Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईकरांवर संकट, पाणी कपातीचे आणि वीज दरवाढीचे
मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

येत्या तीन दिवसांत ‘मान्सून’चे आगमन झाले नाही तर मुंबईकरांना ३० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याच्या पातळीचा आढावा उद्या मंगळवारी घेण्यात येणार आहे. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या १० टक्के

 

पाणीकपातीत वाढ करावयाची का, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पाणी गळती आणि चोरी रोखण्यात पालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे आधीच अनेक विभागांत कमी पाणीपुरवठा होत आहे. विशेषत: के- पूर्व, पश्चिम प्रभागांत पाणीपुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच कुर्ला, चुन्नाभट्टी या पूर्व उपनगरातील विभागात तर श्रीमंताची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोखंडवाला संकुल, चर्चगेट, मलबार हिल या परिसरातही पाणी कमी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. मुंबईकरांना सहा तलावातून दररोज ३५०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र यात ८७५ दशलक्ष लिटर पाणी गळती, चोरी होत आहे. शिवाय सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना २२७५ दशलक्ष लिटरच पाणी मिळत आहे. पावसाचे आगमन लाबंले तर मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट उभे राहणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ात १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र जून महिन्याचे पंधरा दिवस संपले तरी मान्सूनचे आगमन मुंबईत झालेले नाही. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येत्या ७२ तासांत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र हा अंदाज खरा ठरला नाही तर मुंबईकरांना किमान ३० टक्के पाणी कमी मिळणार आहे.
मुंबई १५ जून / प्रतिनिधी
मुंबई शहर आणि उपनगरातील वीज ग्राहकांवर अनुक्रमे नऊ व सरासरी दोन टक्के दरवाढीला आज राज्य वीज नियामक आयोगाने मंजूरी दिली. ही दरवाढ एक जूनपासून अंमलात येणार असल्याने मुंबईतील वीज ग्राहकांवर दरवाढीचा बोजा पडणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेने आठ दिवसापूर्वी दरवाढ कमी करण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा आयोगावर कहाही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रिलायन्स एनर्जीच्या वीज दयेकात सरसकट दोन टक्के वाढ झाली असून ७ टक्के वाढ ही निवासी दयेकात आहे. रिलायन्सच्या ग्राहकांमध्ये खालील प्रमाणे दरवाढ झाली आहे.
० ते १०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी २ रुपये ९६ पैसे
१०१ ते ३०० युनिटसाठी ५ रुपये ५६ पैसे
३०० ते ५०० युनिट साठी ९रुपये १६ पैसे
५०० युनिट पेक्षा जास्त वापर करणाऱ्यांसाठी १० रुपये ६१ पैसे
बेस्टची वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खालील प्रमाणे दरवाढ आहे
० ते १०० युनिट १ रु. ८० पै.
१०१ ते ३०० युनिट ३ रु ७० पै.
३०१ ते ५०० युनिट ५ रु ९० पै.
५०० युनिट पेक्षा वीज वापरणाऱ्यासाठी ७ रु. ९० पै.
ही दरवाढ सरसकट ९ टक्के आहे. टाटा वीज ग्राहकासाठी मात्र दिलासा देणारा निर्णय आहे. मात्र ही दरवाढ कमी असल्याने रिलायन्स व बेस्टच्या ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
टाटाचे दर असे आहेत
०ते १०० युनिट वापर १ रु. ३० पै.
१०१ ते ३०० युनिट वापर २ रु ७० पै.
३०१ ते ५०० युनिट वापर ४ रु. २०पै.
५०० पेक्षा जास्त युनिट वापर ४ रु ९० पै.