Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

सीईटीमध्ये मुंबई ऑन टॉप
आरोग्य विज्ञानमध्ये शगुन शाह, तर अभियांत्रिकीमध्ये उदित कौशिक सर्वप्रथम
मुंबई, १४ जून / प्रतिनिधी

अभियांत्रिकी, आरोग्यविज्ञान व औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी एकत्रितपणे घेतलेल्या ‘सामाईक प्रवेश परिक्षे’त (सीईटी) मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षेत गोरेगाव येथील पाटकर-वर्दे महाविद्यालयाचा उदित कौशिक-चितालिया २०० पैकी २०० गुण मिळवून राज्यातून पहिला तर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमामध्ये जयहिंद महाविद्यालयाची शगूण ज्योतीन शाह ही १९९ गुण मिळवून राज्यातून पहिली आली. तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे निकाल आज जाहीर केले. अभियांत्रिकीमधील पहिले तिन्ही क्रमांक मुंबईतील विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत.

पद्मसिंह यांना २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी
पनवेल, १४ जून/प्रतिनिधी

‘सत्यमेव जयते’चे फलक घेऊन उभे असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पद्मसिंह पाटील यांच्या समर्थनार्थ आज दबाव तंत्राचे हत्यार उपसले, परंतु पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पनवेल न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पद्मसिंहांच्या सीबीआय कोठडीमध्ये २० जूनपर्यंत वाढ केली. सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ल या अन्य आरोपींना २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सुनावणीसाठी उस्मानाबादहून शेकडो गाडय़ांमधून येथे दाखल झालेल्या पद्मसिंह समर्थकांना पोलिसांनी न्यायालयापासून १०० मीटरवर रोखले. त्यानतंर या समर्थकांनी लांबलचक साखळी करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. दुपारी पाऊण वाजता सीबीआयचे अधिकारी पद्मसिंहांना घेऊन आले, तेव्हा या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत पद्मसिंहांचा जयजयकार केला.

भाजपने हिंदुत्वाचा त्याग करावा मा.गो. वैद्य यांचा सल्ला
नागपूर, १४ जून / प्रतिनिधी

हिंदुत्वाच्या मुद्यावरून सामान्य मतदाराला आकर्षित करण्यात भाजप सपशेल अपयशी ठरल्याने भाजपने हिंदुत्वाचा त्याग करावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पदाधिकारी व ज्येष्ठ संपादक मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. ‘तरुण भारत’ या मराठी दैनिकातील ‘भाष्य’ या साप्ताहिक स्तंभात विद्यमान राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मा. गो. वैद्य यांनी कठोर शब्दात भाजपला हिंदुत्वाच्या धोरणात सातत्य राखण्यात अपयश आल्याची टीका केली आहे. हिंदुत्वाच्या विचारसरणीचा त्याग केल्यास भाजपची संघाशी जुळलेली नाळ आपोआप तुटून जाईल आणि पक्षाला ‘मॉडर्न’ करण्याचा मार्ग मोकळा होईल.

राजकीय पक्ष यापूर्वीच जागृत झाले असते तर ही वेळ आली नसती- शिक्षणमंत्री
मुंबई, १४ जून / प्रतिनिधी

अकरावी प्रवेशात एसएससीच्या विद्यार्थ्यांना ‘न्याय’ देण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आता पुढे सरसावले आहेत. परंतु, या पक्षांनी यापूर्वीच प्रयत्न करायला हवा होता. त्यांनी हा मुद्दा लावून धरला असता तर आजची परिस्थिती ओढवली नसती, असा टोला शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षांना हाणला आहे. एसएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी ९०:१० टक्के कोटय़ाला पाठींबा देण्याची भूमिका शिवसेना, मनसे यांच्यासह भाजपा, लोकभारती, एसएससी शिक्षक-पालक संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इत्यादी संघटनांनी जाहीर केली आहे.

इंग्लंड १५३; हरभजनचे ३ बळी
लंडन, १४ जून / वृत्तसंस्था

फिरकी गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला १५३ धावांवर रोखले. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची झुंज असलेल्या या सामन्यात हरभजनसिंगचे ३० धावांत ३ बळी व या सामन्यात भारतीय संघात स्थान मिळालेल्या रवींद्र जडेजाने २६ धावांत टिपलेले दोन फलंदाज तसेच झहीर व आर. पी. सिंग या वेगवान गोलंदाजांची संयमी गोलंदाजी यामुळे इंग्लंडला १५३ धावांवर रोखण्यात भारताला यश आले. महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. रवी बोपारा (३७) व केव्हिन पीटरसन (४६) यांनी सलामीवीर ल्युक राइट केवळ १ धावा काढून परतल्यानंतर इंग्लंडला अर्धशतकी भागीदारी करून दिली. पण त्यानंतर मात्र इंग्लंडचे फलंदाज क्रमाक्रमाने माघारी परतले. मस्करेन्हासने उपयुक्त २५ धावा केल्या. भारताने अवांतर धावांत मात्र कंजुषी केली नाही. १६ जादा धावा इंग्लंडला मिळाल्या. त्यात १४ वाइड होते. या सामन्यात संधी मिळालेल्या रुद्रप्रताप सिंगने ३ षटकांत केवळ १३ धावा देऊन एक बळी घेत ठसा उमटविला. झहीरनेही २६ धावा देत १ बळी घेतला. इशांत शर्मा व युवराज मात्र महागडे ठरले.

दहावीचं र्वष हे शालेय जीवनातलं अखेरचं र्वष..
महाविद्यालयीन जीवनातल्या यशस्वी पदार्पणासाठीचं महत्वाचं र्वष..
हे पदार्पण अचूक ठरावं, त्यासाठीचं योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी गेली तेरा र्वष ‘लोकसत्ता’ दहावी अभ्यासमालिका चालवतो आहे.. नामवंत शाळांतील ज्येष्ठ अनुभवी शिक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांचं या मालिकेतील लेखन आजवर उपयुक्त ठरत आलं आहे..
२००८ सालच्या शालांत परीक्षेत राज्यात अव्वल स्थान प्राप्त केलेल्या डोंबिवलीच्या स. वा. जोशी विद्यालयाच्या दोघा विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय ‘यशस्वी भव’ला दिलं होतं हे उल्लेखनीय.. ‘यशस्वी भव’ या मालिकेचा अनेक शाळांना निकालाची टक्केवारी वाढण्यासाठी होत असलेला थेट उपयोग हाही महत्वाचा ठरणारा.. विद्याथी , पालक, शिक्षकांमध्ये लोकप्रिय
असलेली ही मालिका यंदा सुरू होते आहे १५ जूनपासून.. आपला अंक अवश्य राखून ठेवा..

पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रांच्या बदलीविरोधात नाशिककर रस्त्यावर
नाशिक, १४ जून / प्रतिनिधी
राजकीय पाठबळामुळे शहरात अर्निबधपणे फोफावलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणारे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्या बदलीविरोधात नाशिककरांचा रोष स्वाक्षरी मोहीम, रास्ता रोको, धरणे आंदोलन यासारख्या विविध माध्यमांव्दारे आज व्यक्त झाला. मिश्रा यांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत शांत न बसण्याचा इशारा राजकीय पक्षांसह विविध संस्था व संघटनांनी दिला आहे. महिन्याभरात नाशिकरोड परिसरात गस्तीवर असलेले पोलीस कृष्णकांत बिडवे यांची टोळक्याकडून हत्या, सिडको परिसरात ४० मोटारसायकली जाळणे, यांसारखे प्रकार घडल्यानंतर जनतेमध्ये उसळलेल्या तीव्र असंतोषाची दखल घेत आयुक्त मिश्रा यांनी गुंडगिरी नेस्तनाबूत करण्यासाठी धडक कारवाई सुरू केली. मोबाईल चोरांच्या टोळीला पकडण्यात आले.

खासदार निधीबद्दल ‘कॅग’चा आक्षेप सुशीलकुमारांनी फेटाळला
सोलापूर, १३ जून/प्रतिनिधी
आपल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीचा वापर न होता तो परत गेल्याचा ‘कॅग’ने ठेवलेला ठपका चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे बोलताना केले. याबाबत आपण ‘कॅग’ला पत्र लिहून जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की २००४ साली आपण राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यानंतर राज्यपाल झालो. जानेवारी २००६ मध्ये केंद्रात ऊर्जामंत्री झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात मार्चमध्ये आपण राज्यसभेवर निवडून गेलो. म्हणजे खासदारपदाचा कालावधी तीन वर्षांचा मिळाला होता. या तीन वर्षांच्या कालावधीत प्रतिवर्ष दोन कोटींप्रमाणे सहा कोटींचा मिळालेला खासदार विकास निधी पूर्णत: खर्च झाला आहे. कॅगने कदाचित आपल्या खासदारपदाचा कालावधी सरसकट पाच वर्षे धरल्यामुळे की काय, हा घोटाळा झाला असावा, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. यापूर्वीही आपण खासदार होतो तेव्हाही आपल्या खासदार निधीतील रक्कम शिल्लक नव्हती. खासदार निधीची रक्कम खर्च होत नाही म्हणून आपण दीडपट विकासकामे सुचवितो. संपूर्ण कामांवरील निधी खर्च झाल्याचा दावा त्यांनी केला.

पवनराजे हत्त्या प्रकरणी पिंटो सिंग गजाआड
मुंबई १४ जून / प्रतिनिधी

कॉग्रेसचे नेते पवनराजे निबांळकर यांच्या हत्त्याप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांना पोलिस कोठडीचा रस्ता दाखवल्यानंतर आज या प्रकरणातील आणखी एका आरोपीला बेडय़ा ठोकण्यात सीबीआयला यश आले असून पिंटो सिंग नावाच्या शार्प शूटरला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. ही माहिती सीबीआयच्या पश्चिम विभागाचे संचालक ऋषीराज सिंग यांनी पनवेल येथे पत्रकारांना दिली. या अटकेमुळे पद्मसिंग पाटील यांच्या भोवतालचा पाश आधिक आवळला गेला आहे. यापूर्वी या प्रकरणात सीबीआयने दिनेश तिवारी, छोटे पांडे, आणि कैलाश यादव या छोटय़ा माश्यांना अटक केले आहे.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी