Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

जनक्षोभाचा ‘नाशिक पॅटर्न’ यशस्वी
पोलीस आयुक्तांच्या बदलीला स्थगिती देण्याची सरकारवर नामुष्की

नाशिक, १५ जून / प्रतिनिधी

सर्वसामान्य नाशिककरांच्या जिवावर उठलेल्या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी सरसावलेले नवनियुक्त पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्या बदलीचे तडकाफडकी काढलेले आदेश नाशिककरांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या अभूतपूर्व आंदोलनामुळे अखेर स्थगित करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. विशेष म्हणजे, मिश्रा यांच्या बदलीचे सुरुवातीला समर्थन करणारे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनाच जनक्षोभाच्या रेटय़ामुळे मिश्रांची बदली स्थगित करण्याची विनंती गृहमंत्र्यांना करणे भाग पडले.

मुंबईकरांवर संकट, पाणी कपातीचे आणि वीज दरवाढीचे
मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

येत्या तीन दिवसांत ‘मान्सून’चे आगमन झाले नाही तर मुंबईकरांना ३० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याच्या पातळीचा आढावा उद्या मंगळवारी घेण्यात येणार आहे. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या १० टक्के पाणीकपातीत वाढ करावयाची का, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पाणी गळती आणि चोरी रोखण्यात पालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे आधीच अनेक विभागांत कमी पाणीपुरवठा होत आहे. विशेषत: के- पूर्व, पश्चिम प्रभागांत पाणीपुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत.

टोलवसुलीत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कंत्राटदारांचे उखळ पांढरे!
लोकलेखा समितीचा ठपका

मुंबई, १५ जून/प्रतिनिधी

राज्यातील २७ कामांच्या कंत्राटदारांनी ३५७ कोटी ९६ लाख रुपये कामांवर खर्च केले. मात्र १४ वर्षाच्या कालावधीत २०२३ कोटी ७२ लाख रुपये टोलद्वारे वसूल केले. जनतेकडून वसूल केलेली ही रक्कम सहापट आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने ‘बीओटी’ तत्त्वावर केल्या जाणाऱ्या कामांमध्ये जनतेची प्रचंड फसवणूक आणि अधिकारी व उद्योजकांचा फायदा होत आहे. त्यामुळे बीओटी योजनेखालील कामांना भविष्यात परवानगी देताना सार्वजनिक बांधकाम विभागाव्यतिरिक्त त्रयस्थ यंत्रणेकडून या योजनेचे सखोल नियोजन, संनियंत्रण व पर्यवेक्षण होणे गरजेचे आहे, अशी शिफारस लोकलेखा समितीने केली आहे.

पुण्यातील लॅँडमाफिया असलेल्या नगरसेवकाला काँग्रेसचेच संरक्षण
‘पुण्याच्या पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना देणार’

पुणे, १५ जून / प्रतिनिधी

लॅँडमाफिया असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी-नगरसेवकाला काँग्रेसचेच संरक्षण असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील प्रसिद्ध नातूवाडय़ाची जमीन बिल्डरला मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी दहशत निर्माण केली आणि जमीन बळकावली, या तक्रारीवरून पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मानकर तसेच माजी नगरसेवकासह एकूण अकरा आरोपी फरारी असतानाही काँग्रेसने त्याबाबत डोळ्यांवर कातडे ओढत या लॅँडमाफियाला आपले संरक्षण असल्याचेच दाखवून दिले आहे.

अभिनंदनाचा ठराव मांडणाऱ्या राणेंवर रामदास कदम यांची जोरदार टीका
मुंबई, १५ जून/खास प्रतिनिधी

गेली चाडेचार वर्षे विधानसभेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालविणाऱ्या अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडल पाहिजे, असे सांगतानाच विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचेही अभिनंदन केले पाहिजे असे सांगून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज सर्वानाच धक्का दिला. मात्र रामदास कदम यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका करीत ते भ्रमिष्टासारखे वागत असून आपण काय बोलतो हेच त्यांना कळत नसल्याचे सांगितले.

प्रधान समितीचा संपूर्ण अहवाल मंत्रिमंडळाला अमान्य गफूर यांच्यावरील ताशेरे फेटाळले
मुंबई, १५ जून / खास प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यात पोलीस यंत्रणेला आलेल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीचा संपूर्ण अहवाल न स्वीकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हसन गफूर यांच्यावर ओढण्यात आलेले ताशेरे फेटाळण्यात आले.

रेल्वे बजेट ३ जुलैला, तर सर्वसाधारण अर्थसंकल्प ६ जुलैला
नवी दिल्ली, १५ जून/खास प्रतिनिधी

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २ जुलैपासून सुरु होणार आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्प ३१ जुलैपूर्वी पारित करण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारचा प्रयत्न असेल. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाचा समारोप ७ ऑगस्ट रोजी होईल. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल मांडला जाईल.

‘दहावी’ची तारीख दोन दिवसांत जाहीर
पुणे, १५ जून / खास प्रतिनिधी

दहावीच्या निकालाची तारीख येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज देण्यात आली. २० ते २६ तारखेदरम्यान दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली. दहावीच्या निकालाची तारीख आज जाहीर होणार असल्याची घोषणा राज्याचे शालेयशिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल केली होती. त्यामुळे आज राज्यभरातून दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत माहिती करून घेण्यासाठीचे दूरध्वनी खणखणत होते. या संदर्भात मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले, की ‘राज्य शासनाच्या वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्ताने मंडळाचे उच्चपदस्थ अधिकारी गेले काही दिवस मुंबईत होते. त्यानंतर आता राज्य मंडळाच्या पुण्यातील मुख्यालयामध्ये परत येऊन दहावीच्या निकालाबाबत संबंधित अधिकारमंडळांच्या सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यांच्याशी विचारविनिमय करून निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.’

मान्सूनचे पुनरागमन आणखी तीन दिवस नाही
पुणे, १५ जून /खास प्रतिनिधी

मान्सून पुढील तीन दिवस सक्रिय होणार नसून त्यानंतर म्हणजे या आठवडय़ाच्या अखेपर्यंत त्याच्या पुनरागमनाबाबत आशादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. काही मान्सून मॉडेलनुसार येत्या २० तारखेला बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची चिन्हे आहेत त्याचा परिणाम म्हणून मान्सूनही सक्रिय होईल व पुढे सरकेल असा प्रश्नथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मान्सून गेल्या सात तारखेला रत्नागिरीत आल्यानंतर त्याचा जोर थंडावला त्यामुळे त्याचे राज्यातील बहुताश भागातील आगमन लांबले आहे. परिणामी ठिकठिकाणी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या व पिण्याच्या पाण्यातही कपात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुनरागमानकडे राज्याचे डोळे लागले आहे. मात्र आताची हवामानाची स्थिती पाहता पुढील किमान तीन दिवस तरी राज्यात मान्सून सक्रिय होणार नाही. त्यानंतर मात्र काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण नवी दिल्ली मान्सून मॉडेलनुसार येत्या २० तारखेला बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतचे चित्र पुढील दोन ते तीन दिवसानंतर स्पष्ट होईल त्यानंतरच मान्सूनच्या पुनरागमानाबाबत निश्चितपणे सांगता येईल असे हवामान विभागातर्फे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी