Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पुण्यातील लॅँडमाफिया असलेल्या नगरसेवकाला काँग्रेसचेच संरक्षण
‘पुण्याच्या पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना देणार’
पुणे, १५ जून / प्रतिनिधी

लॅँडमाफिया असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी-नगरसेवकाला काँग्रेसचेच संरक्षण असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील प्रसिद्ध नातूवाडय़ाची जमीन बिल्डरला मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे शहर

 

वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी दहशत निर्माण केली आणि जमीन बळकावली, या तक्रारीवरून पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मानकर तसेच माजी नगरसेवकासह एकूण अकरा आरोपी फरारी असतानाही काँग्रेसने त्याबाबत डोळ्यांवर कातडे ओढत या लॅँडमाफियाला आपले संरक्षण असल्याचेच दाखवून दिले आहे.
बाणेर येथील जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शहरातील जमिनी बळकाविल्याचे आणखी प्रकार समोर येत आहेत. बाजीराव रस्त्यावरील जमीन सुधीर कर्नाटकी या बांधकाम व्यावसायिकाने मानकर याच्या साथीने बळकावल्याची तक्रार यशवंत नातू यांनी खडक पोलिसांकडे दिली. नातू यांचा तक्रार अर्ज खडक पोलिसांनी दाखल करून घेतला आणि त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तरीही काँग्रेसने त्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे नातू यांना काँग्रेसभवनात बोलावून त्यांना धमकावण्यात आल्याची तक्रार प्रसिद्ध झाल्यानंतरही काँग्रेसला आपल्या प्रतिमेविषयी काहीही वाटत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होते आहे.
नातू यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने जमीन बळकाविण्यासाठी कर्नाटकी यांनी फेब्रुवारी २००८ पासून आम्हाला वारंवार धमकावले. तीस दिवस आम्ही सर्वजण दहशतीखाली वावरत होतो. आमदार गिरीश बापट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनाही पत्र पाठविले मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. अखेर मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर याप्रकरणी तपास करण्याचे आदेश गृहखात्याने पुणे पोलिसांना दिले. मात्र तत्पूर्वी आम्हाला सतत दूरध्वनीवरून धमकी देण्यात येत होती. काँग्रेस भवनमध्ये आम्हाला नेण्यात आल्यावर जबरदस्तीने काही कागदपत्रांवर सह्य़ा करून घेण्यात आल्या.’’ पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांना २८ एप्रिल २००९ रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये संबंधित काँग्रेच्या पदाधिकाऱ्यासह कर्नाटकी यांच्या नावाचा उल्लेख असल्याचेही नातू यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
कर्नाटकी म्हणाले की, खडक पोलिसांनी जबाब लिहून घेतला आहे. ‘नातू यांच्याकडून मागील वर्षी सव्वा कोटी रुपयांच्या मोबदल्यात ही जमीन विकत घेतली होती. अन्य जमीनमालकांना ७५ लाख रुपयांची ‘ऑफर’ असताना केवळ यशवंत नातू हे सव्वा कोटी रुपये मागत होते. तसेच ते पोलिसांकडे जाण्याची धमकीही देत. नातू याप्रकरणी न्यायालयातही गेले होते परंतु नंतर आम्ही सव्वाकोटी रुपयांना व्यवहार केल्यावर त्यांनी दावा मागे घेतला. आता पुन्हा चौदा महिन्यांनी ते याबाबत पोलिसांकडे गेले आहेत.’’
बाणेर येथील चार गुंठे जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह दोघाजणांवर चतु:शृंगी पोलिसांनी गुरुवारी (दि.११) गुन्हा दाखल केला आहे. टाटा मोटर्स येथे नोकरीस असणारे अशोक गुप्ता (वय ६०, रा. भोसलेनगर) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. दोन वर्ष न्यायालयीन लढा दिल्यानंतर निकाल गुप्ता यांच्या बाजूने लागल्यावरही त्या जागेवर मानकर यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप तक्रार अर्जामध्ये करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे वेगाने विकसित होणाऱ्या पुणे शहरात बांधकाम व्यावसायिकांकडून राजकीय आश्रयाखाली जमिनी लाटल्याचे प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले आहे.