Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राजकीय पक्ष यापूर्वीच जागृत झाले असते तर ही वेळ आली नसती- शिक्षणमंत्री
मुंबई, १४ जून / प्रतिनिधी

अकरावी प्रवेशात एसएससीच्या विद्यार्थ्यांना ‘न्याय’ देण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आता पुढे

 

सरसावले आहेत. परंतु, या पक्षांनी यापूर्वीच प्रयत्न करायला हवा होता. त्यांनी हा मुद्दा लावून धरला असता तर आजची परिस्थिती ओढवली नसती, असा टोला शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षांना हाणला आहे. एसएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी ९०:१० टक्के कोटय़ाला पाठींबा देण्याची भूमिका शिवसेना, मनसे यांच्यासह भाजपा, लोकभारती, एसएससी शिक्षक-पालक संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इत्यादी संघटनांनी जाहीर केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर विखे-पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, एसएससीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशात प्राधान्य मिळायला हवे ही राज्य सरकारची व माझीही भूमिका आहे. त्यासाठी ९०:१० कोटा लागू करण्याचा विचार होता. परंतु, तो कायद्याच्या चौकटीत बसायला हवा, असे सांगतानाच राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल रवी कदम यांनी ९०:१० कोटय़ावरील आपले लेखी मत कळविले आहे. परंतु, मी बाहेर गावी असल्यामुळे त्यात कदम यांनी नक्की काय म्हटले आहे, याबाबत स्पष्ट झालेले नाही. उद्या दुपापर्यंत आपण मुंबईत परतणार असून त्यानंतरच त्यांचे मत समजू शकेल, असे विखे-पाटील म्हणाले.
दहावीच्या निकालाची तारीख आज जाहीर होणार
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया व ९०:१०च्या कोटय़ामुळे दहावीचा निकाल लांबणीवर पडत असल्याचा गैरसमज पसरला आहे. त्यामुळे दहावीच्या निकालाची तारीख तात्काळ जाहीर करण्याची सूचना आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा विजयशिला सरदेसाई यांना केली आहे. त्यानुसार सरदेसाई उद्या (सोमवारी) बैठक घेऊन दुपारनंतर दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करतील, असे शिक्षमंत्र्यांनी सांगितले.