Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

विलासरावांचे लातूरमध्ये जंगी स्वागत
लातूर, १४ जून /वार्ताहर

केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे मंत्री विलासराव देशमुख यांचे आज लातूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच लातूरमध्ये आले. जिल्हा काँग्रेसने श्री. देशमुख यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. विमानतळावर कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती. विमानतळ सुरू झाल्यानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पहिल्यांदाच कार्यकर्ते उपस्थित होते.

‘सीईटी’मध्ये जालन्याची मिताली राज्यात दुसरी
मराठवाडय़ात तुषार उन्हाळे दुसरा व अक्षय देशपांडे तिसरा

औरंगाबाद, १४ जून /खास प्रतिनिधी

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएच-सीईटी) निकाल आज जाहीर झाला. वैद्यकीय अभ्यासक्रम परीक्षेत जालन्याच्या जे. ई. एस. महाविद्यालयाची मिताली शांतीलाल गोलेच्छा हिने दोनशेपैकी १९८ गुण मिळवून मराठवाडय़ात पहिला व राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा तुषार उन्हाळे राज्यात मागासवर्गीयातून पहिला व मराठवाडय़ात दुसरा आला आहे. त्याला १९५ गुण मिळाले. याच महाविद्यालयाचा अक्षय देशपांडे याने (१९५ गुण) मराठवाडय़ात तिसरा क्रमांक पटकाविला.

गोठलेला टाहो
पायाला मऊशार स्पर्श झाला. खाली वाकून पाहिलं, तर मांजरीचं पिल्लू. उंच शेपटी करून पायांच्या रिकाम्या जागेतून फिरत होतं. बिनधास्त. चांगलंच माणसाळलेलं. हॉटेलमध्ये सतत गिऱ्हाईक येतात-जातात. हे पिल्लू आपलं फिरत राहतं टेबलाखालून. खाली काही पडलेलं वगैरे खात असावं. आपण एकदम जातो घाबरून. त्याला नाही वाटत काही. बिनधास्त. गल्ला सांभाळणाऱ्या मालकाच्या खुर्चीखाली बसतं. पुन्हा काही वेळानं सर्वत्र चक्कर टेबलखालून, खुच्र्याखालून. सर्वाच्या नकळत.

महाविद्यालयातच विद्यार्थिनीची आत्महत्या
नांदेड, १४ जून /वार्ताहर

वैद्यकीय, अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्य आल्यामुळे सुषमा व्यंकट चापके (वय १७) हिने आज महाविद्यालयातल्या स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील सायन्स कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला. शहरातल्या स्वामी विवेकानंदनगर परिसरात राहणाऱ्या सुषमाला दहावीत ७२ टक्के गुण मिळाले होते.

संपर्कमंत्री आमदारांना म्हणाले..
‘चालते व्हा!’

बीड, १४ जून/वार्ताहर

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज अजब घडले. संपर्कमंत्री बबनराव पाचपुते यांनी गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित यांना ‘बैठकीतून चालते व्हा’ असे फर्मावले! श्री. पंडित यांनी सभात्याग करून निषेध नोंदविला. आठ कोटी ७० लाख रुपयांचा निधी परस्पर आष्टी तालुक्यासाठी वळविण्यात आल्यावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्री. पंडित यांनी धारेवर धरताच श्री. पाचपुते चिडले. निधी वर्ग करणे हा आपला अधिकार आहे, असे बजावीत त्यांनी श्री. पंडित यांना ‘बैठकीतून चालते व्हा,’ असे बजावले.

राज्याकडे कदापि दुर्लक्ष होणार नाही - देशमुख
तुळजापूर, १४ जून/वार्ताहर

श्रीतुळजामातेच्या कृपेने जनसेवा करण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारात सामील होण्याची संधी मिळाली तर राज्याकडे लक्ष राहील. तुळजापूरकडेही दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेईन, अशी प्रतिक्रिया अवजड उद्योग खात्याचे मंत्री विलासराव देशमुख यांनी रविवारी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर मंदिर समितीतर्फे आयोजित सत्कारानंतर दिली. विलासराव देशमुख यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी वैशालीताई, चिरंजीव अमित व इतर कुटुंबीयांनी रविवारी तुळजापूर येथे श्रीतुळजाभवानीची पूजा करून दर्शन घेतले. मंदिर समितीतर्फे जिल्हाधिकारी दत्तात्रेय बनसोड, विश्वस्त आमदार मधुकरराव चव्हाण या उभयतांनी श्री. व सौ. देशमुख यांचा शाल, फेटा व देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी नगराध्यक्षा सौ. साखरे, माजी आमदार सि. ना. आलुरे गुरुजी, आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षपदासाठी आघाडीत मतैक्य
तुळजापूर, १४ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपद पुढील अडीच वर्षाच्या कालावधीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीतील पक्षांनी प्रत्येकी १० महिने भूषविण्याचा निर्णय झाल्याची घोषणा शे. का. प.चे जिल्हा सचिव प्रकाशराव देशमुख यांनी काल केली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिलीपराव गंगणे यांची नगराध्यक्षपदी निवड होईल. आघाडीतील पक्ष या निवडणुकीसाठी ‘पक्षादेश’ बजावतील, असेही त्यांनी सांगितले. या पत्रपरिषदेस काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ शिंदे उपस्थित होते. आठ नगरसेवक परागंदा होण्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील, आमदार मधुकर चव्हाण व शे. का. प.चे नेते यांनी बैठक घेऊन यावर तोडगा काढला. यानुसार पुढील अडीच वर्षाच्या कालावधीत अनुक्रमे शे. का. प.- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी १० महिने नगराध्यक्षपद भूषवावे. पहिल्या दोन टप्प्यांत (२० महिने) उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवावे व शेवटच्या १० महिन्यांमध्ये शे. का. प.-काँग्रेस या पक्षांनी पाच महिने प्रत्येकी उपाध्यक्षपद भूषवावे, असे ठरल्याचे नमूद केल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

सीईटी परीक्षेत लातूर पुन्हा आघाडीवर
लातूर, १४ जून /वार्ताहर

वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षेत यशाची परंपरा कायम टिकवत लातूरने याही वर्षी आघाडी घेतली. राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचा तुषार उन्हाळे १९५ गुण घेऊन ‘एन. टी. डी.’ गटात राज्यात पहिला आला. पहिल्या शंभरामध्ये या महाविद्यालयाचे १५ विद्यार्थी आहेत.
अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयाची वैभवी आंबटवार ‘ओ. बी. सी.’ प्रवर्गात राज्यात पहिली आली. अनुसूचित जाती गटात मिखिलेश हाराळे विभागात पहिला व राज्यात तिसरा, एन.टी. १ गटात रोशन किन्होळकर हा विभागात दुसरा, एनटी ३ गटात रश्मी पाळवदे राज्यात नववी आली आहे. दयानंद महाविद्यालयाचा मयूर पोपडे अभियांत्रिकी विभागात १९६ गुण घेऊन महाविद्यालयात पहिला आला. दयानंद, शाहू, महात्मा गांधी महाविद्यालय (अहमदपूर) या तीन महाविद्यालयांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २७५ व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ५०० विद्यार्थ्यांना हमखास प्रवेश मिळेल. राज्यात एका जिल्ह्य़ाचे वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्वाधिक प्रवेश मिळविणारे विद्यार्थी देण्याचा मान लातूरने टिकविला आहे.

दाढ दुखीचा त्रास वाढून युवकाचा मृत्यू
औरंगाबाद, १४ जून /प्रतिनिधी

दाढ दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या जालना जिल्ह्य़ातील युवकाचा मृत्यू झाला. गजानन श्रीराम सोळुंके (वय २४, रा. निंबखेडा) असे या युवकाचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याचा येथील सरकारी दवाखान्यामध्ये मृत्यू झाला. दाढ दुखत असल्यामुळे त्याला उपचारासाठी जालना येथे दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचे दाढ दुखणे थांबले तर नाही उलट त्याला आणखीनच त्रास जाणवू लागला होता. म्हणून त्याला सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आजाराचे निदान होऊ शकले नसल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

छत्र्या दुरुस्त करणाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड
परतूर, १४ जून /वार्ताहर

शहरात गल्लोगल्ली तसेच गावागावात जाऊन छत्र्या दुरुस्त करणाऱ्या कारागिरांवर पावसाअभावी बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच छत्र्या दुरुस्त करणारे कारागीर नव्या जोमाने कामाला लागतात. घरात अडगळीत पडलेल्या जुन्या नादुरुस्त छत्र्या, शाळकरी मुलांच्या छत्र्या दुरुस्त करून घेतल्या जातात. जून महिन्यात शहरात गल्लोगल्ली तसेच ग्रामीण भागात गावागावात जाऊन अनेक कारागीर छत्री दुरुस्तीचा व्यवसाय करतात. या व्यवसायापासून त्यांना दररोज बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होतो. पूर्वी छत्रीशिवाय घराबाहेर पडता येत नसे. अशा वेळी प्रश्नधान्याने छत्री दुरुस्त करून घेतल्या जायच्या. नव्या छत्र्यांच्या वाढत्या किमती पाहता अनेक जण जुनीच छत्री दुरुस्त करून घेणे पसंत करतात. सायकलच्या कॅरियरला अडकलेली आयताकृती लोखंडी पेटी, पुढे हँडलला अडकविलेल्या छत्र्यांच्या फायबरच्या मुठी, काळा कपडा, लोखंडी काडय़ा इतर छत्री दुरुस्तीची साधने घेऊन फिरणारे कारागीर पावसाळ्यात हमखास दृष्टीस पडायचे. परंतु हे चित्र आता पावसाळा लागूनही दिसेनासे झाले आहे. मागील वर्षापासून पाऊस गायब झाल्याने छत्री दुरुस्त करणाऱ्या कारागीरांवरदेखील नियतीची कुऱ्हाड कोसळली आहेत.

पिण्याचे पाणी पुरवण्याचे परतूर पालिकेसमोर आव्हान
परतूर, १४ जून /वार्ताहर

मृगनक्षत्र कोरडे गेल्याने व उपलब्ध पाणीही झपाटय़ाने नाहीसे होत असल्याने शहरवासीयांना पिण्याचे पाणी कसे पुरवायचे असे आव्हान पालिकेसमोर उभे ठाकले आहे. मागील वर्षी या तालुक्यात पाऊस न पडल्याने नागरिकांना वर्षभर कमी-अधिक पाणीप्रश्नाचा सामना करावा लागला. पाणीप्रश्नाने दिवाळीनंतर मात्र गंभीर स्वरूप धारण केले. नोव्हेंबर महिन्यात पाणीपुरवठा एक दिवसाआड तर मार्च महिन्यात तीन दिवसाआड करण्यात आला. परंतु पाणीच उपलब्ध नसल्याने एप्रिल महिन्यापासून पाणीपुरवठा पाच दिवसाआड करण्यात आला. पाणाप्रश्नाची भीषणता कमी न झाल्याने पालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे; परंतु त्यात मोठा गोंधळ उडाला आहे. टँकर उभा करण्याच्या जागा ठरलेल्या नाहीत. जून महिन्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडून पाणीप्रश्न मार्गी लागेल अशी आशा वाटत होती मात्र अद्याप पावसाचे आगमन झाले नसल्याने पाणी प्रश्नाने आता उग्ररुप धारण केले असून उपलब्ध पाणीही संपत असल्याने शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कुठून आणि कसा करावा असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.