Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सीईटीमध्ये मुंबई ऑन टॉप
आरोग्य विज्ञानमध्ये शगुन शाह, तर अभियांत्रिकीमध्ये उदित कौशिक सर्वप्रथम
मुंबई, १४ जून / प्रतिनिधी

अभियांत्रिकी, आरोग्यविज्ञान व औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी एकत्रितपणे घेतलेल्या

 

‘सामाईक प्रवेश परिक्षे’त (सीईटी) मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षेत गोरेगाव येथील पाटकर-वर्दे महाविद्यालयाचा उदित कौशिक-चितालिया २०० पैकी २०० गुण मिळवून राज्यातून पहिला तर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमामध्ये जयहिंद महाविद्यालयाची शगूण ज्योतीन शाह ही १९९ गुण मिळवून राज्यातून पहिली आली.
तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे निकाल आज जाहीर केले. अभियांत्रिकीमधील पहिले तिन्ही क्रमांक मुंबईतील विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत. दुसऱ्या स्थानावर बिर्ला महाविद्यालयाचा अभिषेक पराशर सेन (१९८) व तिसऱ्या स्थानावर मिठीबाई महाविद्यालयाचा केविन विरेश शहा (१९८) आहे. मुलींमध्ये साठय़े महाविद्यालयाच्या तन्वी गोपाळ नाबर (१९८) हिने बाजी मारली आहे. पुण्याच्या माधुरी महेंद्र नागरे (१९७) हिने मागासवर्गीयातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला तर मुंबईतून स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा दादासाहेब पाटील (१९१) हा मागासवर्गीयात महिला आहे. दादासाहेब पाटील याने बारावीच्या परीक्षेतही मुंबईतून मागासवर्गीयांमध्ये प्रथम स्थान पटकावले होते. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांमध्येही राज्यातून पहिल्या व तिसऱ्या क्रमांकांवर मुंबईचे विद्यार्थी आहेत. पहिल्या स्थानावर असलेली शगून शाह (१९९) ही मुलींमध्येही राज्यात पहिली आली आहे. राज्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर जालना येथील जे.ई.एस. महाविद्यालयाची मिताली शांतीलाल गोलेछा तर तिसऱ्या स्थानावर रूईया महाविद्यालयाचा सिद्धांत सत्यप्रकाश शेट्टी (१९६) आहे. मागासवर्गीयांमधून लातूरच्या तुषार प्रभाकर उन्हाळे याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तो मराठवाडा विभागात खुल्या वर्गातून दुसऱ्या स्थानावर आहे. ‘टायब्रेकर’ पद्धतीने ही सीईटीत गुणवत्ता यादी निश्चित करण्यात आली आहे.