Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

क्रीडा

श्रीलंकेची उपान्त्य फेरीच्या दिशेने वाटचाल आर्यलडवर नऊ धावांनी मात
लंडन, १४ जून / वृत्तसंस्था

महेला जयवर्धनेची ७८ धावांची खेळी आणि लसिथ मलिंगा व अजंता मेंडिस यांनी घेतलेले दोन बळी यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेने आयर्लंडला ९ धावांनी नमविले व उपान्त्य फेरीतील आपल्या प्रवेशाचा मार्ग आणखी भक्कम केला. श्रीलंकेने याआधी पाकिस्तानला नमविलेले असल्यामुळे त्यांच्या खात्यात चार गुण जमा आहेत. आता त्यांची न्यूझीलंडविरुद्धची लढत शिल्लक असून ‘सुपर एट’मधील सलग दोन विजय मिळविल्यामुळे त्यांची उपान्त्य फेरीतील संधी वाढली आहे. आयर्लंडचा मात्र हा दुसरा पराभव असल्यामुळे त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल, हे स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानकडून न्यूझीलंडची दांडी ‘गुल’
लंडन, १४ जून / वृत्तसंस्था

सामनावीर उमर गुलच्या रूपात (६ धावांत ५ बळी) पाकिस्तानची गोलंदाजीतील चमकदार कामगिरी व शाहिद आफ्रिदीचा अष्टपैलू खेळ याच्या जोरावर पाकिस्तानने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर एट’मध्ये न्यूझीलंडवर सहा विकेट्सनी मात करीत गुणांचे खाते उघडले.

प्रारंभी बसलेले धक्के किवींना भोवले - गुल
लंडन, १४ जून / वृत्तसंस्था

आमच्या आघाडीच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला प्रारंभीच धक्के दिल्याने आम्हाला विजय मिळविणे सोपे गेले, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल याने सामना संपल्यानंतर व्यक्त केली. उमर गुल याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अवघ्या सहा धावांत पाच बळी घेऊन आपल्या संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. या कामगिरीबद्दल त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकावर प्रभाव आयपीएलचाच
लंडन, १४ जून / एएफपी

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेने आता वेग घेतला असला तरी या स्पर्धेवर त्याआधी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगचा बरावाईट असा दोन्ही स्वरूपाचा ठसा उमटलेला आहे. या स्पर्धेत चमकलेल्या काही चेहऱ्यांनी आपल्या कामगिरीचे श्रेय आयपीएलला दिले आहे. आयपीएलमध्ये खेळल्यामुळेच आपण कामगिरीत सातत्य राखू शकलो, असे ड्वेन ब्राव्हो, तिलकरत्ने दिलशान या खेळाडूंनी मान्य केले आहे.

ब्रेट ली ची निवड पडेल महागात - लॉसन
मेलबर्न, १४ जून /वृत्तसंस्था

आगामी अ‍ॅशेस मालिकेसाठी ब्रेट ली याची निवड ऑस्ट्रेलिया संघाला महागात पडू शकते, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू जेफ लॉसन यांनी व्यक्त केले आहे. संडे टेलिग्राफ या वृत्तपत्राशी बोलताना लॉसन यांनी सांगितले की, ब्रेट ली हा सध्या आपला गोलंदाजीचा सूर पूर्णपणे हरवून बसला आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्याच्या गोलंदाजीत पूर्वीची धार दिसत नाही. त्याची सध्याची गोलंदाजी कसोटी सामन्याच्या मुळीच लायकीची नाही. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियासाठी ओझे ठरेल.

दक्षिण आफ्रिका उपान्त्य फेरीच्या उंबरठय़ावर
लंडन, १४ जून / पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर एट’मधील आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद करीत दक्षिण आफ्रिकेने उपान्त्य फेरीच्या दिशेने आगेकूच सुरू केली असून आता ते फक्त एक पाऊल मागे आहेत. मंगळवारी त्यांची भारताशी अखेरची ‘सुपर एट’ लढत होईल. अर्थात, त्यांनी तीनपैकी दोन सामने जिंकलेले असल्यामुळे त्यांचा उपान्त्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे. दक्षिण आफ्रिकेने आज आपल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर २० धावांनी मात केली. त्याआधी, त्यांनी ‘सुपर एट’च्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडलाही नमविले आहे.

श्रीलंकेविरुद्ध भारतीय महिलांना विजय हवाच!
टॉन्टन, १४ जून / पीटीआय

कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पाच विकेट्सनी पराभूत केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिलांचा संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या लढतीसाठी सज्ज झाला आहे. ‘ब’ गटातील या सामन्यात भारताला विजयाशिवाय पर्याय नाही. पहिल्या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडकडून पराभूत झाला होता. पाकिस्तानविरुद्ध त्यांनी गुणांचे खाते उघडले असले तरी श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तरच उपान्त्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होऊ शकेल.

‘सचिनच आशियाचा ब्रॅडमन’
कराची, १४ जून / पीटीआय

पाकिस्तानचे माजी कसोटीपटू झहीर अब्बास यांना आशियाचे ब्रॅडमन म्हणून अनेकवेळा उपाधी देण्याचा प्रयत्न झाला असला तरी सचिन तेंडुलकरशिवाय हा बहुमान कुणालाही प्राप्त होऊ शकत नाही, असे विधान पाकिस्तानचे माजी कसोटीपटू व निवड समितीचे प्रमुख सलाहउद्दीन अहमद यांनी केले आहे.

रझाकपाठोपाठ नावेद, युसूफही पाकिस्तान संघात
कराची, १४ जून / पीटीआय

सध्या लंडनमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघात आयसीएलमधून आलेल्या अब्दुल रझाकला संधी देण्यात आल्यानंतर आता आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी मोहम्मद युसूफ व राणा नावेद यांनाही पाकिस्तान संघाचे दरवाजे खुले होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी आयसीएलचे राजीनामे दिल्यानंतर आयसीसीने त्यांची संघनिवड करण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे. पाकिस्तान संघ २७ जूनपासून श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. तेथे तीन कसोटी व पाच एकदिवसीय सामने व एकमेव ट्वेन्टी-२० सामना ते खेळणार आहेत.

उद्यापासून कॅरम प्रशिक्षण शिबीर
मुंबई, १४ जून/क्री.प्र.

एक्सलंट कॅरम अ‍ॅकेडमी व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (ना. म. जोशी मार्ग), यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिवसेना नगरसेवक सुनील शिंदे पुरस्कृत होतकरू खेळाडूंसाठी कॅरम प्रशिक्षण शिबिर १६ ते १९ जून, २००९ व कुमार गट (१८ वर्षांखालील मुले व मुली), महिला एकेरी मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा दिनांक २० व २१ जून, २००९ या कालावधीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड, मुंबई- १३ येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबई जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी आपली नावे क्लबमार्फत दिनांक १५ जून, २००९ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान स्पर्धेच्या ठिकाणी नोंदवावीत. कॅरम प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कॅरम खेळाडूंचे मार्गदर्शन लाभणार आहे. एकंदर २०० खेळाडूंचा सहभाग अपेक्षित असणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना चषक व रोख रु. १७,०००/- ची पारितोषिके देण्यात येतील.