Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अभिनंदनाचा ठराव मांडणाऱ्या राणेंवर रामदास कदम यांची जोरदार टीका
मुंबई, १५ जून/खास प्रतिनिधी

गेली चाडेचार वर्षे विधानसभेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालविणाऱ्या अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडल पाहिजे, असे सांगतानाच विरोधी पक्षनेते रामदास कदम

 

यांचेही अभिनंदन केले पाहिजे असे सांगून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज सर्वानाच धक्का दिला. मात्र रामदास कदम यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका करीत ते भ्रमिष्टासारखे वागत असून आपण काय बोलतो हेच त्यांना कळत नसल्याचे सांगितले. विधानसभेत नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेत्याच्या अभिनंदनाचा ठराव मांडताना आपण हे मनापासून बोलत असल्याचे सांगितले. दोनच दिवसंपूर्वी पत्रकार परिषदेत राणे यांनी रामदास कदम यांची सुमार म्हणून संभावना केली होती. विरोधी पक्षनेतेपदाला कलंक लावणारा, असेही वर्णन त्यांनी कदम यांचे केले होते. मात्र आज विधानसभेत नेमकी उलटी भूमिका मांडत कदम यांचे अभिनंदन करण्याची भूमिका राणे यांनी मांडली. रामदास कदम यांनी मात्र राणे यांच्याशी संघर्ष करण्याचीच भूमिका कायम ठेवत पत्रकार परिषदेत आज राणे यांच्यावर जोरदार टीका केली. मला ज्युनिअर असणाऱ्या अशोक चव्हणा यांच्या हाताखाली काम करू शकणार नाही, असे कालपर्यंत सांगणारे नारायण राणे हे आज त्यांच्याच हाताखाली काम करत आहेत. दोन क्रमांकाच्या महसूल खात्यावरून पाच क्रमांकाच्या उद्योग खात्यावर त्यांची पदावनती झाली आहे. राणे यांना थोडा जरी स्वाभीमान असता तर ते सरकारमधून बाजूला राहिले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.