Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘मास्तर एके मास्तर’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
शिक्षकवर्गाच्या मागणीबाबत अखेर तडजोड
कोल्हापूर, १४ जून / विशेष प्रतिनिधी

चित्रपटात कथानकाद्वारे शिक्षकवर्गाच्या केलेल्या बदनामीबद्दल जाहीर माफी मागावी आणि चित्रपटाच्या प्रश्नरंभी दिलगिरी व्यक्त करणारा मजकूर प्रदर्शित करावा या मुद्दय़ावर तडजोड झाल्यामुळे ‘मास्तर एके मास्तर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती

 

चित्रपटनिर्माते मेघनाथ राजेभोसले यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षकवर्गाची अक्षम्य बदनामी केल्याचा ठपका ठेवून गेले दोन दिवस कोल्हापुरात पद्मा चित्रपटगृहामध्ये शिक्षकांनी ‘मास्तर एके मास्तर’ या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले होते. खासगी प्रश्नथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने गुरूवारी चित्रपटगृहावर मोर्चा नेऊन खेळ बंद पाडण्यात आल्यामुळे रविवारी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि आंदोलक संघटना यांच्या दरम्यान पद्मा चित्रपटगृहातच चर्चा झाली. सुमारे तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर हा तोडगा उभयतांनी मान्य केला. यानंतर शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
खासगी प्रश्नथमिक शिक्षक सेवक संघाचे अध्यक्ष भरत रसाळे व महासचिव आदिती केळकर यांनी या बैठकीत शिक्षकांची बाजू मांडली. चित्रपटात शिक्षकी पेक्षाची बदनामी करणारे अनेक प्रसंग चित्रित करण्यात आले असून हे प्रसंग काढून टाकावेत. तसेच चित्रपटाचे नावही बदलण्यात यावे या मुद्दय़ावर आंदोलक आग्रही होते. मात्र हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून दोन वेळेला संमत करून घेण्यात आला आहे आणि पूर्णत: काल्पनिक स्वरूपाच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाकडे करमणूक या अंगानेच पाहण्यात यावे अशी निर्माते राजेभोसले यांनी विनंती केली. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सुमारे २५ लाख रूपये जाहिरातीचे बजेट खर्च करण्यात आले आहे. अशावेळी शासनाकडून मंजुरीचे प्रमाणपत्र घेऊनही जर चित्रपट बंद पाडला गेला तर पोलीस खात्याचे सहकार्य घेऊन चित्रपटाचे प्रदर्शन सुरू करावे लागेल असेही राजेभोसले यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर जाहीर माफी व दिलगिरी या दोन मुद्दय़ावर समाधान झाल्यामुळे अांदोलन मागे घेत असल्याचे रसाळे यांनी जाहीर केले.