Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

प्रादेशिक

मनोगत सीईटीतील गुणवंतांचे
मुंबई, १४ जून / प्रतिनिधी

मुंबईतील दर्जेदार महाविद्यालयांच्या यादीत पाटकर महाविद्यालयाचा गेल्या काही वर्षांपासून आवर्जून उल्लेख केला जातो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीईटी तसेच बारावीच्या परीक्षेत यापूर्वी अनेकदा यश मिळविले आहे. परंतु, पाटकरच्या उदित कौशिक-चितालियाने यंदा २०० पैकी २०० गुण मिळवून राज्यातून पहिला क्रमांक पटकावण्याचा पराक्रम केला. महाविद्यालयाच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमचा विद्यार्थी राज्यात पहिला येईल, असे वाटले नव्हते. हे माझ्या कारकिर्दितील सर्वात मोठे यश असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय माशेलकर यांनी दिली.

राज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आरोग्य उपक्रम
मुंबई, १४ जून/खास प्रतिनिधी

‘राज ठाकरे झिंदाबाद’च्या घोषणांनी आज शिवाजी पार्कचा परिसर दणाणून गेला. निमित्त होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे. सकाळपासून शिवाजी पार्क येथील ‘कृष्ण कुंज’ या राज यांच्या निवासस्थानी मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. या वाढदिवसाच्या निमित्ताने १० रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा कार्यक्रम राज यांच्या हस्ते पार पाडला.

दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणार -शिवानंदन
‘सुरक्षित मुंबई’चा नव्या पोलीस आयुक्तांचा नारा

मुंबई, १४ जून / प्रतिनिधी

वाढत्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी उपाय योजण्याबरोबरच पोलीस दलाची अंतर्गत गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी आज सांगितले. मावळते पोलीस आयुक्त हसन गफूर यांच्याकडून शिवानंदन यांनी आज दुपारी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर वार्ताहरांशी ते बोलत होते. मुंबईवर हल्ला झाला तसेच इतर अनेक ठिकाणीही हल्ले झाले.

आयफा पुरस्कार सोहळा
जोधा-अकबरची सरशी!
राजेश खन्ना यांना जीवनगौरव

मुंबई, १४ जून / प्रतिनिधी

चीनमधील मकाऊ शहरात रंगलेल्या दहाव्या इंडियन इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅकेडमी (आयफा) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावत ‘जोधा-अकबर’ने बाजी मारली. या चित्रपटासाठी आशुतोष गोवारीकर (सवरेत्कृष्ट दिग्दर्शक), हृतिक रोशन (अभिनेता), ए. आर. रेहमान (संगीतकार), जावेद अख्तर (गीतकार), जावेद अली (गायक) यांनी पुरस्कार पटकावले. सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रियांका चोप्राने (फॅशन) मिळवला. या पुरस्कार सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अद्ययावत शस्त्रांचा अभाव, गाफील राहण्याची वृत्ती!
शिशिर गुप्ता, सागनिक चौधरी, श्वेता देसाई

२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यापूर्वी किमान चार महिने आधी एका केंद्रीय गुप्तचर संस्थेने, असा हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याचे मुंबई पोलिसांना कळविले होते. ‘लिओपोर्ट’ असे त्याचे सांकेतिक नाव होते. इतक्या आधी धोक्याची सूचना मिळूनसुद्धा पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा गाफील राहिल्या, अशी नवी माहिती आता उजेडात आली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला- मुंबईला वेठीस धरणारा दहशतवादी हल्ला थोपविता आला नाही.

सहकलावंतांबरोबर काम करण्याचा आनंद हाच जीवनगौरव पुरस्कार - श्रीकांत मोघे
मुंबई, १४ जून/नाटय़ प्रतिनिधी

ज्या नाटककारांच्या नाटकांत मला काम करण्याची संधी मिळाली, त्या सर्व नाटककारांचा मी ऋणी आहे, त्यांच्या शब्दांत प्राण फुंकणे एवढेच आम्हा कलावंतांच्या हाती असते. दुसरे आम्हाला काही येत नाही. त्याचबरोबर सहकलावंतसोबत काम करण्याचा आनंद हाच माझ्यासाठी जीवनगौरव पुरस्कार होता. माझ्या सर्व सहकलावंतांचा, मला साथ देणाऱ्या माझ्या कुटुंबाचा मी ऋणी आहे, नाटय़ परिषदेने आवर्जून आठवण ठेवून आम्हाला गौरविले, त्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत, अशा शब्दांत बुजुर्ग अभिनेते श्रीकांत मोघे यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

आता लढाई प्रवेशाची
मुंबई, १४ जून / प्रतिनिधी

सीईटीचा निकाल जाहीर झाल्यामुळे आता आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लगबग सुरू होणार आहे. तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा स्पर्धा होणार असल्याचे चित्र आहे. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी तब्बल एक लाख ५० हजार ४७७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २७ हजार २१ विद्यार्थी प्रवेशाच्या अर्जसादरीकरणासाठी पात्र ठरले आहेत.

म्हाळगी प्रबोधिनीतर्फे पूरपरिस्थितीवर १६ व १७ जून रोजी जनपंचायत
मुंबई १४ जून / प्रतिनिधी
मुंबईत २६ जुलैसारखी पूरपरिस्थिती पुन्हा उदभवल्यास त्याचा सामना कसा करावा हे सांगण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने येत्या १६ व १७ जून रोजी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ‘जनपंचायती’चे आयोजन केले आहे. या पंचायतीसाठी पालिकेला पाचारण करण्यात आले असले तरी पालिकेला मात्र वेळ नसल्याचे दिसून येत आहे.

सुधागड एज्युकेशन सोसायटीचा सरकारला १६ कोटींचा चुना
मुंबई, १४ जून / प्रतिनिधी

रायगड जिल्ह्य़ातील सुधागड एज्युकेशन सोसायटीने तीन शाळांमध्ये १६२ ऐवजी २१२ शिक्षकांच्या बेकायदा नेमणूका करून राज्य सरकारला तब्बल १६ कोटी रूपयांचा चुना लावला आहे. तब्बल १३ वर्षांपासून या बेकायदा शिक्षकांना राज्य सरकार वेतन देत असल्याचा आरोप ‘बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसद’ या संघटनेचे अध्यक्ष अशोक बहिरव यांनी पत्रकार परिषदेत केला. गैरप्रकारांचे कागदोपत्री पुरावे सादर करून या संस्थेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही बहिरव यांनी यावेळी केली.

बारावीत आघाडी; सीईटीत पिछाडी
मुंबई, पुणे, नागपूर १४ जून / प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत घसघशीत गुण मिळवून कौतुकास पात्र ठरलेल्या अनेक गुणवंतांची सीईटीत मात्र घसरगुंडी उडाली आहे. यापैकी अनेकांना तर दर्जेदार महाविद्यालय मिळणेही मुश्किल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘संत निरंकारी’तर्फे रक्तदान
मुंबई, १४ जून/ खास प्रतिनिधी

जागतिक रक्तदानाचे औचित्य साधून आज संत निरंकारी मंडळाने विलेपार्ले व जे.जे. महानगर रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करून ४६० रक्ताच्या पिशव्या जमा करून दिल्या. याशिवाय राज्यात सांगली, सोलापूर आणि डोंबिवली येथेही निरंकारी मंडळाने रक्तदान शिबिरे आयोजित केली.गेली २० वर्षे संत निरंकारी मंडळातर्फे महाराष्ट्रासह देशात जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून जे.जे. महानगर रक्तपेढीत आयोजित शिबिराच्या उद्घाटनाच्यावेळी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. देवराव डाकूरे यांनी रक्तदान कार्यक्रमांना तसेच राज्य रक्तसंक्रमण परिषदेला एच्छिक रक्तदानाच्या प्रसारासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगितले. यावेळी राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. संजयकुमार जाधव उपस्थित होते.

शायनी आहुजावर विनयभंगाचा आरोप
मुंबई १४ जून / प्रतिनिधी

गॅगस्टार, लाईफ इन मेट्रो या चित्रपटांमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या शायनी आहुजा या अभिनेत्यावर मोलकरणीने विनयभंगाचा आरोप केला आहे. ओशिवरा पोलीस या आरोपाची चौकशी करीत आहेत मात्र रात्री उशिरा पर्यत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.

ऐरोलीत शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखावर गोळीबार
नवी मुंबई १४ जून / प्रतिनिधी

नवी मुंबईत संवेदनशील उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐरोलीत आज रात्री सव्वाआठच्या सुमारास सेक्टर दोनचे शिवसेना उपशाखाप्रमुख कृष्णा नाडर (२५) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करुन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. नाडर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. हा हल्ला पूर्ववैमन्यसातून झाल्याचे रबाले पोलिसांनी सांगितले. ऐरोलीतील सेक्टर दोन मधील मैदानात मित्रांसोबत गप्पा मारत असताना दोन हल्लेखोरांनी जवळ येऊन नाडर यांच्यावर गोळीबार केला.