Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

खासदार निधीबद्दल ‘कॅग’चा आक्षेप सुशीलकुमारांनी फेटाळला
सोलापूर, १४ जून/प्रतिनिधी

आपल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीचा वापर न होता तो परत गेल्याचा ‘कॅग’ने ठेवलेला ठपका चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे बोलताना

 

केले. याबाबत आपण ‘कॅग’ला पत्र लिहून जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन पुन्हा केंद्रीय ऊर्जामंत्री झाल्याबद्दल रविवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय दिवाणजी यांच्या हस्ते फेटा बांधून व शाल, पुष्पहार घालून शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी शिंदे ज्येष्ठ सहकारी विष्णुपंत कोठे तसेच त्यांचे ऑफिसर इनचार्ज ऑन डय़ुटी अ‍ॅड. कल्याणराव हिप्परगे यांचाही सत्कार करण्यात आला.
राज्यातील काही खासदारांनी स्थानिक विकासकामांचा निधी न वापरल्यामुळे परत गेल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला असून त्यात सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी आज खुलासा करून कॅगचा आक्षेप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ते म्हणाले, की २००४ साली आपण राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यानंतर राज्यपाल झालो. जानेवारी २००६ मध्ये केंद्रात ऊर्जामंत्री झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात मार्चमध्ये आपण राज्यसभेवर निवडून गेलो. म्हणजे खासदारपदाचा कालावधी तीन वर्षाचा मिळाला होता. या तीन वर्षाच्या कालावधीत प्रतिवर्ष दोन कोटींप्रमाणे सहा कोटींचा मिळालेला खासदार विकास निधी पूर्णत: खर्च झाला आहे. कॅगने कदाचित आपल्या खासदारपदाचा कालावधी सरसकट पाच वर्षे धरल्यामुळे की काय, हा घोटाळा झाला असावा, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. यापूर्वीही आपण खासदार होतो तेव्हाही आपल्या खासदार निधीतील रक्कम शिल्लक नव्हती. खासदार निधीची रक्कम खर्च होत नाही म्हणून आपण दीडपट विकासकामे सुचवितो. संपूर्ण कामांवरील निधी खर्च झाल्याचा दावा त्यांनी केला.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने आपला केलेला सत्कार मोलाचा वाटतो. सोलापूरच्या श्रमिक पत्रकारांची ताकद आणि बुद्धीचा झेप महत्त्वाची असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, की राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाणीव तसेच आर्थिक व राजकीय स्थिरता आणि सर्वधर्मसमभाव या तीन मुद्यांवर काँग्रेसने यंदाची निवडणूक लढविली असून, यात देशातील गोरगरीब व कमी शिकलेल्या बहुसंख्य मतदारांनी धर्म, पंथ, जात आणि प्रश्नदेशिकवाद बाजूला सारून क्रांती केली. २५० वर्षाची जुनी लोकशाही परंपरा असलेल्या अमेरिकेने जे मिळविले, ते भारताने अवघ्या ६० वर्षात मिळविले. सामान्य मतदारांकडे एवढी विद्वत्ता कोठून आली, विचारांचे लोण शेवटच्या स्तरापर्यंत कसे पोहोचले, यावर जगाच्या पातळीवर विश्लेषण व्हावे, अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली. सोलापूरच्या विकासप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही देताना ते म्हणाले, की दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे नवा विमानतळ उभारण्यासाठी उत्कृष्ट आराखडा तयार करण्यात येत आहे. याच तालुक्यातील होटगी, फताटेवाडी, आहेरवाडीत राष्ट्रीय औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची जलदगतीने उभारणी होण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. याशिवाय उत्तर सोलापूर तालुक्यात शिरापूर उपसा जलसिंचन योजनेसाठी यंदाच्या वर्षी २५ कोटींची तरतूद करून घेण्यात आली असून, हे सर्व प्रकल्प प्रश्नधान्यक्रमाने पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारेंची गरज, पण..
समाजातील वाढता भ्रष्टाचार, अनैतिकता, ढासळत असलेली मूल्ये थोपवून धरण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाची नितांत गरज असल्याचा उल्लेख शिंदे यांनी आवर्जून केला. मात्र लगेचच या विधानाचा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अटकेशी काडीमात्र संबंध नाही. पत्रकारांनी त्याचा चुकीचा संदर्भ लावू नये, असे सांगायलाही शिंदे हे विसरले नाहीत.