Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जनक्षोभाचा ‘नाशिक पॅटर्न’ यशस्वी
पोलीस आयुक्तांच्या बदलीला स्थगिती देण्याची सरकारवर नामुष्की
नाशिक, १५ जून / प्रतिनिधी

सर्वसामान्य नाशिककरांच्या जिवावर उठलेल्या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी सरसावलेले नवनियुक्त पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्या बदलीचे तडकाफडकी काढलेले आदेश

 

नाशिककरांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या अभूतपूर्व आंदोलनामुळे अखेर स्थगित करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. विशेष म्हणजे, मिश्रा यांच्या बदलीचे सुरुवातीला समर्थन करणारे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनाच जनक्षोभाच्या रेटय़ामुळे मिश्रांची बदली स्थगित करण्याची विनंती गृहमंत्र्यांना करणे भाग पडले. विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून एकजुटीने रस्त्यावर उतरलेल्या सर्वसामान्य नाशिककरांचा हा विजय असल्याची एकमुखी प्रतिक्रिया व्यक्त होत असून नागरिकांनी अक्षरश: पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. विविध गुंड टोळ्यांनी गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये उच्छाद मांडला होता. अशा बहुतेक टोळ्यांच्या म्होरक्यांनी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा आश्रय घेतल्याने पोलीस यंत्रणा त्यांना हात लावू धजावत नव्हती. परिणामी, लुटालूट, खंडणी, छेडछाड यामुळे सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना होती. अशातच दोन महिन्यांपूर्वी मिश्रा यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आणि गुंडांविरोधात कडक उपाययोजना सुरू केल्या. त्याकडून लक्ष हटविले जाण्याच्या उद्देशाने सिडको परिसरात एकाच रात्री तब्बल ४० वाहने जाळून टाकण्यात आली. त्यामुळे मिश्रा यांनी आणखीनच धडक कारवाई करून गुंडांविरोधात तडीपारी तसेच मोक्कासारखी कारवाई सुरू केल्याने त्याला लोकांचा मोठा पाठिंबा लाभला. तथापि, या दरम्यान मिश्रा यांची तडकाफडकी बदली झाल्याने शहरात एकच क्षोभ उसळला. सर्वसामान्यांनी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी दोन दिवस रस्त्यावर उतरून यशस्वी आंदोलन करण्याची ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. लोकांच्या एकजुटीचा हा ‘नाशिक पॅटर्न’ यापुढे अपप्रवृत्तींच्या विरोधात ठिकठिकाणी राबविला जावा अशी अपेक्षा विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तपदावरून व्ही. डी. मिश्रा यांच्या केलेल्या बदलीस तात्पुरती स्थगिती दिल्याची घोषणा आज विधान परिषदेत केली. पाटील म्हणाले की, नाशिकच्या जनतेचे मी अभिनंदन करतो. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि आमदार शोभा बच्छाव यांनी मिश्रा यांची बदली स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. आपली केंद्रात प्रतिनियुक्तीवर बदली व्हावी असा अर्ज मिश्रा यांनी यापूर्वी दिला होता. मात्र २००८ मध्ये वैयक्तिक कारणावरून त्यांनी बदली स्वीकारण्यास नकार दिला. २००९ साली आपण बदली स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यानुसार ही बदली झाली होती.