ्हाड आली आहे. अनेक जणांनी हजारो रूपयांचे कर्ज उचलले आहे. मात्र आता उत्पन्नच नसल्याने कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे हे कर्ज फेडण्यासाठी अन्य मार्गही नाही. परिणामी मधमाशा पालनाचा उद्योग अखेरच्या घटका मोजत असून शासनाने या भूमिपुत्रांना रोजीरोटी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.