Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

कोयना भूकंपग्रस्तांना दाखले देण्याचा निर्णय
पाटण तालुक्यात वीजरोधक यंत्रे
सातारा, १५ जून / प्रतिनिधी
भूकंपप्रवण कोयना भागात सातत्याने लहानमोठे धक्के बसत असूनही शासनाने १९९५ पासून बंद केलेले भूकंपग्रस्त असलेले दाखले पुन्हा देण्याचा निर्णय आज विधानसभेत आमदार शंभूराज देसाई यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर राज्याचे पुनर्वसन मदत कार्य राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी जाहीर केला असल्याची माहिती आमदार देसाई यांच्या वतीने देण्यात आली. १९६७ पासून कोयना खोऱ्यातील भूकंपग्रस्तांना दाखले मिळत होते. १९९५ ला ते शासनाने बंद केल्याने भूकंपग्रस्त असूनही लोकांना वंचित राहावे लागत होते.

जनसुराज्य शक्तीने केला भांडाफोड
कोल्हापूर जि.प.ची जीप अधिकाऱ्यांच्या दिमतीला
कोल्हापूर, १५ जून / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दिमतीला असलेली जिप्सी गाडी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खाजगी कामासाठी फिरत असल्याचे सप्रमाण सिध्द करून जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी आज ही जिप्सी गाडी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात आणून लावण्यास भाग पाडले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात गेल्या चार वर्षांत कधीही न दिसलेली ही जिप्सी गाडी कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर जनसुराज्य शक्तीच्या वतीने या गाडीचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

पाण्याच्या मागणीसाठी मंगळवेढय़ात शेतक ऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू
सोलापूर, १५ जून/प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील ३५ गावांना नीरा नदीच्या उजव्या कालव्यातून पाणी मिळावे या मागणीसाठी आजपासून या गावातील सुमारे ४०० शेतकऱ्यांनी मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. पाणी मिळाल्याशिवाय निधीची तरतूद केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी आज व्यक्त केला आहे.

इस्लामपूरचा आराखडा रद्द केल्यावर साखर वाटणाऱ्यांच्या उलटय़ा बोंबा
राष्ट्रवादी पक्षप्रतोदांनी घेतला सूर्यवंशींच्या आरोपांचा समाचार
इस्लामपूर, १५ जून / वार्ताहर
इस्लामपूर शहराचा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करून तो रद्द होताच शहरात साखर वाटणाऱ्या विरोधी गटाचे नगरसेवक बाबा सूर्यवंशी यांची शहराचा विकास खुंटल्याची भाषा म्हणजे ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ असाच प्रकार असल्याची खरमरीत टीका करीत नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद विजय पाटील यांनी सूर्यवंशी यांच्या आरोपांचा समाचार घेतला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा सूर्यवंशी यांनी वार्ताहर बैठकीत नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर विविध प्रकरणात भ्रष्टाचाराचे व अकार्यक्षमतेचे आरोप केले होते.

तरुण व्यवस्थापकाचा खून
सोलापूर, १५ जून / प्रतिनिधी
अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौकातील चव्हाण ऑटोमोबाइल्स येथे जनरेटर मेकॅनिकने तेथील व्यवस्थापकाचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. प्रमोद अशोक पवार (वय २८, रा. विठ्ठलनगर, निराळेवस्ती) असे खून झालेल्या तरुण व्यवस्थापकाचे नाव आहे, तर सर्फराज अब्दुल करीम काझी (रा. सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. चव्हाण ऑटोमोबाइल्स येथे जनरेटर विभागात व्यवस्थापक असलेल्या प्रमोद पवार यांनी, अकलूजला जनरेटर दुरुस्तीसाठी का गेला नाही, असा जाब विचारल्यावरून चिडून मेकॅनिक सर्फराज काझी याने पवार यांच्या पाठीवर व मांडीवर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या पवार यांना श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार चालू असतानाच पवार हे मृत्युमुखी पडले.
याबाबत सुनील तुकाराम चव्हाण यांनी फिर्याद केली असून, जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच. एम. मुंडे हे तपास करीत आहेत.

शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू
सोलापूर, १५ जून/प्रतिनिधी

राज्यातील अनुदानित शासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना (सहावे वेतन) लागू करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष बाबासाहेब काळे आणि पुणे विभागाचे कार्यवाही मोहन पाटील यांनी दिली. सहाव्या वेतन आयोगाच्या संदर्भात शिक्षक परिषदेतर्फे ८ जून रोजी मुंबईत धरणे आंदोलन केले होते. परिषदेचे प्रांताध्यक्ष काळे, परिषदेचे आमदार रामनाथ मोने, आमदार भगवानराव साळुंखे, संजीवनी रायकर, श्रीकृष्ण अवचार यांनी शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी लवकरच शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार शासन निर्णय जाहीर झाला असून, शिक्षक परिषदेच्या प्रयत्नामुळे शिक्षकांना सहावे वेतन लागू झाल्याचा दावा श्री. काळे यांनी केला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षकांनी श्री. काळे (भ्रमणध्वनी ९८२२४३३९२९) किंवा श्री. पाटील (९४२२०६९४२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नगर भूमापन कारभाराच्या चौकशीसाठी लाक्षणिक उपोषण
इचलकरंजी, १५ जून / वार्ताहर
नगरभूमापन कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, दिलीप माणगावकर, शिवाजी ढोले, हेमंत शहा, अनिल खोत, बापूसाहेब बुगड, बी.बी.राजमाने यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.नगरभूमापन कार्यालयातील कामकाजात अनागोंदी वाढली आहे. तेथील दप्तरदिरंगाई व भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांनी स्थानिक कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-ऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याचे आदेश प्रत्यक्ष भेटून दिले आहेत. तरीही दुबार मिळकत पत्रिका, पाच अंकी मिळकतपत्रिका, कागदपत्रातील चुकांची दुरुस्ती, सत्ता-प्रकारआदी अनेक कामे प्रलंबित आहेत. कामे करण्या-साठी आर्थिक लूट केली जाते. असे निवेदन दिले.

पंढरपूरमध्ये अकरा बालकामगारांची सुटका
पंढरपूर, १५ जून/वार्ताहर
ज्या वयात हातात पाटी पेन्सिल घेऊन ‘गमभन’ गिरवायचे, छान गणवेश घालून सवंगडय़ांबरोबर शाळेत जायचे. त्याच वयात हातात दगड माती भरून पाटय़ा टाकायच्या, सेट्रिंगवाले, वीट भट्टीवर हॉटेलात राबायचे, अशा राबणाऱ्या अकरा मुलांची सुटका बालकामगार दिनाचे औचित्य साधून, जिल्हा सत्र न्यायाधीश, उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने शनिवारी दुपारी केली.
शहर परिसरातील वीटभट्टी, हॉटेल, धाबे, बांधकाम करणारे व्यावसायिक आदी ठिकाणी बाल कामगार काम करतात, त्या ठिकाणी सत्र न्यायाधीश रामचंदानी, वरिष्ठ न्यायाधीश मते, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, डोंगरे, देशमुख, उप पोलीस अधीक्षक प्रमोद होनराव शहर पोलीस निरीक्षक बालाजी इंगेवाड यांनी वीट भट्टीवर काम करणारे चार हॉटेल, दुकाने अशा ठिकाणी सात अशा अकरा बाल कामगार आढळून आले.या सर्वाची या कामावरून मुक्तता करून काम करणाऱ्या कष्टकरी आईवडिलांना समजावून सांगून मुलांना शिक्षण द्या, त्यांना शिकू द्या असे सांगितले.

साळी समाज अध्यक्षपदी सुभाष बेलेकर यांची निवड
इचलकरंजी, १५ जून / वार्ताहर
राष्ट्रीय पातळीवरील अध्यक्ष निवडण्यावरून राष्ट्रीय अधिवेशनातच मारहाण झाल्याने वादग्रस्त बनलेल्या अखिल भारतीय स्वकूळ साळी समाजाच्या अध्यक्षपदी सुभाष सखाराम बेलेकर (इचलकरंजी) यांची निवड झाली. रविवारी अ. भा. स्व. साळी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा येथे पार पडली. त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड बिनविरोध व शांततेत पार पडली.राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दावेदार असणारे केशवराव बडवे यांनी माघार घेतल्यामुळे जिव्हाजी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष काजवे यांचा मार्ग मोकळा झाला. मोहनराव एकबोटे (कर्नाटक) यांची सरचिटणीस व श्रीनिवास क्षीरसागर (मुंबई) यांची खजिनदारपदी निवड झाली. राज्यांच्या अध्यक्षांना राष्ट्रीय कार्यकारिणीत उपाध्यक्षपदावर संधी दिली जाते. त्यानुसार उपाध्यक्षपदी बाळासाहेब कांबळे, विजय लोणकर, राजकुमार देवकर, श्यामसुंदर सपाटे यांच्यासह सुमारे ३०० सदस्यांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष डी. एम. चिल्लाळ यांनी निवड निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. मावळते अध्यक्ष पांडुरंग विठ्ठलराव एलिंगे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

जनसेवा संघटनेची उद्या सोलापुरात बैठक
माळशिरस, १५ जून / वार्ताहर
महाराष्ट्र जनसेवा संघटनेची महत्त्वपूर्ण विषयावरील बैठक संघटनेच्या सोलापूर येथील पार्क चौकातील जिल्हा कार्यालयात (बुधवार, दि. १७) आयोजित केली असून पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत जनसेवा संघटनेचे संस्थापक आमदार प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या २५ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन होणार असून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महादेव गायकवाड, श्री. शंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.

बारावीत नापास झाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या
फलटण, १५ जून/वार्ताहर
इयत्ता १२ वीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यामुळे निंबळक (ता. फलटण) येथील अमित मल्हारी निंबाळकर (वय २०) या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. याबाबतची माहिती अशी की, अमित निंबाळकर हा इ. १२ वी शास्त्र शाखेत शिकत होता. इ. १२ वीच्या परीक्षेत तो नापास झाला होता. या घटनेमुळे त्याला नैराश्य आले होते. फलटणला येऊन त्याने विषारी औषध विकत घेऊन प्राशन केले. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने तो स्वत:हून येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.

माळशिरसमध्ये २५ टक्के नागरिक ओळखपत्रापासून वंचित!
माळशिरस, १५ जून / वार्ताहर
तालुक्यातील अजूनही सुमारे २५ टक्के मतदारांना शासनाचे मतदान ओळखपत्र नसल्याचे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या चाचपणीत आढळून आले आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुका राष्ट्रवादीने मतदारांना शासकीय ओळखपत्र मिळविणे व त्याचे महत्त्व याविषयी माहिती होण्याकरिता प्रत्येकी ५ जणांची ४ पथके तयार केली असून त्या पथकाकडे तालुक्यातील सुमारे २५ गावे दिली आहेत. त्यानुसार हे पथक त्या त्या गावात जावून स्थानिक पुढाऱ्यांमार्फत थेट मतदारांशी संपर्क साधताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवर सध्या पसरलेली अवकळा पाहता या मोहिमेतून किमान तालुकास्तरीय कार्यकर्ते व मतदार यांची थेट भेट थोडीशी का असेना, राष्ट्रवादीसाठी चैतन्यदायी ठरत आहे.

जात प्रमाणपत्रावरून राहुल कोरटकरांचे सदस्यत्व धोक्यात
माळशिरस, १५ जून / वार्ताहर

कुणबी मराठा जातीच्या प्रमाणपत्रावर ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जात पडताळणी समितीने ते प्रमाणपत्र रद्द ठरविल्याने गुरसाळेच्या राहुल कोरटकरांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे.
राहुल कोरटकर यांनी १९९५ साली येथील तहसील कार्यालर्याकडून इतर मागास प्रवर्गात मोडणाऱ्या कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे आक्टोबर २००७ मध्ये झालेली ग्रामपंचायत निवडणूक याच प्रमाणपत्राचे आधारे लढविली व त्यामध्ये ते विजयी झाले. मात्र त्यानंतर या प्रमाणपत्राच्या वैधतेबद्दल विजयकुमार जेडगे यांनी समितीकडे याचिका दाखल केली होती व पुराव्यात कोरटकर कुटुंबातील सर्वाच्या शाळेचे दाखले हजर केले, मात्र त्यामध्ये विसंगती व बदल असल्याचे समितीस जाणवले. ब्रिटिश अमदानीत सन १८८४ च्या सर्वेक्षणात माळशिरस तालुक्यात एकही मराठा नसल्याचा इंग्रज सरकारचा अहवाल कोरटकरांनी दाखल केला. मात्र त्याकडे समितीने लक्ष वेधलेले दिसत नाही व राहुल कोरटकर हे मराठा जातीचे असून कुणबी नसल्याचा निवाडा देत समितीने कोरटकर यांचे विरुद्ध जातपडताळणी अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवायीचे आदेश दिले असल्याने राहुल कोरटकर यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. व हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.