Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

म्हेत्रेच काँग्रेसचे उमेदवार - सुशीलकुमार
अक्कलकोट, १४ जून/वार्ताहर

रक्ताचे पाट वाहून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताला जगात समर्थ बनिवण्याचे काम काँग्रेसनेच केले, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रियदर्शनी सांस्कृतिक

 

भवनमध्ये आयोजित कृतज्ञता मेळाव्यात केले. अध्यक्षस्थानी माजीमंत्री आनंदराव देवकाते होते.
लोकसभा निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून केवळ ९१२ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे अनेक ‘वावडय़ा’ उठल्या होत्या. अशातच सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवार सिद्धाराम म्हेत्रेच असतील, अशी घोषणा केली आणि याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला.
शिंदे यांचे अक्कलकोट येथे आगमन होताच सर्वप्रथम नगराध्यक्ष शफी टिनवाला यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते दिलीपसिंह, डॉ. सुवर्णा मल्लगोंड, विद्युत मंडळ अभियंता सुनील शिंदे, तहसीलदार प्रशांत ढगे हेही उपस्थित होते. शिंदे यांनी प्रथम वटवृक्ष मंदिरात जाऊन स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. यावेळी उपनगराध्यक्ष तथा विश्वस्त महेश इंगळे यांनी त्यांचे स्वागत केले, तर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब इंगळे यांनी सत्कार केला. यावेळी विश्वस्त विलास फुटाणे, आत्माराम घाटगे उपस्थित होते.
प्रियदर्शनी सांस्कृतिक भवनमध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ज्येष्ठ नेते व दुधनीचे नगराध्यक्ष सातलिंगप्पा म्हेत्रे आणि सिद्धाराम म्हेत्रे यांनी फेटा, शाल, श्रीफळ व ६८ किलो वजनाचा पुष्पहार देऊन शिंदे यांचा सत्कार केला. प्रश्नस्ताविक काँग्रेस कार्याध्यक्ष शांतलिंग शटगार यांनी केले.
नगराध्यक्ष शक्ती टिनवाला यांनी शहरवासीयांच्या वतीने शिंदे यांचा सत्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप सिडदे, समर्थ बँकेच्या अध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा यांची या वेळी भाषणे झाली. आनंदराव देवकाते यांचेही परखड भाषण झाले.
सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, की तालुका विकासात शिंदे यांचे योगदान मोठे आहे. विधानसभा निवडणुकीत अगोदर उजनीचे पाणी कुरनूर धरणात यावे आणि एक मोठा उद्योग प्रकल्प उभारण्यास सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिंदे म्हणाले, की लोकसभेची लढाई साधी नव्हती. पण तरी देखील सर्वाच्या सहकार्याने मी विजयी झालो असे सांगत भाजपावर चौफेर हल्ला चढविला. सर्वानी एकजुटीने कामाला लागावे पुढचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रेच असे जाहीर करून विकास आणि प्रगतीसाठी काँग्रेसलाच विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. मेळाव्याला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब शेळके, सभापती आशा इंगळे, गोकुळ शिंदे, उपनगराध्यक्ष महेश इंगळे, शहर काँग्रेस अध्यक्ष पवनकुमार साखरे आदी उपस्थित होते.
मेळाव्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी समाज बांधवांच्या होरकर गल्लीत भेट दिली. यावेळी समाजाच्या वतीने नगरसेवक केरबा होटकर यांनी फेटा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. सभेचे संयोजन भीमराव होटकर यांनी केले.
केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या समाज बांधवाच्या भेटीसाठी येताच दिवाळीप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यात आले. संजय दत्तात्रय इंगळे यांनी समाज बांधवांच्या वतीने शिंदे यांचे स्वागत करून समाजमंदिर उभारण्या संबंधी
निवेदन दिले. यावेळी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल उपस्थित होते. शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त करून सहकार्याचे आश्वासन दिले.