Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पद्मसिंह यांना २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी
पनवेल, १४ जून/प्रतिनिधी

‘सत्यमेव जयते’चे फलक घेऊन उभे असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पद्मसिंह पाटील यांच्या

 

समर्थनार्थ आज दबाव तंत्राचे हत्यार उपसले, परंतु पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पनवेल न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पद्मसिंहांच्या सीबीआय कोठडीमध्ये २० जूनपर्यंत वाढ केली. सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ल या अन्य आरोपींना २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या सुनावणीसाठी उस्मानाबादहून शेकडो गाडय़ांमधून येथे दाखल झालेल्या पद्मसिंह समर्थकांना पोलिसांनी न्यायालयापासून १०० मीटरवर रोखले. त्यानतंर या समर्थकांनी लांबलचक साखळी करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. दुपारी पाऊण वाजता सीबीआयचे अधिकारी पद्मसिंहांना घेऊन आले, तेव्हा या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत पद्मसिंहांचा जयजयकार केला. विशेष म्हणजे खासदार संजीव नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे दोन नेते पद्मसिंहांना ‘नैतिक पाठिंबा’ देण्यासाठी सुनावणीस उपस्थित होते.
विशेष सरकारी वकील एजाझ खान यांनी सीबीआयतर्फे युक्तीवाद केला, तर शिरीष गुप्ते, प्रवीण ठाकूर, अशोक मुंदरगी यांनी पद्मसिंहांची बाजू मांडली. सीबीआयतर्फे सुरू असलेल्या चौकशीत पद्मसिंह योग्य सहकार्य देत नसल्याने त्यांच्या सीबीआय कोठडीत मुदतवाढ मागण्यात आल्याचे समजते. या हत्येप्रकरणाच्या अधिक तपासणीसाठी पद्मसिंहांची सीबीआय कोठडी वाढवून मागण्यात आली, अशी माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंह यांनी दिली.
पद्मसिंहांच्या समर्थकांनी न्यायलयाबाहेर दबावतंत्र आरंभले असतानाच अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास, रायगड या संघटनेच्या २०-२५ कार्यकर्त्यांंनी न्यायव्यवस्थेवर विश्वास दर्शविणारे लावलेले फलक लक्षवेधी ठरले.

सीबीआयकडून दबाव
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात कबुली जबाब देण्यासाठी सीबीआयकडून आपल्यावर दबाव आणला जात असल्याचे पद्मसिंह पाटील यांनी पनवेल न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे. आपण काहीही चुकीचे केलेले नसल्यामुळे कबुलीजबाब देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपली प्रकृती ठीक नसल्याने वैज्ञानिक चाचण्यांना सामोरे जाऊ शकत नाही, असेही त्यांनी या अर्जात म्हटले आहे.