Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रांच्या बदलीविरोधात नाशिककर रस्त्यावर
नाशिक, १४ जून / प्रतिनिधी

राजकीय पाठबळामुळे शहरात अर्निबधपणे फोफावलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी कठोर

 

पावले उचलणारे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्या बदलीविरोधात नाशिककरांचा रोष स्वाक्षरी मोहीम, रास्ता रोको, धरणे आंदोलन यासारख्या विविध माध्यमांव्दारे आज व्यक्त झाला. मिश्रा यांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत शांत न बसण्याचा इशारा राजकीय पक्षांसह विविध संस्था व संघटनांनी दिला आहे.
महिन्याभरात नाशिकरोड परिसरात गस्तीवर असलेले पोलीस कृष्णकांत बिडवे यांची टोळक्याकडून हत्या, सिडको परिसरात ४० मोटारसायकली जाळणे, यांसारखे प्रकार घडल्यानंतर जनतेमध्ये उसळलेल्या तीव्र असंतोषाची दखल घेत आयुक्त मिश्रा यांनी गुंडगिरी नेस्तनाबूत करण्यासाठी धडक कारवाई सुरू केली. मोबाईल चोरांच्या टोळीला पकडण्यात आले. मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना, समता परिषद, रिपाइं, माकप अशा सर्वच पक्षातील २५ बडय़ा राजकीय गुंडांना तडीपार करण्याची नोटीस काढली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिडवे हत्या प्रकरणातील १४ संशयितांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांत नाशिकमध्ये गुंडांविरूध्द अशी कारवाई प्रथमच झाल्याने सर्वसामान्यांच्या दृष्टीने मिश्रा हे ‘नायक’ झाले. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता यापुढेही ही मोहीम अशीच सुरू राहील असा निर्धार मिश्रा यांनी व्यक्त केला असतानाच त्यांची बदली करण्यात आल्याचे वृत्त येऊन धडकले आणि नाशिककरांमध्ये संतापाची लाट पसरली. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी शहरात आलेल्या मिश्रांची बदली राजकीय दबावामुळेच झाल्याची भावना निर्माण होऊन ही बदली रद्द व्हावी, यासाठी संपूर्ण नाशिककर रस्त्यावर उतरल्याचे चित्र रविवारी दिसले.
भाजपतर्फे सिडकोतील त्रिमूर्ती चौकात रास्ता रोको तर माकपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आल. व्यापारी, उद्योजक व डॉक्टरांनीही उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरत मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दिड तास रोखून धरला. निमाचे रमेश वैश्य, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया, राजन दर्याणी, डॉ. नारायण विंचूरकर यांच्यासह सुमारे तीन हजार जण एकाचवेळी महामार्गावर पोलिसांची धावपळ उडाली. मिश्रांच्या बदलीस ज्या कोणाला विरोध करावयाचा आहे, अशा सर्व नाशिककरांची तसेच संघटना, संस्थांची बैठक सोमवारी सकाळी ११ वाजता सातपूरच्या निमा कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बेळे यांनी दिली. याशिवाय दक्षता अभियान या माजी महापौर प्रकाश मते यांच्या संघटनेतर्फे तसेच भाजप-सेना युतीतर्फे ठिकठिकाणी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहीमेसही नाशिककरांनी तुफान प्रतिसाद देत संताप व्यक्त केला. शहरातील सुमारे २० विविध संघटनांतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून नाशिककरांनी सहपरिवार, सहकुटुंब सामील होण्याचे आवाहन डॉ. गिरधर पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, मिश्रा यांना आपला पूर्ण पाठिंबा असून काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षातील गुंडांची हकालपट्टी करावी, असे आवाहन माजी महापौर दशरथ पाटील यांनी केले आहे. सिडकोत दुचाकी जाळपोळीची घटना घडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चे, बंदचे आयोजन करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. गेल्या दोन वर्षांत शहरात विविध स्वरूपाच्या गुन्हेगारी घटना घडत असताना ही राजकीय मंडळी कुठे गेली होती असा सवालही त्यांनी केला.