Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

विविध

पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात ८ ठार, २० जखमी
इस्लामाबाद, १४ जून/पीटीआय

पाकिस्तानच्या ईशान्य भागात डेरा इस्माईलखॉँ या शहरात आज झालेल्या बॉम्बस्फोटात किमान आठजण ठार तर २० जण जखमी झाले. बसस्थानकाजवळील गजबजलेल्या पीर मार्केट भागात हा स्फोट झाला. एका रिक्षामध्ये हा बॉम्ब ठेवला होता. घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी अनेक लोक होते.

पदांचा राजीनामा दिला असला तरी राहणार भाजपातच -यशवंत सिन्हा
हजारीबाग, १४ जून/ पीटीआय

भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा देऊन आपण आपल्यावरील ओझे कमी केले आहे. मात्र आपण पक्षातून काही बाहेर पडणार नाही. आपण दिलेले पदाचे राजानामे स्वीकारल्यामुळे आपण आनंदी आहोत, असे ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेहून आलेल्या माय-लेकीला स्वाईन फ्लू
बेंगळुरू, १४ जून/पीटीआय

अमेरिकेहून आलेली २९ वर्षीय महिला आणि तिच्या तीन वर्षीय मुलीला स्वाईन फ्लू हा घातक संसर्गजन्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे भारतातील ‘स्वाईन फ्लू’बाधितांची संख्या आता १९ झाली आहे.

लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त
नवी दिल्ली, १४ जून/ पीटीआय

दिल्ली विमानतळावर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरू केलेल्या मोहीमेअंतर्गत कस्टम विभागाने कॅमेरे, आयपॉड, डीव्हीडी प्लेयर, डाटा ड्राइव्ह आदी प्रकारच्या लाखो रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्याचे कस्टम (प्रीव्हेंटिव्ह) विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
खुल्या बाजारात सुमारे ८५ लाख रुपये इतकी किंमत या वस्तूंची असून या वस्तू ताब्यात घेण्यासाठी कोणीही व्यक्ती आल्या नाहीत. मुंबई व चेन्नईला तस्करीद्वारे या वस्तू आणल्या जातात तेथून येथील एका मोठय़ा कुरियर कंपनीद्वारे छोटय़ा कुरियर कंपन्यांच्या माध्यमातून त्या वस्तू नेण्यासाठी नोंदणी होते. एकदा का दिल्लीमध्ये या वस्तू आल्या की त्या ग्रे मार्केटमध्ये आणल्या जातात, अशी या प्रकारच्या व्यवहाराची पद्धत असल्याचे सूत्रांनी सांगितले.