Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

शायनी आहुजाला तीन दिवसांची पोलीस कोठडी
मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप
मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

‘हजारो ख्वाईशें एैसी’ आणि ‘गँगस्टर’ या चित्रपटांमुळे प्रसिद्धीस आलेला अभिनेता शायनी आहुजा याला ओशिवरा पोलिसांनी मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली रविवारी अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १८ जूनपर्यंत पोलीस

 

कोठडी सुनावली.
आहुजाच्या मोलकरणीने ओशिवरा पोलिसांकडे आहुजाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते. त्या वेळेस त्याने मोलकरणीच्या सहमतीनेच आपण तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आज दुपारी त्याला अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी अभियोग पक्षाचे वकील एस. एस. कस्तुरे यांनी, आहुजा ‘सेलिब्रेटी’ असून त्याचा फायदा उठवत तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली व त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. या मागणीला विरोध करीत आहुजाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायालयाने आहुजाला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मोलकरीण ही आहुजाकडे गेल्या दीड महिन्यापासून कामाला होती. तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आहुजा घरात कोणी नसताना तिच्यावर बलात्कार करीत असे. तसेच त्याबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही तिला देत असे. याप्रकरणी मोलकरणीचा जबाब नोंदवून घेण्याची प्रकिया सुरू असून तिचे व आहुजाचे कपडे कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.