Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

नवनीत

मेकॉलिफ हा शिखांचा एक कठोर टीकाकार-अभ्यासक. त्याने शीख गुरूविषयक अथवा गुरुग्रंथविषयक लेखन करताना आपला धारवाडी काटा सतत काटेकोरपणे वापरला आहे. तो सहसा श्रद्धेच्या गोष्टी कौतुकाने लिहीत नाही. पण नानकदेव आणि देवदूत यांच्या भेटीविषयी मात्र तो नेहमीची तिरकस भाषा वापरीत नाही. त्याचे निवेदन असे आहे :
‘एके दिवशी नित्यस्नानाला गेलेले नानकदेव जंगलामध्ये अंतर्धान पावले. त्यावेळी ईश्वरस्मरण

 

अथवा ध्यानाच्या सर्वोच्च पातळीवर ते पोहोचले होते. अशा स्थितीत त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराचा साक्षात्कार घडला. त्याने नानकदेवांच्या हाती अमृतपात्र दिले. कृतज्ञतापूर्वक ते ग्रहण करून गुरू नानकदेवांनी देवाची इच्छा जाणून घेतली. देवाज्ञा अशी होती : मी सदैव तुझ्याबरोबर राहाणार आहे. तू यापुढे सदैव निजानंदात रंगून राहाशील. जे तुझे अनुसरण करतील त्यांनाही अद्भुत आनंद मिळेल. तू आता निर्लिप्त वृत्तीने जगात वावरावेस. नामसंकीर्तन करावेस. दान, अर्चना आणि ध्यानचिंतन यातच जीवन व्यतीत करावेस. मी व अमृतपान तुला करविले ते माझे स्नेहप्रेम तू समजून घे.’यानंतर नानकदेवांना जे कवन स्फुरले तेही मेकॉलिफ देतो. त्याचा भाव संक्षेपाने असा आहे : ‘माझे हे तुच्छ जीवन समजा उद्या तुझ्या कृपेने करोडो वर्षांचे झाले. पवन हाच माझा आहारविहार झाला. तरीही मी अशा एखाद्या गुंफेत जाऊन बसेन. जिथे चंद्रसूर्यही मला पाहू शकणार नाहीत आणि मी स्वप्नातही निद्रा न घेता निरंतर तुझा नामजप करीत जागा राहीन. तरीही त्या नामाची थोरवी मला नेमकेपणात शब्दात सांगता येईल वा नाही, शंकाच आहे. तूच खरा निर्गुण-निरंकार, ज्ञानसंपन्न जगत्पालक आहेस. माझे कापून तुकडे केले. गिरणीत घालून त्याचे पीठ केले. मला जाळून टाकून माझी राख केली तरी तुझी नामसेवा मी पूर्ण केली असे होणार नाही.समजा, मी पक्षी होऊन तुझा नामजप करीत अनंत आकाशात नित्य विहार केला, तरीही तुझी सृष्टी पाहून होणार नाही. तुझे नाम अगाधच राहील.नानकदेव अखेर म्हणतात, ‘समजा, मी माझ्या मनाचे लाख लाख कागद तयार करू शकलो आणि तरी तुझे गुणगायन लिहीत बसलो तरी शाई अपुरी पडेल. पवनगतीने लिहीत राहिलो तरी लेखन पुरे होणार नाही. तुझे नाम इतके महान आहे की, मी त्यापुढे सर्वार्थाने लहानच राहाणार आहे.’ देवाशी संवादांच्या अशा आणखीही कविता नानकदेवांनी रचल्या. त्यात ईश्वरतत्त्वाची अनंतता आणि अद्भुतता शब्दबद्ध करण्याचा अत्यंत उत्कट प्रयत्न आहे. मेकॉलिफने तो योग्य रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
अशोक कामत

‘आंतरराष्ट्रीय वार रेषा कशासाठी आखली आहे?
आपला चोवीस तासांचा सौरदिवस हा मध्यरात्री बाराच्या ठोक्याला सुरू होतो. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळय़ा वेळी होते आणि पर्यायाने दिवसाची सुरुवातही वेगवेगळय़ा वेळी होते. पृथ्वी गोल असल्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या दृष्टीने त्याच्या पूर्वेकडे कोणते ना कोणते ठिकाण असतेच. या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात अगोदर झालेली असते. इंग्लंडच्या दृष्टीने भारतात, तर भारताच्या दृष्टीने जपानमध्ये दिवस अगोदर सुरू होतो, तसेच जपानच्या दृष्टीने अमेरिका त्याच्या पूर्वेस असल्याने अमेरिकेत जपानच्या अगोदर दिवस सुरू होतो. या परिस्थितीत पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी दिवस सर्वात प्रथम सुरू होतो हे नक्की करणं व्यावहारिकदृष्टय़ा आवश्यक आहे. हा तिढा सोडविण्यासाठीच आंतरराष्ट्रीय वार रेषेचा वापर केला गेला आहे.
दिवस हा पृथ्वीवर सर्वप्रथम या काल्पनिक वार रेषेवरील मध्यरात्री बारा वाजता सुरू होतो. त्यानंतर या रेषेच्या पश्चिमेकडील प्रदेशात जशी मध्यरात्र होत जाते तशी त्या ठिकाणी नव्या दिवसाला सुरुवात होते. या रेषेच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वारात (किंवा दिनांकात) एका दिवसाचा फरक असतो. ही रेषा जर पूर्वेकडून पश्चिमेकडे ओलांडली तर आपल्याला आपले घडय़ाळ एक दिवस पुढे करावे लागते. याउलट जर ही रेषा पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने ओलांडली तर आपले घडय़ाळ एक दिवस मागे न्यावे लागते. मुख्यत: प्रशांत महासागरातून जाणारी ही रेषा उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडत असून, ती १८० अंशांच्या रेखांशांशी निगडित करण्यात आली. ही रेषा जमिनीवरून नेण्याचे टाळून ती फक्त समुद्रात नेण्यात आली आहे. अन्यथा जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसारच दिवस केव्हा बदलला हे कळलंही नसतं.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

इंग्लंडच्या घटनात्मक इतिहासात ‘मॅग्ना कार्टा’ सनदेला फार महत्त्व आहे. किंबहुना आधुनिक लोकशाहीची पायाभरणी या सनदेमुळेच झाली असे म्हणायला हरकत नाही.दुसऱ्या हेन्रीचा पुत्र रिचर्ड मृत्यू पावल्यावर त्याचा धाकटा भाऊ जॉन याने गादीचा मूळ वारस, आपला पुतण्या आर्थर यास कैदेत टाकून पुढे त्याचा खून केला आणि ब्रिटनच्या राजगादीवर आरूढ झाला. तो अत्यंत जुलमी, विश्वासघातकी होता. प्रजेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून स्वत: ऐषआरामात राही. त्यातच त्याने पोपशी पंगा घेतला आणि फ्रान्सबरोबरही युद्ध पुकारले.राजा युद्धात गुंतलेला पाहून इंग्लंडमधल्या सरदारांनी एकत्र येऊन राजसत्तेला मर्यादा घालण्याचे ठरविले. सामान्य लोकांचाही त्यांना पाठिंबा मिळाला. आर्चबिशप स्टिव्हन लॅग्टन यांचे मार्गदर्शन सरदारांना लाभले. पहिल्या हेन्रीने दिलेल्या स्वातंत्र्याच्या आधारावर मॅग्ना कार्टाची सनद बनवण्यात आली आणि ती राजापुढे ठेवण्यात आली. तेव्हा त्याने या सनदेवर सही करण्यास नकार दिला. उलट पोपशी समझोता करून सरदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. पण हे सारे प्रयत्न निष्फळ ठरल्यावर सनदेवर सही करण्याशिवाय त्याच्यापुढे कोणताच पर्याय नव्हता. अखेर रन्नीमीड येथे १५ जून १२१५ रोजी जॉनने मॅग्ना कार्टाच्या सनदेवर नाईलाजाने सही केली.इंग्लंडच्या राज्यघटनेत या सनदेला महत्त्व आहे. कारण कायद्याचे राज्य ही संकल्पना राजाने मान्य केली, तसेच २५ सरदारांचे निरीक्षण मंडळ नेमून राजाने या सनदेचा भंग केल्यास राज्यकारभार या निरीक्षण मंडळाने हाती घ्यावा, असे एक कलम असल्याने या सनदेला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले होते. पुढे राजा या सनदेचा भंग करणारच होता, पण त्याचा मृत्यू झाल्याने पुढचा अनर्थ टळला.
संजय शा. वझरेकर

राजाचे गणवेशातले सैनिक एका छोटय़ाशा खेडय़ात आले. चौकशी करीत एका गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचले. शेतकरी आणि त्याच्या तीन कुमार वयाच्या मुलांना बरोबर घेऊन ते गेले आणि राजदरबारात त्यांना उभे केले गेले.
त्या संस्थानचा राजा खूप आजारी झाला. त्याला मूलबाळ नव्हते. राजाचा अंतिम काळ जवळ आला आहे हे ओळखून राजवैद्य नम्रपणे म्हणाले, ‘महाराज, आपण आता राज्याची व्यवस्था करावी. समय कठीण आहे.’
राजाला वारस नसतो तेव्हा नात्यातील घरातला लायक मुलगा दत्तकपुत्र घेतला जातो. सैनिक राजाच्या नातेवाइकांच्या सुयोग्य मुलाचा शोध घेत राज्यभर फिरत होते. त्यांना कळले की, अमुक गावात राजाचा दूरचा नातेवाईक आहे आणि दत्तक घेण्याच्या वयाचे त्याला तीन मुलगे आहेत. म्हणून सैनिक त्या तीन मुलांना आणि त्यांच्या वडिलांना घेऊन उपस्थित झाले होते.
खेडय़ात वाढलेली ती पोरे दरबाराचा थाट, झगमगाट, भव्यता पाहून अगदी बावरून गेली होती. राज्याचे प्रधान त्या मुलांजवळ आले. त्यांनी विचारले, ‘बाळांनो, तुम्ही इथे राजदरबारात का आला आहात हे तुम्हाला ठाऊक आहे का?’
थोरला म्हणाला, ‘न्हाई बा! पण मी काय सुदीक केलं नाही. मला जाऊ द्या.’ मधला म्हणाला, ‘का आलोय काय की बा! पन मला लई भ्या वाटतंय. हितं ग्वाड वाटत न्हाई. घरला जायचंय मला.’
धाकटा मुलगा मात्र प्रधानाच्या नजरेला नजर भिडवून म्हणाला, ‘कशापायी आलोय ते ठावं हाय मला. म्या राजा व्हायला आलोय’. प्रधानजींनी याच मुलाची निवड केली. हा मुलगा म्हणजे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड.
जीवन आपल्यालाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हाच प्रश्न विचारत असते. बाळांनो, इथं तुम्ही कशासाठी आला आहात? आणि आपण जीवनाच्या डोळय़ाला डोळा भिडवून आत्मविश्वासाने सांगायचे असते की, ‘होय, मला ठाऊक आहे की, मी इथं राजा व्हायला आलोय.’ एक गोष्ट नक्की लक्षात असू द्या की, तुमच्यात प्रचंड ताकद आहे. शक्ती आहे. ती जागी मात्र करावी लागते.
आजचा संकल्प- माझ्यात सामथ्र्य आहे याची मी सतत आठवण ठेवेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com