Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी ठोकले शाळेला टाळे
कागल, १४ जून / वार्ताहर

तालुक्यातील करनूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रश्नथमिक शाळेचे मुख्याध्यापक झाकिर मुल्ला यांची तत्काळ बदली करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला टाळे ठोकले. दुपारी आलेल्या शिक्षक संघटनेचे पदाधिकारी वसंत पाटील, बी.सी.पाटील यांनी

 

ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर शाळेचे टाळे काढले. मात्र वेळोवेळी तक्रार करूनही मुल्ला यांची बदली होत नाही याबद्दल ग्रामस्थांत उलटसुलट चर्चा सुरू होती.
झाकिर मुल्ला हे गेल्या तीन वर्षापासून करनूर प्रश्नथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शाळेत वेळेवर न येणे, मुलांना न शिकवणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्याबाबत ग्रामस्थांच्या असून त्यांची बदली व्हावी यासाठी यापूर्वीही ग्रामस्थांनी बऱ्याचवेळा प्रयत्न केले आहेत; मात्र हे सर्व प्रयत्न फोल ठरले आहे. गेल्या महिन्याच्या २५ तारखेस ग्रामपंचायतीने मुल्ला यांची बदली व्हावी यासाठी पंचायत समितीला पत्र पाठविले आहे. तर २९ मे रोजी ‘मनसे’ संघटनेने मुल्ला यांची तत्काळ बदलीची लेखी मागणी केली होती. मात्र या अर्जाचा विचारच झालेला दिसत नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी मुल्ला यांच्या निषेधाचा फलक लावून शाळेला ठाळेच ठोकले.
शाळेचा पहिला दिवस असूनही मुल्ला शाळेकडे फिरकले नाहीत. बाळासाहेब पाटील, मानसिंग पाटील, तानाजी चव्हाण, विजय चव्हाण, जयसिंग कांबळे, सौ. दीपाली आवळे, वर्धमान चौगुले, राजमहंमद शेख तसेच सर्व संघटना व तरुण मंडळाचे कार्यकर्ते टाळे ठोकण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र पंचायत समिती अथवा शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेकडे फिरकलेच नाहीत.