Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हुपरीत रस्ता डांबरीकरणासाठी कामे बंद पाडण्याचा इशारा
इचलकरंजी, १४ जून / वार्ताहर

कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ३० फुटी रस्ता जागोजागी खराब झाल्यामुळे उद्योजक, कामगार, ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. चांदीनगरी हुपरी ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे प्रदीर्घकाळ रेंगाळलेले डांबरीकरण करण्यासाठी औद्योगिक

 

वसाहतीतील कामे बंद पाडण्यात येतील असा इशारा हुपरीचे पंचायत समिती सदस्य संजयकुमार गाठ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिल्व्हर झोनपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण कामास मंजुरी मिळाली आहे. या वसाहतीसाठी हुपरी, यळगूड, तळंदगे या गावांची मोठय़ा प्रमाणात जमीन गेली आहे. मात्र चांदीनगरी हुपरी शहराला जोडणारा रस्ता करण्यासाठी राज्य औद्योगिक विकास महामंडळ दुर्लक्ष करीत आहे.
यळगुड-हुपरी येथील जवाहर साखर कारखाना, व्यंकटेश सूतगिरणी येथून औद्योगिक वसाहतीत प्रवेश करण्यासाठी मुख्य मार्ग आहे. सुमारे दीड किमी अंतराचा ३० फुटाच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे, मोठे दगड यांचेच साम्राज्य आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा तारांकित दर्जाच्या असतील असे शासन म्हणते पण इथे तर संपूर्ण रस्ताच हरवला आहे. औद्योगिक वसाहतीमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यामुळे रस्त्यावरील ताण, आठवडा बाजाराची गर्दी कमी होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही घटणार आहे याकडे गाठ यांनी लक्ष वेधले.