Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

टेंभूयोजनेसाठी जल आयोगाची मान्यता अंतिम टप्प्यात - प्रतीक पाटील
आटपाडी, १४ जून / वार्ताहर

टेंभू योजनेसाठी केंद्रीय जलआयोगाची मान्यता अंतिम टप्प्यात असून या मान्यतेचा पाठपुरावा करण्यासाठी पाटबंधारे खात्याचा अधिकारी नेमणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड

 

उद्योग राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दिली.
आटपाडी पंचायत समितीच्या आवारात खानापूर- आटपाडी तालुक्यांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून प्रतीक पाटील बोलत होते. अटीतटीच्या निवडणुकीत आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार अनिल बाबर व तानाजी पाटील यांच्या सहकार्यामुळे या परिसरातून मताधिक्य मिळाल्याचे सांगत प्रतीक पाटील म्हणाले की, पाणीप्रश्न मार्गी लावण्यास प्रश्नधान्य देणार आहे. एआयबीपीच्या माध्यमातून सिंचन योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी व जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आढावा बैठकांचे प्रत्येक तालुक्यात आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून केंद्रीय राज्यमंत्रिपदामुळे वाढलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
माजी आमदार अनिल बाबर म्हणाले की, ऑक्टोबर महिन्यापर्यंत टेंभू योजनेसाठी जलआयोगाची मान्यता मिळाल्यास एआयबीपीतून या योजना पूर्तीसाठीचे प्रयत्न मार्गी लागतील. सांगली लोकसभा मतदारसंघातील १७६ गावे या योजनेत समाविष्ट आहेत. त्यांना पाणी मिळेल. आटपाडी तालुक्यात पाणी येण्यासाठई २६५ कोटी रूपयांची गरज आहे. टेंभू योजनेसाठी विजेची पूर्तता करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. शेततळी, बंधारे व गावठाण वाढीबाबतही त्यांनी सूचना केल्या.
जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी स्वागत व प्रश्नस्ताविक केले. या बैठकीत दिघंची येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपाध्ये यांच्याबद्दल गंभीर तक्रारी झाल्याने त्यांच्या बदलीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गोकुळ मवारे यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवनाच्या दुरवस्थेकडे विलास खरात यांनी लक्ष वेधल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी या बैठकीनंतर पाहणी करून संरक्षक भिंत व अन्य सुविधा देण्याचे आश्वासन दिले.
तसेच तालुक्यात स्टेट बँकेची शाखा सुरू करावी, जलस्वराज्य काम, रस्ता, बंधारे, विहिरीचे प्रस्ताव, दूरदर्शन केंद्र, राजेवाडी तलावाचे पाणी आटपाडी तालुक्याला मिळावे व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे या व अन्य मागण्या करण्यात आल्या. विलास खरात व राजेंद्र खरात यांनी दारिद्रय़ रेषेखालील चुकीची यादी २००१ ला जाहीर झाल्यानंतर सुधारित यादीतील नागरिकांचा त्यात समावेश झाला नसल्याची तक्रार केली.
या प्रकरणावरून गोंधळ उडाला. पाटील- देशमुख व चारचाकी वाहने असणाऱ्यांचा समावेश या यादीत असल्याचा आरोप राजेंद्र खरात यांनी केला. जनता दलाचे आबा सागर यांनी खासगी शिकवणी घेणाऱ्या नोकरदारांवर कारवाईची मागणी केली. खरसुंडी तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्ते करण्याची मागणी पश्चिम भागातून करण्यात आली.
या बैठकीस आमदार सदाशिवराव पाटील, तानाजी पाटील, हणमंतराव देशमुख, राजाराम देशमुख, श्रीमती शैलजा पाटील, रामचंद्र पाटील, प्रदीप पाटील, सभापती श्रीमती रूक्मिणी खंदारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब वाघमोडे व अण्णासाहेब पत्की यांच्यासह सर्व खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आभार मानले.