Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

राज्य

शहीद दादा देवरेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाशिक, १४ जून / प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील कारवाईत शहीद झालेले चांदवड तालुक्यातील निमोणचे दादा लक्ष्मण देवरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षण खात्यात हवालदार म्हणून कारकिर्द सुरू करणाऱ्या देवरे यांनी नंतर आपल्या कामगिरीचा ठसा सर्वच क्षेत्रांमध्ये उमटविला. २००७-०८ मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या शांती सेनेत त्यांचा समावेश होता. ऑपरेशन विजय व ऑपरेशन पराक्रममध्ये त्यांनी कामगिरी बजावली. ११ जूनच्या कारवाईत ते शहीद झाल्यानंतर शनिवारी लखनौ छावणी व मुंबईत त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहीण, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.

बारावीच्या मूल्यांकनाबाबत गुणवंतांना वाटते धास्ती!
पुणे, १४ जून/खास प्रतिनिधी

बारावीची परीक्षा असावी की सीईटी, या प्रश्नावर बारावी व सीईटीमधील गुणवंत विभागले असले, तरी एका गोष्टीवर त्यांच्यामध्ये एकमत आहे. ती म्हणजे.. ‘बारावीच्या उत्तरप्रक्रिया मूल्यांकन व गुणदानाच्या प्रक्रियेची आम्हाला धास्ती वाटते. कुणाला कधी किती गुण मिळतील याचा नेम नाही. बोर्डाच्या परीक्षेत गुणवंतांची स्वप्ने ‘क्रॅशलॅण्ड’ होतात. त्यापेक्षा ‘सीईटी’चा संगणकाधारित निकाल अधिक विश्वासार्ह वाटतो!’

उद्योग केंद्रांचे कर्जही माफ करण्याची मागणी
भगूर, १४ जून / वार्ताहर

महात्मा फुले, संत रोहिदास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या सहा महामंडळातील थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना जिल्हा उद्योग केंद्राकडून घेण्यात आलेले कर्जही राज्य सरकारने माफ करण्याची मागणी सुशिक्षित बेरोजगारांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्य़ात आजपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत
पिंपळगाव बसवंत, १४ जून / वार्ताहर

लेव्ही प्रश्नावरून आठवडय़ापासून सुरू असलेला माथाडी कामगारांचा संप अखेर मागे घेण्यात आला असून सोमवारपासून जिल्ह्य़ातील सर्व बाजार समितीत कांद्यांचे लिलाव पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जळगावमध्ये खाशाबा जाधव चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा
जळगाव, १४ जून / वार्ताहर

देशभरातील एकापेक्षा एक वरचढ मल्लांच्या कुस्त्या पाहण्याची संधी जळगावकरांना २० जूनपासून स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार असून येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

डिझेलचे पैसे न देता ट्रक चालक फरार
मनमाड, १४ जून / वार्ताहर
शहराजवळील अनकवाडे शिवारात असलेल्या पेट्रोल पंपावर शंभर लिटर डिझेल भरून पैसे न देता पळून गेलेल्या ट्रक चालकाविरुद्ध मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेला ट्रक येवल्याजवळ पोलिसांना आढळून आला. परंतु चालक व त्याचे दोन सहकारी फरार आहेत.

वाईमध्ये वादळी पावसामुळे नुकसान
वाई, १४ जून/वार्ताहर

तालुक्याच्या पूर्व भागातील कवठे (ता. वाई) परिसरात आज दुपारी झालेल्या वादळी पावसाने घरांचे, शेती व शाळेचे नुकसान झाले. आज दुपारी वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस सुरू झाला. यामुळे गावातील प्राथमिक शाळेचा पत्रा उडून गेला. त्याखाली सापडून दोघे जखमी झाले. काही घरांवरील कौले, पत्रे, उडून गेले. तर काहींच्या घरांचेही मोठे नुकसान झाले. विजेच्या तारांवर मोठमोठाले वृक्ष पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले.

गॅस सिलिंडर गळतीमुळे आग; सात जण जखमी
धुळे, १४ जून / वार्ताहर

साक्रीजवळ राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने भडकलेल्या आगीत बोडकीखडी येथील तीन बालकांसह सात जण गंभीररीत्या भाजले. या सर्व जखमींची प्रकृती चिंतानजक असून त्यांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीत हॉटेल नोकरांसह वेलचंद शांताराम भील (१२), गुरूदास सावळे (१८), राजेंद्र सोनवणे (१२) ही बालके भाजली असून बन्सीलाल मोहिते (५०), विनोदकुमार जुलवा (४०), हुस्मतसिंग संधू (५०), पलविंदरसिंग संधू (३८) या सर्व जखमींवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गंगूबाई हनगळ रुग्णालयात
हुबळी, १४ जून/पी.टी.आय.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.९७ वर्षीय गंगूबाई यांना सर्दी, खोकला आणि ताप या त्रासामुळे गेल्या आठवडय़ात रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्यांना काल अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. आणखी काही दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवून नंतर बाहेरील कक्षात हलविण्यात येईल, असे सांगण्यात आले.

महामार्गावर गतिरोधकासाठी ' रास्ता रोको '
नवापूर, १४ जून / वार्ताहर
राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील रायंगण नदी पूल तसेच चिंचपाडा गाव ते रेल्वे फाटक यादरम्यानच्या धोकादायक वळणावर आणि मासलीपाडा ते बर्डीपाडा या दरम्यान काटकोबी वळणावर वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक निर्माण करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुलाचे कठडे तुटले असताना त्याची दुरूस्ती केली जात नाही तसेच अपघात प्रवणक्षेत्र असल्याचे निर्देशक रेडियम दिशादर्शक फलकही लावण्यात आलेले नाहीत. नवापूर महाविद्यालय, इस्लामपुरा, नाकीपाडा येथे झेब्रा क्रॉसिंग, विसरवाडी, चिंपाडा येथे गतीरोधक व दिशादर्शक फलक लावण्याची मागणी नाईक यांनी केली आहे. सुनील वसावे, मनोज वळवी, आर. सी. गावित, फरीद पठाण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. मात्र रास्ता रोको आंदोलनाला कवडीचीही किंमत न देता अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने असंतोष उफाळला. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रश्न चर्चेद्वारा सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.