Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शरद पवार यांच्याकडून भ्रमनिरास- डॉ. येळगावकर
टेंभू योजनेच्या चाचणीस प्रश्नणपणाने विरोध करणार
जल आयोगाच्या मान्यतेअभावी केंद्राचा निधी नाही
उरमोडी, जिहेकठापूर ११११ कोटींची गरज
राज्याच्या बजेटमध्ये फक्त १०० कोटी
सातारा, १४ जून/प्रतिनिधी

शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे नंदनवन बारामती करण्याचे मृगजळ निर्माण करून जनतेची फसवणूक केली आहे.
दुष्काळी तालुक्याचा कायापालट करण्यासाठी केंद्राकडून निधी आणण्याची त्यांची भाषा फसवी

 

आहे. उरमोडी, जिहे कठापूर या प्रकल्पांना केंद्रीय जल आयोगाची व एआयबीपीची मान्यता मिळण्यास त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे ते दुष्काळी तालुक्यांना सन २०१० पर्यंत पाणी देऊ शकत नाहीत. टेंभू योजनेतील माण खटावचा हक्क डावलला गेला असल्याने त्याची चाचणी मरण पत्करावे लागले तरी होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
डॉ. येळगावकर यांनी शरद पवार यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे त्यांच्या सातारा जिल्ह्य़ात मतदारांचे आभार दौऱ्यात समोर आले असल्याचे सांगितले. शरद पवार यांच्या माढामधील उमेदवारीमुळे दुष्काळी तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नाला गती मिळेल असे वातावरण तयार केले होते. आभार दौऱ्यात केंद्राच्या भरीव निधीची घोषणा होईल अशी अपेक्षा बाळगणाऱ्या मतदारांची त्यांनी घोर निराशा केली आहे. राज्य सरकारने चालू बजेटमध्ये उरमोडीसाठी ६० व जिहेकठापूरसाठी ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शरद पवार माढातून खासदार झाल्यानंतर उमरमोडीत फक्त ५ व जिहेकठापूरसाठी ८ कोटीच गतवर्षाच्या तुलनेत वाढवून मिळाले आहेत. १०२१ कोटी खर्चाच्या उरमोडी प्रकल्पावर आतापर्यंत ६०० कोटी रुपये खर्च झाला असून, अद्याप ४२१ कोटींची गरज आहे. तर जिहे कठापूरचा पहिल्या टप्प्यासाठी १२० कोटींची गरज आहे. ते मिळाल्यास नेरधरणातील पाणी येरळवाडीपर्यंत उपलब्ध होऊ शकते.
राज्यसरकारचा नाकर्तेपणा
उरमोडी व जिहेकठापूर प्रकल्पांना राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे केंद्रीय जलआयोग व एआयबीपीची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे केंद्राचा निधी शरद पवार कसा आणणार हा मोठा प्रश्न आहे.
या उलट कृष्णाभीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी राज्य सरकारने चालू बजेटमध्ये १०० कोटींची तरतूद केली आहे. या योजनेतील दीडशे फूट जमिनीखालून जाणाऱ्या बोगद्यामुळे माण खटावचे नंदनवन होण्याऐवजी ते राजस्थान करायला निघाले आहेत. दुष्काळी तालुक्यांचे शरद पवार यांचे प्रेम पुतनामावशीचे आहे. वाढलेले तेवढेच खा जादा मागू नका असा सल्ला त्यांनी वडूजच्या सभेत जनतेला देऊन दुष्काळी तालुक्यावर आघात केला आहे.
रामराजे बोलघेवडे
जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर हे बोलघेवडे आहेत. ते फक्त स्वत:पुरते बघतात. त्यांनी आमचा वापर करून घेतला आणि खटाव माणची दुर्दैवी उपेक्षा केली असा आरोप करून डॉ. येळगावकर यांनी रामराजेंना विधानसभा निवडणुकीसाठी माणमधून उभे राहावे, असे आवाहन केले.
कृष्णा खोरेसाठी निधी उपलब्ध करून घेण्यात अपयशी ठरलेले महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
राज्य सरकारवर १ लाख ८० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे बजेटमध्ये जाहीर केलेला निधी कर्जबाजारी सरकार न देण्याची भीती असल्याचे डॉ. येळगावकर यांनी या वेळी व्यक्त केला.
टेंभूसाठी सत्याग्रह
टेंभू योजनेची क्षमता २२ टीएमसी असताना ८० हजार हेक्टरपैकी फक्त कराड तालुक्यातील ६०० हेक्टरला पाणी मिळणार आहे. ही कुचेष्टा आहे. माण खटावला ५ टीएमसी पाण्याचा हक्क मिळण्यासाठी आपण प्रश्नणपणाने लढणार असून, टेंभूची चाचणी होऊ देणार नाही असा निर्धार डॉ. येळगावकर यांनी या वेळी व्यक्त केला.
गृहमंत्री जयंत पाटील पालकमंत्री आहेत. त्यांनी अद्याप टंचाई बैठक घेतलेली नाही. जिल्ह्य़ातील भारत निर्माण योजनेचा पैसा परत गेला आहे, अशी खंत डॉ. येळगावकर यांनी या वेळी व्यक्त केली. डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या आंदोलनास पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.