Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

झाकीरभाईची तोलामोलाची तबला साथ..
तबल्यावर विजेच्या चपळाईने फिरणाऱ्या आपल्या बोटांनी झाकीर हुसेन यांनी जगालाच वेड लावले. पंजाब घराण्याचे ज्येष्ठ उस्ताद अल्लारखाँ यांना नेहमीच असे वाटत असे की, आपल्या मुलांपैकी एकाने तरी आपली गादी समर्थपणे चालविली..झाकीरला प्रचंड कष्ट करायला लावून त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षांपासून तबल्याची तालिम दिली होती. झाकीरने त्यांचे स्वप्न साकार केलेच, पण पुढे फजल कुरेशी, तौफिक कुरेशी यांनीही अब्बाजान यांचे स्वप्न साकार केले. अल्लारखाँ यांचे सारे कुटुंबच आता तबलामय होऊन गेले आहे, असे म्हटले तर त्यात चूक ठरू नये. डिसेंबर ते फेब्रुवारी हे वर्षांतील तीनच महिने झाकीर भारतामध्ये म्हणजे मुंबईत वास्तव्यास असतो. त्या वास्तव्यात तो आपला सोलो तबला म्हणा किंवा फ्यूजनचा कार्यक्रम म्हणा कुठे तरी व्यासपीठावर दिसतो. मान्यवर गायक व वादकांबरोबर आता त्याचे साथीचे किंवा जुगलबंदीचे कार्यक्रम तुलनेने कमी असतात.

तिबेटमधील सात वर्षे
ऑस्ट्रियामधील गिर्यारोहक हेन्रीच हेरर १९४४ ते १९५१ सालादरम्यान हिमालय मोहिमेवर असतानाच दुसरे महायुद्ध सुरू होते. परिणामी त्यांना तिबेटमध्ये जावे लागले. त्याचवेळी १९५० साली चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तिबेटवर आक्रमण केले. युद्धकैद्यांच्या छावणीत असल्यामुळे तिथून पळून जाण्यासाठी हेन्रीच हेरर तिबेटमध्ये जातात. तब्बल सात वर्षे तिबेटमध्ये राहतात. तिबेट-चीन संघर्ष याचि देही याचि डोळा पाहिल्यानंतर हेन्रीच हेरर यांनी आपले अनुभव ‘सेव्हन इयर्स इन तिबेट’ या पुस्तकात लिहिले आहेत. दलाई लामा यांचीही हेन्रीच हेरर यांनी भेट घेतली होती. १९९७ साली याच नावाचा चित्रपट आला. चित्रपटातही हे भेट दाखविण्यात आली आहे. सत्यकथेवर आधारलेल्या या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते. ब्रॅड पिट, डेव्हिड थ्यूलिस यांच्या प्रमुख भूमिका असून २१ जून रोजी सोनी पिक्स चॅनलवर रात्री ९ वाजता हा चित्रपट पाहायला मिळेल.

‘अरे वा शाब्बास’च्या ऑडिशन्स
मी मराठी वाहिनीवरील अरे वा शाब्बास या आठ ते चौदा वयोगटातील मुलामुलींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमासाठीच्या ऑडिशन्स २० जूनपासून सुरू होत असून २० व २१ जूनला नागपूर, २३-२४ जून रोजी नाशिक, २५-२६ जूनला पुण्यात तर २७ आणि २८ जून रोजी मुंबईत ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत. मुलांमधील उपजत कलागुण दाखविता यावेत म्हणून ‘अरे वा शाब्बास’ या रिअ‍ॅलिटी शोचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. नावनोंदणी सुरू झाली असून त्या त्या शहरांमध्ये ऑडिशन्सच्या दिवशीसुद्धा सहभागी होता येणार आहे. ऑडिशनच्या स्थळांची माहिती मी मराठी वाहिनीवरून सांगितली जाणार आहे.

लिट्ल चॅम्प्स करणार सूत्रसंचालन
झी टीव्हीवर सुरू झालेल्या हिंदी सारेगमप लिट्ल चॅम्प्स या कार्यक्रमाचे वेगळेपण जपण्यासाठी म्हणून लिट्ल चॅम्प्सच्या या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालनही दोन लिट्ल चॅम्प्स करणार आहेत. धैर्य सोरेचा आणि अफशा मुसानी असे दोघेजण १९ जूनच्या भागामध्ये सूत्रधार म्हणून झळकतील. दहा वर्षांच्या धैर्यने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केले असून बालकलाकार म्हमून तीन-चार हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये अफशा मुसानी ही ६ वर्षांची चिमुरडी गाणं गाऊन गेली होती. पण तिचे आत्मविश्वासाने वागणे, बिलकुल न घाबरता कॅमेऱ्याला सामोरे जाण्याची हातोटी पाहून अलका याज्ञिक आणि अभिजीत या दोन्ही परीक्षकांनी तिचे खूप कौतुक केले होते. नंतर कार्यक्रमाच्या संयोजकांनी अफशा मुसानी हिला स्पर्धक म्हणून बोलावण्याऐवजी कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून आमंत्रित केले.

नच धमाल

मी मराठी वाहिनीने ‘नच धमाल’ हा नृत्य सादरीकरणाचा रिअ‍ॅलिटी शो सुरू केला असून या आठवडय़ात बुधवारी आणि गुरुवारी उपान्य फेरी होणार आहेत. बुधवारी रात्री ९.३० वाजता दाखविण्यात येणाऱ्या भागात अभिनेत्री किशोरी शहाणे पाहुणी म्हणून येणार असून हिंदूी-मराठी चित्रपटातील गाजलेल्या अभिनेता-अभिनेत्रींच्या जोडय़ांवर चित्रीत केलेल्या गाण्यांवर स्पर्धक नृत्याविष्कार करणार आहेत. गुरुवारच्या भागात लोकसंगीताच्या थीमवर नृत्य सादर करायचे असून अभिनेता मोहज जोशी स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत.
sunil.nandgaokar@expressindia.com