Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बनावट सेंद्रिय खत जप्त
कोल्हापूर, १४ जून / प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील तामगाव येथे करवीर पोलिसांनी आज सकाळी छापा टाकून बनावट सेंद्रिय खत तयार करणारा गोरखधंदा उघडकीस आणला. पांडुरंग सदाशिव नलगे (वय ३२ रा.साकोली

 

कॉर्नर कोल्हापूर) याला अटक करण्यात आली असून बनावट सेंद्रिय खतांची ७ पोती आणि कच्चा माल पोलिसांनी जप्त केला आहे. याच परिसरात अशाच प्रकारचा बनावट सेंद्रिय खत तयार करण्याचा उद्योगही पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मात्र संबंधित पसार झाला आहे.
तामगाव येथे एके ठिकाणी बनावट सेंद्रिय खत तयार केले जात आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आज तेथे छापा टाकला. हा उद्योग पांडुरंग सदाशिव नलगे हा करत होता. वाळू, माती, थोडय़ाफार प्रमाणात युरिया आणि इतर घटक मिसळून बनावट सेंद्रिय खत तयार केले जात होते. पाच किलोची एक पिशवी पांडुरंग नलगे हा ३६० रूपयांना विकत होता. शेतकऱ्यांना चक्क तो मातीच विकत होता. पोलिसांनी ७ पोती बनावट खत आणि इतर कच्चा माल यावेळी जप्त केला.
पांडुरंग सदाशिव नलगे आणि घाटगे नावाचा एक इसम तामगाव येथेच वेगवेगळ्या ठिकाणी बनावट सेंद्रिय खत तयार करीत होते. विशेष म्हणजे नलगे आणि घाटगे या दोघांनी काही दिवसांपूर्वीच दोन ट्रक भरेल इतके बनावट सेंद्रिय खत परगावी पाठविले आहे. बनावट बियाणे विकून यापूर्वी अनेकांनी शेतक ऱ्यांची फसवणूक केली आहे. आता सेंद्रिय खत म्हणून चक्क माती आणि वाळू विकण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे शेतकरीवर्गात खळबळ उडाली आहे. पांडुरंग नलगे याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घाटगे हा पसार झाला आहे.