Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भाजपने हिंदुत्वाचा त्याग करावा मा.गो. वैद्य यांचा सल्ला
नागपूर, १४ जून / प्रतिनिधी

हिंदुत्वाच्या मुद्यावरून सामान्य मतदाराला आकर्षित करण्यात भाजप सपशेल अपयशी ठरल्याने

 

भाजपने हिंदुत्वाचा त्याग करावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पदाधिकारी व ज्येष्ठ संपादक मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
‘तरुण भारत’ या मराठी दैनिकातील ‘भाष्य’ या साप्ताहिक स्तंभात विद्यमान राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मा. गो. वैद्य यांनी कठोर शब्दात भाजपला हिंदुत्वाच्या धोरणात सातत्य राखण्यात अपयश आल्याची टीका केली आहे.
हिंदुत्वाच्या विचारसरणीचा त्याग केल्यास भाजपची संघाशी जुळलेली नाळ आपोआप तुटून जाईल आणि पक्षाला ‘मॉडर्न’ करण्याचा मार्ग मोकळा होईल. शिवाय भाजपने हिंदुत्व सोडून दिले तर, तृणमूल काँग्रेस, बीजू जनता दल, तेलुगू देसम भाजपकडे वळतील आणि जेडी (यू) ची सुरू असलेली खळखळ बंद होईल, असेही मा.गो. वैद्य यांनी स्तंभात म्हटले आहे. जनसंघाच्या पूर्वेतिहासाचा दाखला देऊन वैद्य यांनी म्हटले आहे की, जनसंघ १९७४-७५ च्या सुमारास स्वबळावर वाढला. जनसंघावर त्यावेळीही फॅसिस्ट आणि जातीयवादी असल्याचे आरोप झाले. जनसंघाचे नंतर भारतीय जनता पक्षात परिवर्तन झाले. पक्ष वाढत गेल्याने सत्ताही जवळ आली मात्र, स्वबळावर सत्ता प्राप्त करण्याइतकी शक्ती भाजपला मिळवता आली नाही. भाजप नेत्यांना धीर धरता आला नाही. हिंदुत्वाचा त्यांना विसर पडला, अशा कानपिचक्याही वैद्य यांनी दिल्या आहेत. २००४ साली सत्ता गमवल्यानंतर भाजपला पुन्हा १९८४ सालाप्रमाणे हिंदुत्वाचा आधार घ्यावासा वाटला आणि हिंदुत्वाच्या मूलभूत धारणेचा आभास निर्माण करणारी घोषणा २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरमान्यात आली पण, सामान्य मतदाराला आकर्षित करण्यात ती अपयशी ठरली, असेही वैद्य यांनी स्तंभात पुढे म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप यांना हिंदू समाजातही मर्यादित स्वीकारार्हता आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. संघ हा संपूर्ण हिंदू समाजासाठी कार्यरत असल्याने संघाला उपदेश करण्याचा प्रत्येक हिंदूला अधिकार आहे, अशी टिप्पणी करतानाच भाजपने हिंदुत्व विचारसरणीचा त्याग करावा आणि असे केल्यास भाजपची संघाशी असलेली नाळ तुटून जाते. भाजप काँग्रेसचा पर्याय म्हणून समोर आल्याने काँग्रेससारखाच का असू नये, असा सवालही वैद्य यांनी केला आहे.

हिंदुत्वाच्या विचारसरणीचा त्याग केल्यास भाजपची संघाशी जुळलेली नाळ आपोआप तुटून जाईल आणि पक्षाला ‘मॉडर्न’ करण्याचा मार्ग मोकळा होईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप यांना हिंदू समाजातही मर्यादित स्वीकारार्हता आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

भाजप काँग्रेसचा पर्याय म्हणून समोर आल्याने काँग्रेससारखाच का असू नये