Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

देशातील तरुणांना नेतृत्वाची संधी देण्याची गरज - शिंदे
सोलापूर, १४ जून/प्रतिनिधी

देश स्थिरतेच्या, सर्वधर्मसमभावाच्या आणि आर्थिक स्थिरतेच्या वळणावर असताना देशातील तरुणांना नेतृत्वाची संधी देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी

 

व्यक्त केले.
रविवारी हुतात्मा स्मृतिमंदिर येथे संत कक्कय्या विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठानचे उद्घाटन आणि संत कक्कय्या पत्रिकेचे प्रकाशन शिंदे यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले मुंबई येथील वीज पारेषण कंपनीचे मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्यात येणार असल्याचे सांगून सर्वाचे स्वागत केले. पत्रिकेचे संपादक मनोज व्हटकर यांनीही पत्रिकेमागील भूमिका विशद केली. या कार्यक्रमात समाजातील क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अभियांत्रिकीतील पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या मीनल पोळ या विद्यार्थिनीस मदतीचा धनादेशही देण्यात आला. प्रतिष्ठानच्या कार्यासाठी ना. सुशीलकुमार शिंदे प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेतर्फे ब्रह्मानंद शिंदे यांनी दोन लाखांची, तर शहर काँग्रेसचे खजिनदार सुधीर खरटमल यांनी वैयक्तिक पंचवीस हजारांची देणगी जाहीर केली.
देश उभा करण्यासाठी ताकदवान समाजाची गरज असते, असे सांगताना शिंदे म्हणाले, की आपला वीरशैव कक्कय्या समाज दलितांमधील अल्पसंख्याक समाज आहे. हा समाज गरीब, कष्टकरी, अर्धपोटी असला तरी कोणापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. कष्ट आणि धडपड करून स्वकर्तृत्वाने पुढे येत आहे. आपण सहा वर्षाचे असताना आपले वडील निवर्तले. त्यानंतर माझ्या दोन आईंनी कष्ट करून मला मोठे केले. त्या मात्र हातात कटोरी घेऊन फिरल्या असत्या तर मलाही तसेच करावे लागले असते, असे सांगताना शिंदे यांना गहिवरून आले.
कक्कय्या समाजातील अनेक तरुण उच्चविद्याविभूषित झाले असून, हे तरुण समाजाच्या कार्यासाठी, उन्नतीसाठी शिवधनुष्य पेलण्याचे काम करीत आहेत. त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकताही शिंदे यांनी प्रतिपादन केली. समाज विशिष्ट वळणावर असून समाजाला ताठ मानेने उभे करण्याचा प्रयत्न समाजातील काही मंडळी करीत आहेत. ज्या समाजात आत्मचिंतन होते, तो समाज निश्चित प्रगती करतो. काल कक्कय्या समाज अज्ञानात, दारिद्रय़ात होता. आज तो सुशिक्षित, सुसंस्कृत व गुणवत्ताधारक बनला आहे. आपल्याला आपले काम कसलाही गाजावाजा न करता पुढे न्यावयाचे आहे. आधी करावे, मग सांगावे या तत्त्वाचा अंमल करावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
समाजातील विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी मारलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५०१ रुपयांची आर्थिक मदतही शिंदे यांनी जाहीर केली. या वेळी पत्रकार खोरे यांच्यासह सुधीर खरटमल, गोरोबा सावळकर यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास जाई जुई विचार मंचच्या संस्थापिका प्रणिती शिंदे, हणमंत सोनवणे, सतीश खरटमल, डॉ. तानाजी कटके, बाळासाहेब साळुंके, सतीश जाधव, मीनाक्षी सोनवणे, विलास व्हटकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.