Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रेल्वे बजेट ३ जुलैला, तर सर्वसाधारण अर्थसंकल्प ६ जुलैला
नवी दिल्ली, १५ जून/खास प्रतिनिधी

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २ जुलैपासून सुरु होणार आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्प ३१ जुलैपूर्वी पारित करण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारचा प्रयत्न असेल. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय

 

घेण्यात आला. अधिवेशनाचा समारोप ७ ऑगस्ट रोजी होईल.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल मांडला जाईल. रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी ३ जुलै रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडतील. ६ जुलै रोजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी अर्थसंकल्प सादर करतील. पुन्हा लेखानुदान प्रस्ताव करण्याची गरज पडू नये म्हणून अर्थसंकल्प ३१ जुलैपूर्वीच पारित करण्यावर सरकारचा भर असेल. रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निवडक मंत्रालयांच्या अनुदानाच्या मागण्यांवर उभय सभागृहांमध्ये चर्चा होईल.
दरम्यान, आज सायंकाळी अ. भा. काँग्रेसच्या मुख्यालयात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य तसेच पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांसोबत आगामी अर्थसंकल्पाविषयी चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पाविषयी सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा जाणून घेतल्या.