Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

इस्लामपूर पालिकेत अनागोंदी कारभार - सूर्यवंशी
इस्लामपूर, १४ जून / वार्ताहर

इस्लामपूर नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांकडे नगराध्यक्षपदासाठी एकही पात्र उमेदवार नाही. त्यामुळेच त्यांना विरोधी आघाडीतून आलेल्यांनाच नगराध्यक्ष करावे लागत असल्याची टीका विरोधी

 

आघाडीचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा सूर्यवंशी यांनी केली. नवीन नगराध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाच सूर्यवंशी यांनी सत्ताधारी गटाच्या नेमक्या वर्मावरच बोट ठेवल्याने नगरपालिकेतील सत्ताधारी गटात विशेषत: इच्छुकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नगरपालिकेच्या सत्तेवर येऊन राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. जी आश्वासने देऊन ते सत्तेवर आले, त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात सत्ताधारी गटाला आलेल्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी सूर्यवंशी यांनी वार्ताहर बैठक बोलावली होती. या बैठकीत ते बोलत होते. इस्लामपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या सुधारित पाणीपुरवठा योजनेत सत्ताधाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. शहरवासीयांवर जादा खर्चाचा नाहक बोजा पडला असून या योजनेची सर्वच कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याने या योजनेच्या कामाची केंद्र शासनाने सक्षम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
विकास आराखडा नव्याने तयार होणे गरजेचे असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने शहराचा विकास खुंटल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील दारिद्रय़रेषेखालच्या कुटुंबांचा सव्‍‌र्हे झाला. मात्र तो चुकीचा झाला. परिणामी केवळ १६०० कुटुंबांचाच त्यात समावेश झाला व पात्र असणारी शेकडो कुटुंबे वंचित राहिली. अशा १८०० कुटुंबांनी अपील केले. परंतु ती अपिले चौकशीविना पडून आहेत, हा दारिद्रय़रेषेखालच्या कुटुंबांवरचा अन्याय असून हे पाप सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचे असल्याचेही ते म्हणाले.
नगरपालिकेत सत्तेवर येताच राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील प्रश्नथमिक शाळा ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, सत्तेवर येऊन अडीच वर्षे होऊनही नगरपालिकेने शाळा ताब्यात घेतल्या नाहीत. शहरातील खासगी शिक्षण संस्थाचालक पालकांची लूट करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालक दारोदारी भटकत आहेत, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. तीस लाख रुपयांचा कीटकनाशक घोटाळा हा विषयही प्रलंबितच आहे. कीटकनाशके नगरपालिकेला मिळाल्याची व ती खर्ची टाकल्याची कोठेही नोंद नाही. मात्र या कीटकनाशकाचे तीस लाख रुपयांचे बिल आलेय. नागरी स्वच्छता अभियानात गांडूळखत प्रकल्प उभारला. त्यासाठी तब्बल ७० ते ७५ लाख रुपये खर्च दाखविला आहे. प्रत्यक्षात मात्र १५ लाख रुपयांपेक्षा जादा खर्च झाला नसल्याचे सांगून या सर्व अनागोंदी प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शहरातील रस्ते दरवर्षी केले जातात व ते पावसाच्या पाण्यात वाहून जातात. इतक्या निकृष्ट दर्जाचे काम करून लाखो रुपये वाया घालविण्याचा उद्योग सत्ताधारी मंडळी करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात श्री बिरोबा मंदिराकडे जाणारे गटारे बांधण्यात आली व अवघ्या आठवडय़ाच्या आत ती गटारे पूर्णपणे पडली व एका रात्रीत नगरपालिकेने ही गटारे एक्साव्हेटरने ट्रॅक्टरमध्ये भरून सारवासारव केली. एका रात्रीत अख्खी गटारच गायब करण्याचा प्रताप सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप करून नगरपालिकेची सर्व कामे जनतेच्या हितासाठी नसून सत्ताधारी व ठेकेदारांच्या भल्यासाठीच केली जातात, असेही ते म्हणाले.
शहरातील घरांच्या संकलित कराची, पाणीपट्टी व दुकान गाळय़ांच्या भाडय़ाची आकारणी पक्षपातीपणाने केली जाते, हे स्पष्ट करताना सत्ताधाऱ्यांच्या जे लोक जवळचे आहेत, त्यांच्या घरफाळय़ाची आकारणी कमी केली जाते. त्यांच्या पाणीपट्टीचीही आकारणी कमी असते, तर नगरपालिकेचे मोक्याचे गाळे संबंधितांना देऊन वर त्यांच्या भाडय़ातही कपात केली जाते. हा प्रकार समान न्यायप्रणालीविरोधात असून, दुजाभाव न करता संकलित कराची आकारणी समान करावी, अशी मागणीही त्यांनी केली.