Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

शिवसेनेच्या आंदोलनामुळे घोडबंदर रोड ‘जाम’
जनतेचे हाल , विद्यार्थ्यांनाही फटका
ठाणे, १५ जून /प्रतिनिधी

शासनाने मंजूर केलेले कापूरबावडी उड्डाणपुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यासाठी शिवसेनेने

 

आज माजिवडा नाक्यावर रास्ता रोको, ‘भीक मांगो’ आंदोलन करीत भूमिपूजनाचा श्रीफळ वाढविला. तासभर झालेल्या आंदोलनामुळे अनेक विद्यार्थ्यांवर पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारण्याचा प्रसंग ओढवला, तर प्रवाशांना वाहनांमध्ये बसून उन्हाचे चटके सोसावे लागले.
घोडबंदर रोडवरील कापूरबावडी नाक्यावर होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघातामुळे राज्य शासनाने कापूरबावडी नाक्यासह चार उड्डाणपुलांना मंजुरी दिली. त्याच्या निविदा निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण आहेत. हा त्रास शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खा. आनंद परांजपे, उपनेते अनंत तरे, उपजिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रताप सरनाईक, राजन विचारे, रमेश वैती, बाळ घाग आदी नेत्यांनी माजिवडा नाक्यावर भर दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर ठिय्या मांडून विधिवत पूजा करीत उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. आरतीसुद्धा म्हटली.
एकीकडे रस्त्यावर बसून पूजा सुरू असताना दुसरीकडे काही कार्यकर्त्यांनी टायर जाळले, वाहनांची हवा काढली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समक्ष सुरू होता. तासभराचे आंदोलन पोलिसांच्या सहकार्याने सुरू असल्याचे चित्र त्या ठिकाणी पोलिसांनी निभावलेल्या भूमिकेवरून दिसत होते. या रस्त्यावरून जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी करीत शिंदे यांनी तात्काळ निर्णयाचा हट्ट धरला. तोपर्यंत संपूर्ण घोडबंदर रोड ते ठाणे शहरातील रस्ते जाम झाले. परिणामी, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना गाडय़ांमध्ये बसून चटके सहन करावे लागले. अनेकांनी पायी जाण्याचा मार्ग पत्करला. मात्र वृद्धांपुढे कोणताच मार्ग उरला नाही. अखेर उपायुक्त भुजंगराव शिंदे यांनी नेत्यांना अटक केल्यावर आंदोलक निघून गेले.