Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

‘न्यायसिंधु’ साप्ताहिकाचे १८८२ ते ९२ या काळातील दुर्मिळ अंक श्री. शरच्चंद्र कुकडे यांनी नगर येथील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला दिले. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते हा अमूल्य ठेवा संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त सुरेश जोशी यांच्याकडे रविवारी समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आला. यावेळी ‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर जोगळेकर, पुणे व नगर आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, उपनिवासी संपादक महेंद्र पंढरपुरे, अभिजीत बेल्हेकर, श्रीपाद मिरीकर, संग्रहालयाचे अभीरक्षक मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.

.. हा वारसा जपायला हवा - केतकर
नगर, १४ जून/प्रतिनिधी

आपण आपल्या इतिहासाची कदर करीत नाही म्हणून जगाला त्याची माहिती होत नाही. त्यामुळे जगही आपली कदर करीत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी अभिमान बाळगणाऱ्यांनी नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचा वारसा जपायला हवा, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी केले.

‘सीईटी’त श्रीरामपूरची सानिया शेख विभागात पहिली
नगर, १४ जून/प्रतिनिधी

वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश पात्रता परीक्षेत पुणे विद्यापीठ विभागात श्रीरामपूरची सानिया सलीम शेख ही विद्यार्थिनी पहिली, तसेच राज्यात दहावी व मुलींमध्ये तिसरी आली. सानिया ही माजी नगरसेवक सलीम शेख व नगरसेविका सायरा शेख यांची मुलगी आहे. परीक्षेत ती पहिली आल्याचे समजताच श्रीरामपुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे, आमदार जयंत ससाणे, नगराध्यक्ष संजय फंड, उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के आदींनी तिचे अभिनंदन केले.

भूषण भळगट याचे यश
राहुरी - एमएचटी-सीईटी परीक्षेत येथील भूषण संजय भळगट (१९५ गुण) चमकला. विद्यामंदिर प्रशाला या शाळेत इयत्ता बारावी शास्त्र शाखेचा तो विद्यार्थी आहे. पदार्थविज्ञान विषयात भूषणला ५०पैकी ५० गुण मिळाले. पुढील शिक्षणासाठी तो मुंबई येथे सरकारच्या कोटय़ातून जाणार आहे.
त्याचे प्राथमिक शिक्षण साध्वी प्रीतिसुधाजी व डी. पॉल स्कूलमध्ये झाले. दहावी व बारावीच्या परीक्षांतही त्याने मोठे यश संपादन केले. मुळा-प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक माणकचंद भळगट यांचा तो नातू, तर डॉ. संजय व डॉ. माधुरी यांचा मुलगा आहे. बुद्धिबळ, वाचन, सराव परीक्षा, हस्ताक्षर स्पर्धा, नृत्यस्पर्धाचा त्याला छंद आहे. नियमित अभ्यास व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याने हे यश मिळाल्याचे भूषणने सांगितले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.

भीमसेन पाडळकर
राज्यात ओबीसींमध्ये तिसरा

रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या भीमसेन पाडळकर याने सीईटी परीक्षेत राज्यात ओबीसींमध्ये तिसरा क्रमांक मिळविला. ‘जिल्हा मराठा’ संस्थेचे अध्यक्ष प्रा. विलासराव आठरे यांनी त्याचा गौरव केला. या वेळी पदाधिकारी रामनाथ वाघ, जी. डी. खानदेशे, रामचंद्र दरे, टी. एन. दहातोंडे आदी उपस्थित होते.

नगर आकाशवाणी केंद्राला राजभाषा पुरस्कार प्रदान
नगर, १४ जून/प्रतिनिधी

उत्कृष्ट हिंदी कामकाजाकरिता देण्यात येणारा राजभाषा शिल्ड पुरस्कार २००८-०९ नगर आकाशवाणी केंद्राला प्रदान करण्यात आला. नगर राजभाषा कार्यान्वयीन समितीतर्फे टेलिफोन भवन सभागृहात साधना त्रिपाठी (राजभाषा विभाग, गृहमंत्रालय, मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत आकाशवाणीचे केंद्रप्रमुख गोपाळ अवटी यांना बीएसएनएलचे महाव्यवस्थापक एल. एस. रोपिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

असेही साक्षीदार
स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात दारूबंदीचा कायदा होता. पोलीस खात्यात भ्रष्टाचार आता इतका तेव्हा नव्हता. असला तरी तो लक्षात येईल वा डोळ्यात भरेल इतपत मोठय़ा प्रमाणात नव्हता. पोलीस जीव धोक्यात घालूनही कधी कधी हातभट्टीच्या अड्डय़ांवर धाड टाकीत. केस कोर्टापुढे आणीत. सुरुवातीच्या काळात संगमनेर पोलीस स्टेशनमधील एका प्रामाणिक पोलिसाने एकापाठोपाठ सात धाडी टाकल्या. पुराव्याअभावी पहिल्या पाच निर्दोष सुटल्या. सहावी केस सोडताना कोर्टाने संबंधित पोलीस खोटय़ा केसेस भरतो असे धरून त्याला नोकरीतून मुक्त का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस दिली. या नोटिशीस उत्तर देण्याच्या अगोदर सातवी केस चौकशीसाठी त्याच कोर्टापुढे आली.

नाटय़गृहासाठी रंगकर्मी मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावणार
नगर, १४ जून/प्रतिनिधी

‘जिल्हा तिथे नाटय़गृह’ या योजनेतून नगर जिल्ह्य़ाला वगळल्याने अस्वस्थ झालेल्या हौशी रंगकर्मीमध्ये याबाबत शहरातील नवे-जुने राजकारणी, तसेच काही वजनदार व्यक्तींकडून निषेधाचा साधा हुंकारही न उमटल्याची खंत आहे. ती जाहीरपणे व्यक्त न करता या प्रकरणाची सर्व कागदपत्रे व रंगकर्मीचे तपशीलवार निवेदन घेऊन अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष सतीश लोटके आज मुंबईला रवाना झाले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात जवळ्यात ‘बंद’
जामखेड, १४ जून/वार्ताहर

तालुक्यातील जवळे ग्रामपंचायतीची नगर भूमापन क्र. ६४४मधील जागा (मिळकत नंबर ५०५मधील) कांतिलाल जगन्नाथ चव्हाण या सैनिकास जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याच्या निषेधार्थ जवळे गावकऱ्यांनी आज पुकारलेल्या गाव बंद आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. या प्रश्नी गावकऱ्यांच्या भावना तीव्र असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी वस्तुस्थिती न पाहून दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रश्नी गुरुवारी (दि. १८) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

लग्नातील आहेराची रक्कम मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनला
नगर, १४ जून/प्रतिनिधी

मुलाच्या विवाह समारंभात आहेर म्हणून आलेले ७ हजार ८६० रुपये मोलमजुरी करून उपजीविका करणारे ज्येष्ठ नागरिक शेख उमर फैज मोहमद यांनी डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेलफेअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेस देणगी म्हणून दिले. संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. जी. पी. शेख यांच्या हस्ते ही रक्कम संस्थेस प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना डॉ. शेख यांनी मुस्लिम समाजास सुशिक्षित होण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष व उपमहापौर नजीर शेख यांनी संस्था भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात काम करणार असल्याचे सांगताना लवकरच मतिमंद व अपंग मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू करणार आहे. ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी सय्यद इसहाक बापू यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती दिली. सचिव शेख अब्दुल कादिर यांनी देणगीबद्दल आभार मानले. विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांनी संस्थेस मदत देण्याचे आश्वासन दिले. नगरसेवक अयूब शेख, शेख अन्सार उमर, डॉ. शेख सईद आदी या वेळी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षकांचा सराफ सुवर्णकारांतर्फे सत्कार
नगर, १४ जून/प्रतिनिधी

व्यापारी व सराफ पोलिसांना सहकार्य करतील. मात्र, त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, अशी अपेक्षा सराफ सुवर्णकार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे केली. संघटनेचे अध्यक्ष सुभाष मुथा यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी नुकतीच पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. शहरात गुन्हेगारी वाढली. मंगळसूत्र चोऱ्या, भुरटय़ा चोऱ्या वाढल्या. त्याचा तपास लावावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. चोरीचा माल सराफ घेत नाहीत. काही किरकोळ अपवाद असतील, अशा सराफांना संघटना साथ देणार नाही. हे होत असताना पोलिसांनी निरपराध सराफांना त्रास देऊ नये, अशी अपेक्षा मुथा यांनी व्यक्त केली. श्री. चव्हाण यांनी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष कायगावकर, सचिव राजेंद्र वालकर, रसिक कटारिया, प्रदीप कुलथे, श्रेणिक शाह आदी उपस्थित होते.