Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

अग्रलेख

‘लॉर्ड्स’वर लोटांगण

ट्वेन्टी-२० या अतिझटपट क्रिकेटसाठी अयोग्य ठरवण्यात आलेल्या इंग्लिश संघाने विजिगीषू वृत्तीची प्रचिती देत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला आणि ऐतिहासिक ‘लॉर्ड्स’वर विश्वविजेत्यांचा स्वप्नभंग झाला. वास्तविक लॉर्ड्स आणि भारतीय क्रिकेट

 

संघाचे भावनिक नाते आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून गौरविण्यात येणाऱ्या याच मैदानाच्या साक्षीने २५ जून १९८३ साली कपिलदेवने प्रुडेन्शियल विश्वचषक उंचाविला! भारतीय संघही विश्वविजेता ठरू शकतो, हा विश्वास ‘लॉर्ड्स’ने दिला होता. या ‘लॉर्ड्सक्रांती’नंतर कपिल-गावसकर आदी दिग्गजांनी क्रिकेटविश्वामध्ये भारताला मानाचे स्थान मिळवून दिले. १३ जुलै २००२ साली पुन्हा याच ‘लॉर्ड्स’च्या साक्षीने एकविसाव्या शतकामधील ‘टीम इंडिया’ उदयास आली. युवराज-कैफच्या स्वप्नवत खेळीच्या जोरावर ३२६ धावांचे आव्हान पेलत इंग्लंडला धूळ चारत ‘नॅटवेस्ट’ ट्रॉफी जिंकली. ‘लॉर्ड्स’च्या बाल्कनीमधून कर्णधार सौरव गांगुलीने अंगावरील टी-शर्ट भिरकावून केवळ जल्लोष केला नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या नव्या अवताराचा तो झेंडाच ठरला! कमालीचा आत्मविश्वास, खडतर परिस्थितीतही विजय खेचून आणण्याची वृत्ती, बेधडक खेळात जबाबदारीचे भान ठेवून दाखविलेली परिपक्वता, अशी नवीन ‘टीम इंडिया’ क्रिकेटवर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली. सळसळत्या उत्साहाने भारलेल्या ‘धोनी ब्रिगेड’ने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि क्रिकेटप्रेमाच्या अभूतपूर्व लाटा मुंबईत उसळल्या. ऑस्ट्रेलियाची सद्दी संपवून भारतच आता अव्वल स्थानी झेपावणार, असा विश्वास व्यक्त केला जाऊ लागला. युवोन्मेषाच्या या धडाक्यामुळे सचिन-सौरव-कुंबळे-द्रविड-लक्ष्मण अशा ‘पंचरत्नां’कडील सूत्रे ‘धोनीच्या धुरंधरां’कडे सोपविण्याची मागणी केली जाऊ लागली. ट्वेन्टी-२० च्या निमित्ताने ते ‘सत्तांतर’ झालेही; आणि पुन्हा सर्वाच्या नजरा ‘लॉर्ड्स’वर खिळल्या. २१ जूनला ‘लॉर्ड्स’वर भारतीय संघ आणखी एक विश्वचषक उंचाविणार, असे स्वप्न उराशी बाळगून धोनीच्या कामगिरीवर कोटय़वधी क्रिकेटवेडय़ांच्या आशा होत्या. मुंबई-कोलकात्यामध्ये आहोत की काय, असा प्रश्न पडावा एवढय़ा मोठय़ा संख्येने भारतीय समर्थकांचा जल्लोष ‘लॉर्ड्स’वर होता. सुपर एटच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने १९८३ च्या पराभवाचा वचपा काढला नि त्यापाठोपाठ इंग्लंडने उत्कंठावर्धक लढत जिंकून विश्वविजेत्यांचे आव्हान संपुष्टात आणले. ट्वेन्टी-२० च्या पहिल्या विश्वचषकात याच इंग्लंडच्या ख्रिस ब्रॉडला सलग सहा षटकार खेचण्याची विस्मयकारक कामगिरी युवराजसिंगने केली. त्याचाही हिशोब सव्याज चुकता करण्यात आला. खरं तर सलामीच्या सामन्यात इंग्लंडला अननुभवी हॉलंडकडून पराभवाची नामुष्की सोसावी लागली. काल मात्र त्यांनी चवताळलेल्या वाघाप्रमाणे हल्ला चढविला. कर्णधार पॉल कॉलिंगवूडने सामना संपल्यानंतर त्याचा रहस्यभेद केला. ‘सरावानंतर मैदानात येताना भारतीय समर्थकांनी आमची हुर्यो उडविली. क्रिकेटच्या पंढरीत इंग्लिश संघाला अपमान सहन करावा लागला होता. त्यामुळेच सामन्यापूर्वीच्या बैठकीत आम्ही पेटून उठलो आणि विजयाचा निर्धार केला.’ दुसरीकडे ‘टीम इंडिया’च्या आव्हानामध्ये जान नव्हती आणि त्यामुळेच गतविजेतेपदाची शानही! विश्वचषकाचे जेतेपद राखण्याच्या ईष्र्येने मैदानात उतरलेला संघ कधी दिसलाच नाही. अगदी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यापासून ते इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापर्यंत ‘टीम इंडिया’ अडखळतच होती. कधी सलामीवीरांचे अपयश, तर कधी तिसऱ्या क्रमांकावर कोणता फलंदाज पाठवायचा याविषयीचा संभ्रम. इशांत महागात पडत असताना झहीर-आरपी सिंगसारख्या स्विंग गोलंदाजांचा चार षटकांचा कोटाही पूर्ण न करण्याची चूक. कधी साक्षात युवराजकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण. कालच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तर सर्वावर कडीच झाली. नवख्या रवींद्र जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून धोनीने संघाला जणू स्वयंचीत केले! अर्थात, सामना झाल्यानंतर त्यामधील रणनीती, व्यूहरचना याविषयीचे विश्लेषणात्मक वाद कायमच उफाळून येतात. परंतु, खरा प्रश्न आहे तो संघ व खेळाडूंच्या मानसिकतेचा. ‘धोनीब्रिगेड’च्या देहबोलीवरून विश्वविजेतेपद राखण्यासाठीचा निर्धार कधीच दिसला नाही. याउलट वेस्ट इंडिज व इंग्लंडच्या खेळाडूंनी टिच्चून खेळ केला. मैदानावरील प्रत्येक हालचाली, निर्णयांमध्ये विश्वविजेते असल्याचा आत्मविश्वास, वर्चस्व गाजविण्याची क्षमता सिद्ध करावी लागते. ‘टीम इंडिया’ने त्याची प्रचिती कधी दिलीच नाही. एकच गोष्ट सातत्याने जाणवली, ती म्हणजे सातत्याचा अभाव! नवख्या आर्यलडविरुद्ध रोहित शर्माचे अर्धशतक, तर बांगलादेश व वेस्ट इंडिजविरुद्ध युवराजची फटकेबाजी. या व्यतिरिक्त विश्वविजेतेपदाला साजेसा खेळ करण्यात धोनीसह सर्वच शिलेदार अपयशी ठरले. आखूड टप्प्याच्या गोलंदाजीच्या जाळ्यात कागदावर भरभक्कम वाटणारी भारतीय फलंदाजी अडकली. फलंदाज-यष्टिरक्षक खेळविण्यापेक्षा दर्जेदार यष्टिरक्षक खेळविण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला आणि जेम्स फॉस्टरने चित्त्याच्या चपळाईने युवराजला बाद करून मुख्य अडसर दूर केला. डावपेचांच्या मैदानावरील अशा अंमलबजावणीबरोबर रणनीती आखण्यातही धोनी कमी पडला. वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव पत्करल्यानंतरही धोनीचे वीर सरावसत्र रद्द करून लंडनमध्ये बकिंगहॅम पॅलेसचा फेरफटका मारताना आणि शॉपिंग करताना दिसले. भारतीय माध्यमांच्या ‘पापाराझ्झीं’नी छेडले असता ‘आता आम्ही कधी आणि कसा सराव करायचा, हेसुद्धा माध्यमेच ठरविणार का,’ असा निलाजरेपणाची सीमा गाठणारा प्रतिसवाल युवराजने केला. उपकर्णधार वीरेंद्र सेहवागच्या दुखापतीवरून झालेल्या बेबनावाने संघाला ध्येयापासून भरकटवले. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यापूर्वी सेहवाग मैदानात दाखल झाला. दोन-तीनच चेंडूंचा सामना केल्यावर त्याने अचानक गाशा गुंडाळला. त्यानंतर सेहवागचे स्पर्धेतूनच ‘पॅक्-अप’ झाले! धोनी-सेहवागमधील मतभेदांमुळे संघात दुफळी माजल्याच्या वावडय़ा उठल्या. प्रत्युत्तरादाखल विश्वचषक सुरू होण्यापूर्वी धोनीने कमालच केली. एकी दाखविण्यासाठी संपूर्ण संघाचीच माध्यमांसमोर परेड घडविली. आता स्पर्धेतून बाहेर फेकले गेल्यानंतर धोनीवर टीकेची राळ उठण्यास प्रश्नरंभ झाला आहे. अगदी त्याच्या राजीनाम्यापर्यंतची मागणी करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच सचिन-सौरव-राहुलला बाहेरचा रस्ता दाखविण्याची भाषा करून धोनीच्या नेतृत्वगुणांची कोण प्रशंसा करण्यात आली होती. अगदी अझर, सौरव, पतौडीसारख्या सर्वात यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत त्याला नेऊन बसविण्यात आले. धोनीची तीच हिंमत हेकेखोरपणा ठरत आहे! धडाडीच्या वृत्तीचा हटवादीपणा होऊन धोनीच्या राजवटीवर एकाधिकारशाहीचा शिक्का मारण्यात येत आहे. हे बाऊन्सर चुकविण्यासाठी विश्वचषकातील पराभवाबाबत फारसे वाद निर्माण न करता धोनी जाहीर माफी मागून मोकळा झाला. प्रत्येक सामन्याच्या वेळी दूरचित्रवाणी संचासमोर डोळे लावून बसलेल्या क्रिकेटरसिकांना शल्य पराभवाचे नाही. झुंज देऊन पराभूत झाले असते, तर जिगरबाज खेळाला दाद दिली असती. परंतु २००७ सालच्या एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणेच रणांगणात उतरून न लढताच पराभूत होण्याची मानहानी यंदा ‘धोनीब्रिगेड’ने पत्करली. ट्वेन्टी-२० च्या अलीकडच्या लढतींचा वेध घेतला, तर न्यूझीलंडमधील दोन्ही सामने धोनीने गमाविले. श्रीलंकेतील सामना जिंकला तो केवळ पठाणबंधूंच्या करिष्म्यामुळे. ‘आयपीएल’चा अनुभव पाठीशी असूनही ‘टीम इंडिया’ म्हणून विश्वविजेता भारतीय संघ अजूनही ट्वेन्टी-२० च्या खेळपट्टीवर चाचपडतो आहे. ‘आयपीएल’ आणि विश्वचषक स्पर्धेतील गुणात्मक तफावत या पराभवाच्या निमित्ताने दिसून आली. क्रिकेट हे केवळ रंजनापुरते मर्यादित नसून राष्ट्रीयत्वाच्या भावनेशी ते जोडले गेले आहे. चार-दोन षटकार मारण्यापेक्षा विजयासाठी तुम्ही किती झटता, हे अधिक महत्त्वाचे ठरते. ‘फ्रँचायझी’च्या जाहिरातबाजीमध्ये झळकण्यापेक्षा खडतर परिश्रम करीत सराव करण्यावर भर द्यावा लागतो. खेळ-कौशल्याच्या आधारे विजयश्री मिळविणे महत्त्वाचे. हे मूलभूत ‘भांडवल’ असेल, तरच तुमच्यावर ‘गुंतवणूक’ केली जाते. त्याचप्रमाणे ट्वेन्टी-२० च्या क्षणभंगुरतेमुळे क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अल्पावधीची ठरण्याचा धोका आहे. ‘लॉर्ड्स’वरील या लोटांगणामुळे भारतीय क्रिकेटचे एक वर्तुळ पूर्ण होत आहे. मोहमयी प्रलोभनांच्या खेळपट्टीवर क्रिकेटवरील निष्ठा आणि देशहितासाठी झोकून देण्याचा निर्धार या गुणांच्या जोरावरच ‘लॉर्ड्स’ पुन्हा जिंकता येईल.