Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ग्राहकाला आकर्षित केल्याने मटणविक्रेत्यांमध्ये सुरामारी
कोल्हापूर, १४ जून / प्रतिनिधी

कमी दरात मटण देतो असे सांगून ग्राहकाला आकर्षित केले या कारणावरून दोन मटणविक्रेत्यांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यवसन सुरामारीत झाले. त्यामध्ये दोघेजण गंभीररीत्या

 

जखमी झाले. हा प्रकार कसबा बावडा येथे शनिवारी रात्री उशिरा घडला. शाहूपुरी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपावरून तिघाजणांना अटक केली आहे.
कसबा बावडा येथे भोपळे आणि घोलपे यांची मटण विक्रीची दुकाने शेजारी शेजारी आहेत. शनिवारी सायंकाळी शिवाजी आनंदराव घोलपे यांच्याकडे मटण घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला मनोज नामदेव भोपळे याने कमी दरात मटण देतो असे सांगून त्या ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित केले. त्यातून भोपळे आणि घोलपे यांच्यात वाद झाला. हा वाद इतरांनी मिटवला. त्यानंतर रात्री उशिरा हा वाद उफाळून आला. शिवाजी घोलपे, अरूण अमृत घोलपे, संजय बाबासाहेब घोलपे या तिघांनी दुकानातील मटण कापण्याची सुरी घेऊन मनोज भोपळे आणि त्याचा भाऊ विशाल भोपळे यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात भोपळे बंधू गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तातडीने सी.पी.आर. रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघांच्याही बरगडीजवळ सुरीचे वार झाल्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी घोलपेंच्याविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.