Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘टोल’मोल के बोल..नाक्यांवरील अडवणुकीवर आमदार बिथरले!
मुंबई, १५ जून/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील टोल नाक्यांवर मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी दिसली की वसुलीकरिता पुढे होणारे हात आपसुक सलामी ठोकतात.. पण लाल दिवा काही सर्वाच्या नशिबात नसतो. मग आमदारांना टोल नाक्यावर अपमान, अवहेलना यांचा सामना करावा लागतो.. आमदारांकडून टोल वसूल करायचा

 

नाही याची नाक्यावरील अशिक्षित कर्मचाऱ्यांना सूतराम कल्पना नसल्याने अशा कर्मचाऱ्यांना समज द्या, कारवाई करा अशा मागण्या विधान परिषदेत आज सर्वपक्षीय आमदारांनी केल्या.
औरंगाबाद, करमाड रस्त्यावरील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या बेदरकार वागणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांनी लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेत सर्वच आमदारांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर तोफ डागली. फौजिया खान म्हणाल्या की, राज्यातील टोल नाक्यांवर आमदारांचे ओळखपत्र दाखवले तरी त्याची दखल घेतली जात नाही. आमची झडती घेतली जाते. त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दूरून दिसेल असे चिन्ह अथवा ओळख लावायचा निर्णय घ्या. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री डॉ. विमल मुंदडा यांनी सांगितले की, खासदार, आमदार यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे आदेश टोल नाक्याच्या कंत्राटदारांना दिले आहेत. फौजिया खान यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या राऊत नावाच्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे. आमदारांच्या गाडीला वेगळे लेबल लावण्याचा निर्णय घेतला जाईल. शिवसेनेचे अनिल परब यांनीही खान यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
टोल नाक्यावर आमदाराचे ओळखपत्र दाखवले की, कर्मचारी ते उलटसुलट करून पाहतात, विनाकारण सात-आठ मिनिटे बसून ठेवतात, काही वेळा तर ओळखपत्र सुपरवायझरला दाखवायला नेतात. हे सारे अपमानास्पद आहे. आमदारांना स्टीकर्स देण्याचा निर्णय सरकारने अमलात आणला पाहिजे. मंत्री डॉ. मुंदडा म्हणाल्या की, टोल नाक्यावर कर्मचारी नियुक्त करताना त्यांच्या चारित्र्याचा दाखला पोलिसांकडून घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. शिवाय कामाचा अनुभव, वर्तणूक याची तपासणी करून नियुक्ती करायला सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश असायला हवा व त्यांच्या नावाची पट्टी सोबत हवी. गुरुनाथ कुलकर्णी यांनीही फौजिया खान यांच्या भूमिकेचे समर्थन केले.