Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कलाकारांनी रसिकांचा विश्वास मिळवावा - प्रशांत दामले
सातारा, १४ जून/प्रतिनिधी

नूतनीकरणानंतर शाहू कलामंदिर नाटय़गृहाने सातारच्या वैभवात भर घातली असून राज्यातील एक

 

अतिशय सुंदर अव्वल दर्जाची व सर्व सोयीसुविधाने युक्त अशा रंगमंचावर कलाकारांनी रसिकांचा विश्वास मिळवावा, असे आवाहन प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपटनाटय़अभिनेता प्रशांत दामले यांनी केले.
सातारा नगरपालिकेच्या शाहू कलामंदिर नूतनीकरण झालेल्या नाटय़गृहाच्या लोकार्पण सोहळ्याचे प्रशांत दामले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष नासिर शेख, उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशांत दामले म्हणाले, की शाहू कलामंदिर नाटय़गृहाचा स्वप्नवत असा कायापालट झाला आहे. आता हे वैभव नीट सांभाळण्याची जबाबदारी कलाकार, प्रेक्षक सर्वाचीच आहे. नाटय़गृहाचे निश्चित केलेले भाडे राज्यातील इतर नाटय़गृहापेक्षा अधिक आहे. ते वाजवी ठेवावे अशी विनंती करून ते म्हणाले, की नाटय़गृहाचा व्यवस्थापक कलाक्षेत्राशी निगडित असाच नेमावा तरच कलेची नीट जोपासना होईल.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, की मंदिरात जाताना देणगी देतो तसे येथेही देण्याची भूमिका ठेवा. नाटय़गृह फुकट मागू नका. देखभालीसाठी ते आवश्यक आहे. आपणही नाटके करतो. प्रशांत दामलेपेक्षा जास्त पण ती जनहिताची. दिल्लीत गेलो असल्याने आता अधिकाधिक निधी विकासकामासाठी आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन. शाहू कला मंदिरात कलाकारांनी मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनपर कार्यक्रम नाटकेही सादर करावीत.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की शाहू कला मंदिराची दुरवस्था दीर्घकाळापासून टीकेची लक्ष्य झाली होती. मनोमिलनामुळे विकास प्रगतीचे वाटचालीतून त्याचे नूतनीकरण चांगल्या पद्धतीने होऊ शकले. शाहू कला मंदिर वातानुकूलित करण्याचा प्रयत्न आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून ५० लाखाचा निधी मिळणार आहे. रस्त्यांच्या कामासाठीही ५० लाख येणार आहेत. प्रश्नरंभी आयडीएसएमटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या नगरवाचनालयासमोरील अभयसिंहराजे व्यापारी संकुल व मोती तळ्याजवळील कै. दादामहाराज व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. शाहू कला मंदिर लोकार्पण सोहळ्यात शहरातील रंगकर्मी, कलाकारांचा सत्कार करण्यात आले.