Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

सुरक्षा व्यवस्थापनासंबंधी हॉटेल मालकांची परिषद
व्यापार प्रतिनिधी: मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विदेशी पर्यटकांचे निवास असणाऱ्या तीन बडय़ा हॉटेल्सना लक्ष्य केले गेले. देशाची प्रतिष्ठा व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या हॉटेलवर हल्ला करून आर्थिक नाडय़ा आवळण्याच्या दहशतवादी डावपेचांना प्रत्युत्तर म्हणून हॉटेल मालकांनी स्वत:हून पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल अँड रेस्ट्रॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) च्या १५ व्या स्थानिक परिषदेत याच अनुषंगाने ठोस निर्णय अपेक्षित आहे.
या परिषदेचे आयोजन ९ आणि १० जुलै २००९ रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आले असून या परिषदेचा यावेळचा विषय ‘हॉस्पिटॅलिटी सेफ अँड साऊन्ड’ असा असणार आहे. या परिषदेच्या आयोजनाची घोषणा करताना हॉटेल अँड रेस्ट्रॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय)चे अध्यक्ष एस. पी. जैन यांनी सांगितले.
१५ व्या स्थानिक परिषदेचे अध्यक्ष गुरबशिश सिंग कोहली यांनी सांगितले की या परिषदेमध्ये तीन विविध प्रकारचे व्यावसायिक कार्यक्रम असतील त्यात सुरक्षा व्यवस्थापन, व्यवस्थापन खर्च आणि इम्प्रुव्ह युवर बॉटम लाईन यांचा समावेश आहे. यानंतर एक संभाषणात्मक असा परिसंवाद असेल त्यात सरकारी उच्चपदस्थ तसेच पर्यटन क्षेत्रातील दिग्गज सभासदांना संबोधतील. यामध्ये लायसन्स फी, अबकारी कर, एफएसआय, वीज दर, टुरिझमचा विविध राज्यांतील वाढता प्रसार यावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवर म्हणून ट्रायडंट ग्रुप ऑफ हॉटेल्स अध्यक्ष रत्तन केसवानी यांचे भाषण होणार आहे.