Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

व्यक्तिवेध

महाराष्ट्र केडरमधील महत्त्वाकांक्षी आयपीएस अधिकाऱ्याला मुंबईचे पोलीस आयुक्तपद मिळाल्याशिवाय कृतकृत्य वाटत नाही. स्कॉटलंड यार्डची तुलना होणाऱ्या मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान त्याला नेहमीच खुणावत असते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेल्या डी. शिवानंदन यांना याआधी दोनवेळा या पदाने हुलकावणी दिली होती. शिवानंदन यांच्या नावाची फक्त चर्चा झाली. प्रत्यक्षात धनंजय जाधव आणि त्यापाठोपाठ हसन गफूर यांची सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती झाल्यानंतर शिवानंदन यांनी आयुक्तपदाचे स्वप्न पाहणे जवळजवळ सोडून दिले होते. ‘शासन जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडण्यास मी तयार आहे. मुंबईचा आयुक्त नाही झालो तर राज्याचा महासंचालक नक्कीच होऊ’, असा विश्वास ते राज्य गुप्तचर विभागाच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींपुढे व्यक्त करीत असत. मात्र आता शासनाने त्यांच्यावर मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवून एका प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा गौरव केला आहे. १९७६च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले शिवानंदन हे मूळचे तामिळनाडूचे. कोईम्बतूर येथील व्याख्यात्याची नोकरी सोडून आयपीएसमध्ये आलेल्या शिवानंदन यांनी सुरुवातीचा काळ इंटेलिजन्स ब्युरोच्या सेवेत घालविला. कोकणातील

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षकपद मिळाले तेव्हाच खरे तर या तरुण अधिकाऱ्याच्या धडाडीची चुणूक दिसली होती. गडचिरोलीतील नक्षलवादविरोधी विभागाचे उपमहानिरीक्षक असताना नक्षलवादी हल्ल्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी त्यांनी आखलेली व्यूहरचना फायदेशीर ठरली होती. तेव्हाच गृहविभागाचे लक्ष शिवानंदन नावाच्या अधिकाऱ्याकडे गेले आणि मुंबईतील वाढती संघटित गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. खंडणीसाठी दाऊद, छोटा शकील, अरुण गवळी, अमर नाईक टोळीकडून बिल्डर, व्यावसायिकांना दूरध्वनी येत होते. गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुखपद सांभाळताना शिवानंदन यांनी या विभागाची पुनर्रचना करून तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रदीप सावंत यांच्या मदतीने प्रदीप शर्मा, विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, रवींद्रनाथ आंग्रे या चकमकफेम अधिकाऱ्यांवर विश्वास टाकून संघटित गुन्हेगारीचा कणाच मोडून टाकला. विविध टोळ्यांचे तब्बल ३०० गुंड चकमकीत ठार झाले आणि त्यानंतर पुन्हा संघटित गुन्हेगारी डोके वर काढू शकली नाही याचे श्रेय शिवानंदन यांच्या नेतृत्त्वागुणांनाच द्यावे लागेल. एकीकडे गुंडगिरीविरुद्ध जोरदार मोहीम उघडतानाच दुसरीकडे तरुणांनी नशेच्या आहारी जाऊ नये यासाठी महाविद्यालयांतून व सामाजिक संस्थांमधून त्यांनी व्याख्यानेही दिली. सिनेजगत आणि संघटित गुन्हेगारी यांच्यातील संबंध प्रकाशात आणून तत्कालीन हिरेव्यापारी भरत शहा याला गजाआड करण्याची हिंमत दाखविणाऱ्या शिवानंदन यांनी न्यायाधीश जे. डब्ल्यू. सिंग यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे प्रकरणही उघडकीस आणून खळबळ उडवून दिली होती. कंदाहार विमान अपहरण प्रकरण असो वा छोटा राजनवरील बँकॉकमधील हल्ला असो शिवानंदन यांनी आपल्या पद्धतीने तपास करून वाहवा मिळविली. सीबीआयच्या पश्चिम विभागाचे संयुक्त संचालक, त्यानंतर नागपूर आणि त्यापाठोपाठ ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही त्यांनी कामाचा झंझावात कायम ठेवला. नागपूर येथे बलात्काऱ्याला लोकांनी ठार मारल्याचे प्रकरण असो वा भिवंडी येथे पोलीस ठाणे बांधताना मुस्लिम समाजाने केलेल्या विरोधात दोन पोलिसांना नाहक बळी पडावे लागल्याची घटना असो, शिवानंदन यांना शासनाच्या प्रक्षोभास तोंड द्यावे लागले. मात्र प्रत्येकवेळी ते त्यातून तावून सुलाखून निघाले. राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्तपद स्वीकारलयानंतर या विभागाला ‘साइड पोस्टिंग’ संबोधण्याचा प्रघात बंद पडावा यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. थेट सेवेतून इंटेलिजन्स अधिकाऱ्यांची भरती करणे ही त्यांचीच संकल्पना. दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली वावरणाऱ्या मुंबईकरांना शिवानंदन यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.