Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

‘समांतर’ मार्गी लागली!
औरंगाबाद महापालिकेचा लवकरच राज्य सरकारबरोबर सामंजस्य करार
औरंगाबाद, १५ जून /प्रतिनिधी
शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी नवीन समांतर जलवाहिनी उभारण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. ‘अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल, मिडिअम टाऊन’ (यूआयडीसीसीएमटी) योजनेत केंद्राबरोबरच राज्य सरकारने निधी देण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारबरोबर येत्या काही दिवसांतच सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

नांदेडच्या उपमहापौरांचा राजीनामा
नांदेड, १५ जून /वार्ताहर
महापौर-उपमहापौरपद बदलण्याचे निश्चित झाल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठांच्या आदेशानुसार उपमहापौर सरजितसिंग गिल यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज सकाळी महापौर बलवंतसिंग गाडीवाले यांच्याकडे दिला. श्री. गाडीवाले यांनी स्वत:च्या पदाच्या राजीनाम्यासाठी बुधवारचा मुहूर्त काढला आहे. त्या दिवशी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ते राजीनामा सादर करतील. महापालिकेत बहुमत असलेल्या काँग्रेसने गुरू-ता-गद्दी सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर ही मानाची दोन्ही पदे शीख समाजला दिली.

केंद्रात लातूर पॅटर्न चमकेल - विलासराव
लातूर, १५ जून/वार्ताहर

अवजड उद्योग खात्याचा कारभार ‘लातूर पॅटर्न’च्या पद्धतीने आपण सुरू केला आहे. केंद्रात ‘लातूर पॅटर्न’ नक्की चमकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी आज पत्रकार बैठकीत व्यक्त केला. खासदार जयवंत आवळे, आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, त्र्यंबकदास झंवर, नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे या वेळी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले, ‘‘रोज सकाळी ९.३० वाजता मी कार्यालयात जाऊन दररोज एका कंपनीचा अभ्यास करीत आहे. पंडित नेहरू पंतप्रधान असताना उद्योग खाते त्यांच्याकडे होते.

चवदार खाण्याचा मूलमंत्र -रॅटॅटुली
आपल्याकडे ‘सुगरण’पणा आणि महिला यांचं नातं मनात घट्ट बसलेलं आहे; तसंच जगभर या सुगरण-पणाच्या काही संकल्पना लोकांच्या मनात घट्टपणे रुजलेल्या आहेत. त्यामुळे एक उंदीर छान चवदार पक्वान्नं शिजवू शकतो, या कल्पनेला कुणी सहजासहजी उचलून धरत नाही. खवय्येगिरीची गोष्ट निघाली की`Anybody can cook`‘कुणीही पाककृती करू शकतं’ हे ब्रीदवाक्य असलेल्या ‘रॅटॅटुली’(Ratatouille) सिनेमाची आठवण होते आणि त्याची नुसती आठवण झाली तरी खाण्यासाठीची सगळी जय्यत तयारी - म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशी दोन्ही - करून आपण त्या रसनातृप्तीच्या उत्सवासाठी तयार व्हावं असं वाटतं.
‘पिक्सार अॅनिमेशन फिल्म कंपनी’ने तयार केलेल्या या सिनेमात चक्क ‘रेमी’ नावाचा उंदीर अत्युत्कृष्ट बल्लवाचार्य होतो, असं दाखवलं आहे.

पोलिसांची संभ्रमावस्था; खुनी अनोळखी तर नसावेत?
मानसी देशपांडे खून प्रकरण
औरंगाबाद, १५ जून /प्रतिनिधी
मानसी देशपांडे हिच्या खुनाला तीन दिवस उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. मानसीच्या खुनामागे ओळखीचाच कोणीतरी असावा, असा ठाम दावा करणारे पोलीसही संभ्रमावस्थेत असून या खुनामागे अनोळखीही असू शकतो, अशी शक्यता आता गृहीत धरण्यात येत आहे.

आरोपी सचिन तायडेला न्यायालयीन कोठडी
कोंडावार हत्या प्रकरण
औरंगाबाद, १५ जून/खास प्रतिनिधी
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील रोखपाल धर्माजी कोंडावार यांची गोळ्या घालून हत्या करणारा मुख्य आरोपी सचिन तायडेला न्यायालयीन कोठडी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जी. शेटे यांनी सुनावली. सचिन तायडेची रवानगी हर्सूल कारागृहात झाली आहे. ३० मे रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन सचिन तायडेने पिस्तूलमधून गोळी झाडून धर्माजी कोंडावार यांची हत्या केली. २ जूनला सचिन तायडे पोलिसांना शरण आला. ३ जूनला त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. १० जूनला त्याच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सोमवारी (१५ जून) सचिनला पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. सहायक सरकारी वकील आर. आर. तांदळे यांची आरोपीच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कोंडावार हत्या प्रकरणातील मारेकरी सचिन तायडेला २९जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले.

कर्जमाफीच्या मागणीसाठी गेलेल्या आंदोलकांना हाकलले
बीड, १५ जून / वार्ताहर
मौलाना आझाद व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना हाकलून देण्यात आल्यामुळे संतप्त आंदोलकांनी शिपायाकडे निवेदन दिले.बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ जूनला मौलाना आझाद व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे, या मागणीसाठी शिवसंग्रामच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने काही दिवसांपूर्वी इतर महामंडळाचे कर्ज माफ केले; परंतु मौलाना आझाद आणि अण्णासाहेब पाटील या दोन महामंडळांचे कर्ज माफ करण्यात आले नाही. या दोन्ही महामंडळांचे कर्ज माफ करावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आंदोलकांनी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. हे निवेदन न स्वीकारता त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी या प्रकाराचा निषेध करीत आपल्या मागण्यांचे निवेदन शिपायाकडे दिले. यावेळी मोईन मास्टर, सुहास पाटील, प्रकाश कवठेकर आदी उपस्थित होते.

देयकप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
उस्मानाबाद, १५ जून / वार्ताहर
चौकशी सुरू असताना नाली बांधकामाचे पाच लाख रुपयांचे देयक नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष महेंद्र बिदरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.शहरातील नारायण कॉलनी, काकडे प्लॉट ते पर्यायी रस्त्यावरील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार बिदरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यासंदर्भात नगररचनाकारांनी चौकशी करावी, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.चौकशी सुरू असतानाच नाली बांधकामाचे पाच लाखांचे देयक संबंधित ठेकेदाराला दिले गेले. त्यामध्ये मुख्याधिकारी व अभियंता यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप तक्रारीत आहे. निकृष्ट बांधकामाची तक्रार केल्यानंतर ठेकेदार व एका माजी नगरसेवकाने धमकावल्याची तक्रारही श्री. बिदरकर यांनी केली आहे.

महिलेची छेड काढणाऱ्याला जमावाचा बेदम चोप
औरंगाबाद, १५ जून /प्रतिनिधी
भाजीपाला घेणाऱ्या महिलेची छेड काढणाऱ्या एकाला जमावाने बेदम चोप दिला. ही घटना सायंकाळी साडेचारला घडली. गजानन महाराज मंदिरानजीकच्या मंडईत घडली. मोठा जमाव त्याच्यावर तुटून पडल्याने त्याचे कपडे फाटले. याबाबत सायंकाळपर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती. भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या महिलांची भाजीमंडईत आज मोठी गर्दी होती. त्यात एकाने महिलेला छेडले. महिलेने त्याला एकदा समजही दिली. मात्र त्याने जुमानले नाही. हा प्रकार तेथील नागरिकांच्या लक्षात आला. त्याने पुन्हा छेड काढण्याचा प्रयत्न करताच जमाव त्याच्यावर तुटून पडला. संतप्त नागरिक त्याच्या मागे लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. जमावाने पाठलाग करून त्याला पकडले आणि पुन्हा मारहाण केली. संतप्त जमावाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू होईल म्हणून काहींनी त्याची सुटका केली. त्याला नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरने त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयाकडे नेण्यात आले. त्याचे नाव समजू शकले नाही.

गंगाखेडच्या नगराध्यक्षपदासाठी घोबाळे यांचा एकमेव अर्ज
गंगाखेड, १५ जून/वार्ताहर
नगराध्यक्षपदाच्या शनिवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका निलावंती रुकमाजी घोबाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.श्रीमती घोबाळे यांनी आज सकाळी ११.३० वाजता सहायक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी एन. एस. गोरडे यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावर सूचक म्हणून नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी व अनुमोदक म्हणून नगरसेवक सारंगधर कुरुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अर्ज दाखल करण्याचा उद्या (मंगळवार) शेवटचा दिवस आहे.

कळंबच्या जनकल्याण बँकेला पुरस्कार
उस्मानाबाद, १५ जून/वार्ताहर

कळंब येथील जनकल्याण अर्बन सहकारी बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था असोसिएशनमार्फत उत्कृष्ट काम केल्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात वनसंरक्षणमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने ठरवून दिलेल्या निकषानुसार काम केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

हमालास मारहाण
औरंगाबाद, १५ जून /प्रतिनिधी
सिगारेट आणण्यास नकार दिल्याने एका हमालास फायटर तसेच दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंगुरीबाग येथे घडली.
अमीरखान खैरूखान (वय १९) असे या मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. अमीर हे काम आटोपून घरी परतत असताना वाटेत छोटा बिट्टू आणि बबलु (दोघेही राहणार गांधीनगर) यांनी अडविले. समोरच्या टपरीवरून सिगारेट घेऊन ये असे त्याला सांगितले. ‘पैसे द्या मी सिगारेट आणून देतो’ असे तो म्हणाला असता तुझ्याच पैशाने सिगारेट घेऊन ये असे त्यांनी सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला व बिट्टू आणि बबलू या दोघांनी अमीरला बेदम मारहाण केली. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

महावितरणची वीजचोरांविरुद्ध मोहीम
औरंगाबाद, १५ जून /प्रतिनिधी

वीजचोरांविरुद्ध महावितरण कंपनीने पुन्हा एकदा जाहीर मोहीम सुरू केली आहे. ३० जूनपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेचा आज शुभारंभ झाला. औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्य़ात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे, अधीक्षक अभियंता श्याम धनतोले, सोमानाथ पवार, कार्यकारी अभियंता सर्वश्री एस. व्ही पांडव, सी. बी. जाधव, संजय खंदारे व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेदरम्यान ० ते ३० युनिट वापर असणारे तसेच सरासरी वीज देयक सारखे असणारे ग्राहक तसेच थकबाकीदारांचे वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.

सोयगाव तालुक्यातील चार गावांत अशुद्ध पाणीपुरवठा
सोयगाव, १५ जून / वार्ताहर

पाणीटंचाई पाठोपाठ अजिंठा लेणीच्या माथ्यावर वसलेल्या चार गावांत सध्या दरुगधीयुक्त अशुद्ध पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने या गावांतील गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सावरखेडा, दत्तवाडी, पांढरी, लेणापूर ही चार गावे अजिंठय़ाच्या डोंगरात आहे. या चारही गावाला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाही. सावरखेडा येथील धरणातून या गावाला पाईपद्वारे विहिरीत पाणी टाकले जाते. गेल्या काही दिवसांपासून धरणातील जलसाठा कमी झाला असून केवळ तळ्यावर थोडेसे पाणी आहे. हे पाणी हिरवेगार असून त्यात कमालीची दरुगधी आहे. सावरखेडा येथील ग्रामस्थांनी सांगितले की, हे धरणातील पाणी कुठलीही प्रक्रिया न करता विहिरीत टाकले जाते. तेथून नागरिक याचा पिण्यासाठी वापर करतात. दुसरे कुठलेही पाणी नसल्याने नाईलाजाने हे दूषित पाणी प्यावे लागत आहे. विशेष म्हणजे मेमध्ये पांढरी गावात दूषित पाण्यामुळे तापाची मोठी साथ आली होती.या गावातील पाणी आरोग्य विभागाने तपासण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवालही ‘दूषित’ म्हणून आला.

औसा नगराध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडणूक
औसा, १५ जून/वार्ताहर
नगराध्यक्षपदासाठी गुरुवारी (दि. १८) निवडणूक होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्या प्रत्येकी एका सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच अटळ आहे. नगराध्यक्षपदाच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक होत आहे. यासाठी बाबा मुंगळे (काँग्रेस), अफसर शेख (राष्ट्रवादी काँग्रेस), दिगंबर माळी (भा. ज. प.), व्यंकटेश कोद्रे (शिवसेना) यांनी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केले आहेत.

गंगाखेड उपविभागासाठी दोन वर्षांपासून पोलीस उपअधीक्षक नाही
गंगाखेड, १५ जून / वार्ताहर
गंगाखेड, सोनपेठ व पिंपळदरी या तीन पोलीस ठाण्यांसाठी सन १९९३ साली स्थापन केलेल्या येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास गत दोन वर्षांपासून कायमस्वरूपी पोलीस उपअधीक्षक नसल्याने कार्यालयासाठी असलेली भव्य इमारत केवळ शोभेची वास्तू बनली आहे.गत दोन वर्षांपूर्वी २४ नोव्हेंबर २००८ ला तत्कालीन पोलीस उपअधिक्षक गणेश नंदनवार यांची गेवराई येथे बदली झाल्यानंतर तेव्हापासून ४ मे २००९ पर्यंत पूर्णाचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रभावीपणे कार्यभार सांभाळला होता. लोकसभेची निवडणूक संपताच श्री. पाटील नांदेडला रुजू झाले. आजघडीस परभणीचे पोलीस उपअधीक्षक विश्वंभर मिटके यांच्याकडे तसेच पूर्णाचे पोलीस उपअधीक्षक जे. एन. तायडे या दोघांकडे परिस्थितीपणे प्रभारी कार्यभार सोपविला जातो. परिणामी कायमस्वरूपी हे पद रिक्त असल्याने तीनही पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे.