Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ
फलटण, १४ जून/वार्ताहर

पवारवाडी (ता. फलटण) येथील सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनेच्या वाहिनीमधील पिण्याच्या दूषित पाण्यामुळे सुमारे ३५० ते ४०० ग्रामस्थांना गॅस्ट्रोसदृश साथीची लागण झाली आहे.

 

पवारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन व विविध ठिकाणच्या व्हॉल्व्हमधील गळतीमुळे पिण्याच्या पाण्यामध्ये दूषित पाणी मिसळल्याने ग्रामस्थांना गेल्या दोन दिवसांपासून गॅस्ट्रोसदृश साथीची लागण झाली आहे. गावातील स्थानिक खासगी दवाखाने, प्रश्नथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे फलटण, बारामती येथील खासगी रुग्णालयात या सर्व रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत असून, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिदक्षता म्हणून ग्रामपंचायतीने एक लाख ७५ हजार क्षमतेच्या पाणीपुरवठय़ाची टाकी पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आहे. तसेच पाईपलाईनची गळतीही तातडीने करण्यात आली असल्याचे ग्रामविकास अधिकारी आढाव यांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस. पी. कुलकर्णी, प्रश्नथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी लीला मदने यांनी गावातील पाणीपुरवठा विहीर, पाण्याची टाकी आणि गळती असणारी पाईपलाईन तसेच व्हॉल्व्हची पाहणी करून दुरुस्तीबाबत सूचना केल्या. तसेच तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांना पोटात दुखणे व जुलाब होत आहेत.