Leading International Marathi News Daily

सोमवार,१५ जून २००९

कांचनमृग वेळीच हेरायचे असतात!
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर, चर्चा झाल्यावर संसदेचे अधिवेशन आता २९ जूनपर्यंत स्थागित झाले आहे. जुलैमध्ये सुरू झाल्यावर रेल्वेचा व केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाईल व ३१ जुलैपर्यंत तो मंजूरही होईल. आता पुन्हा अपेक्षांचे पेव फुटेल व बाजार वर जात राहील. तत्पूर्वी एक चुणूक म्हणून गेल्या सोमवारी निर्देशांक ४३७ अंशानी खाली आला आणि मंगळवारी ४६१ अंशांनी वरही गेला. सोमवारी पुन्हा खरेदीची संधी अनेकांना मिळाली.
अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षांचे ओझे या शासनाला पेलणारे नाही याची पुन्हा स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. डाव्यांच्या कुबडय़ा गेल्या तरी आघाडीला लंगडे करण्याचे काम आता आतलेच दोन घटक पक्ष करीत आहेत. एका पक्षाला घराणेशाही सांभाळत असता, देशाची प्रतिमा समाजवादी असल्याची जाणीव झाली आहे व निर्निवेशनाला त्याने विरोध दर्शवला आहे. तर पेट्रोल पदार्थाच्या किंमती निर्धारीत न ठेवण्याच्या शक्यतेवर दुसऱ्या पक्षाने नाखुषी दर्शवली आहे. गेल्या जूनमध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ‘शेंडी तुटो वा पारंबी तुटो’ अभिनिवेशाने लढलेल्या नेत्यांचा

 

निर्धार या विरोधापुढे किती टिकेल हे पुढील दोन महिन्यात कळेल.
अर्थसंकल्पात सर्वसमावेशकता (Inclusiveness) आणण्यासाठी रोजगार योजना, आवास योजना, भारत निर्माण, सर्व शिक्षा अभियान या गुळगुळीत योजनांचे मोठे साह्य़ असेल. नेमक्या याच योजनांसाठी ३,३०,००० कोटी रुपयांचा महसूल हवा आहे. म्हणूनच जनतेला समभाग विकायला हवेत. आता वित्तीय तूट कमी करण्यासाठी, पेट्रोल कंपन्यांना तेल रोखे द्यायला लागू नयेत, म्हणून थोडी सुधारणा तिथे करणे आवश्यक आहे, असे ठाम सांगून शासन या दोन्ही गोष्टी करू शकते. ती तळमळ हवी. सामथ्र्य आहे. तळमळीचे। जो जे सांगील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।। असंच याबाबत आम आदमीही म्हणेल. ही तळमळ सगळीकडे हवी पण ती तशी नाही हे अर्थमंत्र्यांच्या बँक प्रमुखाबरोबरच्या १० जूनच्या बैठकीनंतर दिसून आले आहे. ठेवींचे दर वर आहेत या सबबीखाली बँका अजूनही व्याजदर कमी करायला तयार नाहीत. व त्यांची शेपटी शासन, रिझव्‍‌र्ह बँक पिळू शकत नाही. हे आजवर दिसले आहे. माहितीच्या अधिकाराचा वापर करून कुणीतरी कुठल्या विविध दरांना कर्जे व ठेवी आहेत हे विचारले पाहिजे. बँकांचे आजचे नफे बघता बँका सर्वोत्तम व्याजदर १० टक्क्य़ावर सहज आणू शकतील.
सुदैवाने विरोधीपक्षातील भाजप नेहमीच सुधारणावादी असल्याने, यूपीए आघाडीतील वरील दोन्ही पक्षांची ३७ मते मिळाली नाहीत तरीही शासनाला धोका असणार नाही.
शेअरबाजारावर राजकीय परिस्थिती, आंतरराष्ट्रीय घडामोडी, नैसर्गिक आपत्ती वा पावसाळ्यासारखे घटक काम करीत असतात. तरीही यांचा त्यामानाने परिणाम न होणारे संरक्षक (Defensive) शेअर्समध्ये गुंतवणूक असली तर निवेशकांना तशी जोखीम नसते.
१६ मे पूर्वी अस्थिर शासन होते. त्यावेळीही या सदरात लक्ष्मीची पावले कुठे दिसतील त्याचा सतत ऊहापोह करताना, अशा शेअर्समध्ये लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा स्टील, सेंच्युरी टेक्सस्टाईल्स, बॉम्बे डाईंग, स्टेट बँक, पेनिन्सुला लँड, युनिटेक, शिववाणी ऑईल अशांचा सतत पाठपुरावा होता. आज शासन स्थिर असल्याने त्याचे भाव कसे वाढले आहेत ते पुढील आकडय़ांवरून दिसेल. पण जर त्रिशंकू लोकसभा असती तरीही १६ मे पूर्वीच्या भावात घसरण दिसली नसती हेही निर्विवाद आहे. हे शेअर्स आजही over-value वाटले, तरी विक्रीची घाई नसावी. कारण हे हातातून हरणासारखे निसटले की पुन्हा हाती लागणे कठीण असते. असे कांचनमृग वेळीच पकडायचे असतात.
सत्यम कॉम्प्युटर्सने डिसेंबर २००८ च्या तिमाहीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार तिला २००० कोटी रुपयापेक्षा थोडी जास्त झालेल्या विक्रीवर १८१ कोटी रुपये नफा झाला आहे. ही तिमाही राजू बंधूंनी जानेवारीत महाघोटाळा जाहीर केला त्याच्या आधीची आहे. या आकडय़ांची विश्वसनीयता अजून सिद्ध व्हायची असली तरी या नफ्याप्रमाणेच जर वर्षभर नफा झाला तर सत्यम कॉम्प्युटर्सच्या भावात वाढ होईल. सध्या हा भाव ८० रुपयांच्या वर आहे. टेक महिंद्राने ५८ रुपयाला ३१ टक्के नवीन शेअर्स घेतले आहेत आणि आणखी सक्तीच्या २० टक्के शेअर्ससाठी अन्य भागधारकांना त्याच भावाने पुनर्खरेदीचा देकार दिला आहे. सध्याचा भाव कितीतरी बरे असता. कुणीही भागधारक या देकाराला आपले शेअर्स देणार नाहीत.
सत्यमचा कलंकित शेअर, २२ ते ३२ रुपयाला असताना अनेकांना तो निवेशनीय वाटत होता तरी तो घेऊ नये असेच माझे मत होते. त्याऐवजी २३ मार्च २००९ च्या लेखात, टेक महिंद्र २७० रुपयाला मिळत आहे. तो घ्यावा कारण त्यावेळी तो ३.६ पट किं./उत्पन्न गुणोत्तराला मिळत होता. टेक महिंद्र घेतला की सवत्स धेनु पदरात पडणार होती. कारण टेक महिंद्र सत्यम कॉम्प्युटर घेण्याबद्दल लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोपेक्षाही जास्त आक्रमक होती व त्या भावात, सत्यममुळे होणारा फायदा समाविष्ट होता. आज टेक महिंद्र ८०० रुपयांवर गेला आहे. २७० रुपयानंतरही ३००-३२५ रुपये भावाला ज्यांनी टेक महिंद्र घेतला असेल त्यांना आज पावणेतीन पट भांडवल झालेले दिसेल.
आता बहुतेक शेअर्स खरेदीसाठी हाताबाहेर गेले असले तरी मंगलोर रिफायनरीज् व युनिटेक जर ८५ रुपयांच्या मागेपुढे मिळाले तर खरेदी योग्य आहेत. मात्र त्यात लक्षणीय वाढ दिसण्यासाठी वर्षभर थांबायची तयारी हवी.
अर्थसंकल्पात उद्योगक्षेत्रासाठी काही ‘स्टिम्युलस’ असेल अशी शक्यता योजना आयोगाच्या डॉ. माँटेक अहलुवालिया यांनी व्यक्त केली आहे. ते ‘स्टिम्युलस’ आले व सिक्युरिटी ट्रान्झ्ॉक्शन कर जर कमी झाला तर बाजारातला उत्साह वाढेल.
’ वसंत पटवर्धन
फोन : ०२० २५६७०२४०