Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग देण्याबाबत बैठक होणार
कागल, १४ जून / वार्ताहर

सहावा वेतन आयोग नगरपालिका कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू व्हावा, या मागणीशी आपण तत्त्वत: सहमत असून, अधिवेशन समाप्तीनंतर त्याच दिवशी बैठक बोलावून सहाव्या वेतन आयोगासह जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन नगरविकास खात्याचे राज्यमंत्री हसन

 

मुश्रीफ यांनी येथे दिले.
कोल्हापूर जिल्हय़ातील नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचा मेळावा कागल येथील शाहू स्मारक भवनात आयोजित केला होता. प्रमुख पाहूणे म्हणून हसन मुश्रीफ उपस्थित होते. तर नगराध्यक्ष अजित कांबळे हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सूर्याजी साळुंखे, जनरल सेक्रेटरी सुनील वाळुंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ भाषणात म्हणाले, नगरविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून पालिका कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न समजून घेतले आहेत. आकृतिबंधामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. अनुकंपासाठी आकृतिबंद असू नये, असा आदेश आपण दिला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, यासाठी आपण सहमत असून विधिमंडळ अधिवेशन समाप्तीनंतर लगेच बैठक घेऊन या मागणीबरोबरच अन्य काही मागण्यांबाबत मार्ग काढला जाईल.
सूर्याजी साळुंखे म्हणाले, सहावा वेतन आयोग लागू करावा, वेतन व पेन्शनसाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, ठेकेदारी बंद करावी, यासह वीस मागण्यांचे निवेदन मुश्रीफ यांना सादर करताना नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जनरल सेक्रेटरी सुनील वाळुंजकर, शंकर आगरकर यांची भाषणे झाली. हिंदुराव पाटील यांनी स्वागत केले, तर सोनुले यांनी प्रश्नस्ताविक केले.