Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जरंडेश्वर कारखाना चालविण्यासाठी स्नेहा शुगर्सकडे
इस्लामपूर, १४ जून / वार्ताहर

आर्थिक अडचणीत सापडलेला सातारा जिल्हय़ातील कोरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आगामी गळीत हंगामात सुरू करण्यासाठी इचलकरंजी येथील सिद्धार्थ उद्योगसमूह

 

सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात हा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालेल, अशी ग्वाही सिद्धार्थ उद्योग समूहाच्या स्नेहा शुगर्सचे अध्यक्ष ज्ञानदेव साळुंखे यांनी दिली.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन व स्नेहा शुगर्स यांच्यात तशा आशयाचा पाच वर्षाचा लेखी करार झाल्याचेही साळुंखे म्हणाले. आमदार डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झालेला जरंडेश्वर साखर कारखाना गेल्या काही वर्षापासून विविध कारणांनी अडचणीत आला आहे. आमदार श्रीमती पाटील यांनी हा साखर कारखाना सुरू राहावा, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले. भाडेतत्त्वावर तो चालविण्यास देण्याचाही विचार पुढे आला. तथापि, तेही शक्य झाले नाही. दरम्यानच्या काळात आमदार श्रीमती पाटील यांनी साखर कारखाना संचालक मंडळ स्वबळावर चालवेल, अशी घोषणाही केली होती. साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या विशेष सभेत सभासदांनी हा साखर कारखाना चालविण्यासंदर्भात संचालक मंडळाला निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले होते.
या पाश्र्वभूमीवर आमदार श्रीमती पाटील यांनी इचलकरंजी येथील सिद्धार्थ उद्योग समूहाचे अध्यक्ष ज्ञानदेव साळुंखे, संचालक माजी आमदार दिनकर पाटील, विजयकुमार पाटील व सल्लागार पी. के. सुरोलिया यांच्याशी जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत चर्चा करून कराराद्वारे तो चालविण्यास देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार आमदार श्रीमती पाटील यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाच्या बैठकीत इचलकरंजीच्या सिद्धार्थ उद्योग समूहाचाच एक भाग असलेल्या स्नेहा शुगर्सबरोबर पाच वर्षाचा करार करण्यात आला. या करारावर साखर कारखाना व्यवस्थापनाबरोबरच स्नेहा शुगर्सचे ज्ञानदेव साळुंखे, माजी आमदार दिनकर पाटील व विजयकुमार पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जरंडेश्वर साखर कारखाना चालविण्यासंदर्भात करण्यात आलेल्या २१ पानी करारानुसार साखर कारखान्याची सर्व सूत्रे शुक्रवार, दि. १२ जूनपासून स्नेहा शुगर्सच्या ताब्यात आली आहेत. साखर कारखान्याचे व्यवस्थापन व आर्थिक व्यवहार स्नेहा शुगर्स सांभाळणार आहे. ऊसपुरवठादारांना जरंडेश्वरच्या परिसरात असलेल्या अजिंक्यतारा, किसनवीर, सहय़ाद्री व कृष्णा साखर कारखान्यांच्या ऊसदराबरोबरच ऊसदर देणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले. पहिली दोन वर्षे हा समूह वार्षिक भाडे तीन कोटी रुपये देणार आहे. त्यानंतर तिसऱ्या वर्षी ऊसपुरवठादारांना इतर साखर कारखान्यांपेक्षा प्रतिटन पाच रुपये जादा देणार असल्याची ग्वाही देऊन साखर कामगारांना सध्या देय असलेला पगार, बोनस व भत्ते देण्याबाबत त्यांचे व संचालक मंडळाचे एकमत झाले आहे. कामगारांबाबत स्नेहा शुगर्स सहकार्याची भूमिका घेणार असल्याचेही ते म्हणाले.
मंत्री समितीच्या झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे जरंडेश्वर साखर कारखाना संचालक मंडळच चालविणार आहे. तथापि, त्याचे व्यवस्थापन स्नेहा शुगर्सकडे राहणार आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याशी करार करणारा इचलकरंजी येथील सिद्धार्थ उद्योग समूहाचा दुधाचे उपपदार्थनिर्मितीचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा दूध संघ आहे. दुधापासून पावडरनिर्मितीबरोबरच इतर उपपदार्थनिर्मिती करण्यात हा संघ अग्रेसर आहे. इस्लामपूरमध्ये या उद्योग समूहाची चिलिंग व पाश्चराईज्ड प्रकल्प उभारणीचे काम गतीने सुरू आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याबरोबर केलेल्या या करारामुळे हा उद्योग समूह आता साखर कारखानदारीतही आपले पाऊल टाकत आहे.