Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

बॅडपॅच आर. आर. आबांचाही!
चित्रपट अभिनेता वा अभिनेत्री, उद्योगपती, राजकारणी किंवा सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना कधी तरी बॅडपॅचमधून जावे लागते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील हे असेच बॅडपॅचमधून जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा पार धुव्वा उडाला. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी केलेली बेताल वक्तव्ये पक्षाला नडल्याचा ठपका पक्षातील अन्य नेते ठेवीत आहेत. मराठा आरक्षणाचे पडद्याआडून समर्थन आर. आर. आबांनीच केले. तेच पक्षाच्या मुळावरच आले.

उमेदवाराचे यश त्याच्या पक्षावर अवलंबून
लोहा, गणेश कस्तुरे

कंधारऐवजी नव्याने पुनर्रचित मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आलेल्या लोहा मतदारसंघाचा समावेश लातूर लोकसभा मतदारसंघात झाला; परंतु या मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजविले. शेकापच्या अभेद्य किल्ल्याला १९९५ मध्ये शिवसेनेने सुरुंग लावला तर २००४ च्या निवडणुकीत अपक्ष आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बाजी मारली. या मतदारसंघात कोण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतो. यावर यशाचे गणित ठरेल असे मानले जाते. १९५७ ते १९७७ या काळात शेकापचे भाई केशवराव धोंडगे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले.

‘म्हाडा’चा निधी खासदारांनाही देण्यास युतीच्या आमदारांचा विरोध
मुंबई, १५ जून/प्रतिनिधी
‘एमएमआरडीए’ने ‘म्हाडा’कडे वर्ग केलेल्या २०० कोटी रुपयांच्या निधीत मुंबईतील खासदारांनाही वाटा देण्यास शिवसेना-भाजपाच्या शहरातून निवडून आलेल्या सर्व १२ आमदारांनी विरोध केला असून हा निधी मुंबईतील सर्व ३४ आमदारांना समान पद्धतीने वाटून दिला जावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. गेल्या वर्षी अशाच प्रकारे ‘म्हाडा’कडून मिळालेल्या १०० कोटी रुपयांचे वाटप शहरातील सर्व आमदारांना समान स्वरूपात न करता सत्ताधारी आमदारांना जास्त व विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी असा निर्णय, राज्य सरकारने घेतला होता.

‘पुणे जमीन बळकाव प्रकरणी पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना देणार’
मुंबई, १५ जून / खास प्रतिनिधी

पुण्यातील प्रश्न. नातू यांच्या जमीन बळकाव प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिले. शिवसेना आमदार अरविंद सावंत आणि निलम गोऱ्हे यांनी आज हे प्रकरण विविध माध्यमांतून उपस्थित केले होते.

३० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या अभूतपूर्व गोंधळात विधानसभा तहकूब
मुंबई, १५ जून/ खास प्रतिनिधी

अंतरिम अर्थसंकल्प १५ हजार कोटी रुपयांचा तर पुरवणी मागण्या ३० हजार कोटींच्या, असा उरफाटा व्यवहार गेल्या ५० वर्षात झाला नसून अर्थसंकल्पाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप करित विरोधकांनी आज विधानसभा डोक्यावर घेतली. निवडणुकींच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना ‘खिरापत’ वाटण्यासाठी पुरवणी मागण्या मांडण्यात आल्याचे सांगत सभागृहात सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. या गदारोळामुळे दोनवेळा अध्र्या तासासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

प्रधान समितीचा संपूर्ण अहवाल मंत्रिमंडळाला अमान्य
गफूर यांच्यावरील ताशेरे फेटाळले

मुंबई, १५ जून / खास प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यात पोलीस यंत्रणेला आलेल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीचा संपूर्ण अहवाल न स्वीकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हसन गफूर यांच्यावर ओढण्यात आलेले ताशेरे फेटाळण्यात आले. राम प्रधान समितीचा अहवाल विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडला जाईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जाहीर केले होते. तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना लोकसभेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही महाराष्ट्र सरकार हा अहवाल विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितले होते.