Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पाणी परिषद यशस्वी करण्याचे नागनाथअण्णांचे आवाहन
आटपाडी, १४ जून/वार्ताहर

ब्रिटिशांविरुद्धचा लढा यशस्वी ठरला, परंतु दुष्काळग्रस्तांना पाणी मिळाले याकरिता १६ वर्षे सुरू असलेला लढा दुर्दैवाने अद्याप संपलेला नाही. पाण्यासाठी चाललेला हा लढा यशस्वी करण्यासाठी २९ जून रोजी होणारी पाणी परिषद यशस्वी करण्याचे आवाहन क्रांतिवीर नागनाथ अण्णा

 

नायकवडी यांनी केले.
येत्या २९ जून रोजी भवानी विद्यालयाच्या मैदानावर पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने होणाऱ्या पाणी परिषदेच्या पूर्वतयारी निमित्त बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, डॉ. भारत पाटणकर, वैभव नायकवडी, डॉ. बाबुराव गुरव, महादेव देशमुख, नाथा बाड, व्ही. एम. देशमुख, आनंदराव शेंडे, शिवाजीराव काळुंगे व चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेली १६ वर्षे सरकारशी सरळपणे वागला त्याचा गैरफायदा सरकारने घेतला. याबद्दल खंत व्यक्त करीत क्रािंतवीर नागनाथ नायकवडी यांनी आता लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करून पाणी परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख म्हणाले, सरकारशी संघर्ष करण्यात आपण कमी पडलो असलो तरी दुष्काळग्रस्तांकडे मतपरिवर्तन झाले. लढा नसता तर दुष्काळग्रस्तांकडे शासनाने लक्ष दिले नसते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व सुशीलकुमार शिंदे दुष्काळी भागातून निवडून गेले आहेत. हा भाग व तुरीच्या खोऱ्यातील पाणीप्रश्नांना त्यांनी न्याय द्यावा.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, गौसी खुर्द प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्पाचे तसे काम झाले. त्याप्रमाणे तुरीच्या खोऱ्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प समजून त्यास खास बाब म्हणून निधी द्यावा. सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता नाही तर कधीच नाही असा निर्धार करीत दुष्काळग्रस्तांचा लढा यशस्वी करण्यासाठी मोठय़ा संख्येने पाणी परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी पाणी परिषदेत मांडण्यात येणाऱ्या तीन ठरावांचे वाचन डॉ. पाटणकरांनी केले. पाणी खासगीकरण करू नये. ए.आय.बी.पी.तून टेंभू व अन्य योजना पूर्ण कराव्यात. डिसेंबर २००८ मध्ये मंजूर केलेल्या १०७५ कोटी रुपयांपैकी ३७५ कोटी मिळाले उर्वरित ७०० कोटी तातडीने द्यावेत. या शिवाय कृष्णा खोऱ्यातील योजनांसाठी १५०० कोटी रुपये कर्जरूपाने उपलब्ध करून त्या पूर्ण करण्याची मागणी झाली.
या प्रसंगी डॉ. बाबुराव गुरव, वैभव नायकवडी, आनंदराव शेंडे, व्ही. एम. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी ‘पाणी आमच्या हक्काचे, शेतात पाणी बघणार मगच चळवळ थांबवणार’ अशा घोषणा देण्यात आल्या.