Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

ये दोस्ती हम नही तोडेंगे!
मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

बरोबर ५० वर्षापूर्वी जेव्हा कुमार बाळ धुरी, कुमार सुरेंद्र कुलकर्णी आणि कुमार वसंत सहस्रबुद्धे यांनी दादरच्या छबिलदास शाळेत आठवी ‘एच’च्या वर्गात प्रथम प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या अंगावर होता शाळेचा गणवेश, एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात होतं दप्तर. आज पन्नास

 

वर्षानंतरही त्यांनी जेव्हा शाळेत पुन्हा प्रवेश केला त्यावेळीही त्यांच्या अंगावर होता गणवेश, हातात छत्री परंतु दुसऱ्या हातात दप्तराच्याऐवजी होता पुष्पगुच्छ आणि पेढय़ाचा पुडा. निमित्त होते शाळेतील आपल्या प्रथम प्रवेशाचा आणि मैत्रीचा सुवर्णमहोत्सव अभिनव पद्धतीने साजरा करण्याचे आणि त्याचबरोबर ज्या शाळेने आणि ज्या गुरुजनांनी आपल्याला घडविले त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचे. आजच्या कार्यक्रमाचा माहौल तयार करण्यासाठी सुरेंद्र कुलकर्णी, ज्यांचे कायम वास्तव्य आता दिल्लीत असते, ते मुद्दाम घाटकोरपहून लोकलने शाळेत आले आणि बाळ धुरी व वसंत सहस्रबुद्धे अनुक्रमे दादर व माटुंग्याहून आले. जसे ते १५ जून १९५९ ला प्रथमत: शाळेत आले होते तसे. आज शाळेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सांप्रतचे मुख्याध्यापक चंद्रकांत कांबळे यांना अभिवादन करून त्यांना पुष्पगुच्छ व पेढय़ाचा पुडा दिला. त्यानंतर त्यांनी आपल्या वर्गाना भेटी देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या आठवणींमध्ये तत्कालीन मुख्यध्यापक मु. ल. जोशी यांची कडक शिस्त, टीप टॉप पोशाखातील एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिलेले इंग्रजीचे धडे, शाळेचे कॅन्टीन चालविणारे शानबाग ज्यांचा उसळ पोळी आणि ५ पैसे प्लेट बटाटावडा (समोरच्या श्रीकृष्ण बटाटेवडावाल्याच्या ७ पैसे प्लेट तुलनेत २ पैसे स्वस्त) ‘आदर्श’ हॉटेलातील कोथिंबीर वडी इत्यादींचा समावेश होता. त्याकाळी आपल्याला ज्या गुरुजनांनी शिकविले त्यांच्याही प्रत्यक्ष भेटी घेऊन आशीर्वाद घ्यायचे या हेतूने त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना कळले की, देवचक्के सर (वय ९७) रामकृष्ण जोशी (वय ८५) आणि दीक्षित सर (वय ८५) यांचे आशीर्वाद मिळू शकतात. मग तिघांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांनाही पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन त्यांना अभिवादन केले. त्यांचे पत्ते शोधण्यात शाळेचे शिक्षक एस.एम. इनामदार आणि आर.डी. बर्गे यांनी मोलाची मदत केली. बाळ धुरी हे रंगमंच, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील प्रथितयश नट असून सुरेंद्र कुलकर्णी हे महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी खात्यातून निवृत्त होऊन दिल्लीत मुक्त पत्रकारिता करतात तसेच तेथील मराठी समाजाच्या सांस्कृतिक चळवळीत सक्रिय असतात. वसंत सहस्रबुद्धे हे नावाजलेले पॅथॉलॉजिस्ट असून तेही समाजकार्यात प्रत्यक्ष भाग घेतात. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुरेंद्र कुलकर्णी यांनी दरवर्षी छबिलदासमध्ये १० वीत इंग्रजी व मराठीत सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्यास रु. १०००/- चे बक्षिस जाहीर केले.