Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर अखेर कारवाई
माळशिरस, १४ जून/वार्ताहर

अखेर जनहित याचिकेच्या रेटय़ामुळे पोलिसांसह महसूल खात्याने बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करणारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून, विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या १२० मालमोटारी ताब्यात घेतल्या आहेत. मात्र कारवाईचे वृत्त समजल्याने सुमारे ५०० मालमोटारी लंपास करण्यात या ठेकेदारांना यश आले आहे.
माळशिरस तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा व भीमा नद्यांच्या पात्रातून प्रचंड बेकायदा वाळू उपसा व चोरटी वाहतूक गेले अनेक दिवस सुरू आहे. या वाहतुकीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील रस्ते व पिके नष्ट होतात व सर्वसामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागतो. त्याबाबत वृत्तपत्रातूनही वेळोवेळी आवाज उठवले, परंतु ठोस कारवाया होत नसल्याने बिनदिक्कत ही वाहतूक सुरू होती. दररोज हजारो मालमोटारी या वाळूची पुण्याकडे वाहतूक करीत असतात.
नेवरे येथील प्रताप गाडेकर व कालिदास कदम यांनी अखेर या मांजरांच्या गळ्यात घंटा बांधण्याचे ठरवून तहसीलदारांसह या संबंधीच्या महसुली कर्मचाऱ्यांविरुद्ध येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात ही याचिका दाखल केल्याने ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. पोलिसांनी अकलूज ते श्रीपूर असा सापळा लावला तरी भ्रमणध्वनी संपर्कामुळे सुमारे ५०० मालमोटारी चालक जमेल तसा पोबारा करण्यात यशस्वी झाल्याचे समजते. गेली दोन दिवस अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात या वाळूचे पंचनामे सुरू आहेत.
पोलीस, तहसीलदार व प्रश्नदेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या कारवाया सुरू आहेत. मात्र दोन दिवस स्क्वाडा, स्कार्पिओसारख्या किमती गाडय़ा घेऊन या वाळूचे व्यापारी, मालक कारवायी न करण्याबाबत अगर कमीत कमी दंड आकारण्याबाबत अधिकाऱ्यांना आर्जवे करीत असताना दिसतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कारवायी केल्यामुळे सर्वसामान्य लोकांना मात्र आनंद झाल्याचे दिसत आहे.